Karunaashtake - 15

समर्थांचे करुणाष्टक (१)

कडवे पंधरावे...

समर्थ म्हणतात...

जळचर जळवासी नेणती त्या जळासी..
निसिदिन तुजपासी चूकलो गुणरासी..
भूमिधरनिगमासी वर्णवेना जयासी..
सकलभुवनवासी भेटि दे रामदासी...!

रामा...माझ्या भोवतीचे जग हे मी माझ्या कर्तृत्वाने,माझ्या नशिबाने मिळवलेले आहे असा केवळ गैरसमज बाळगुन मी आयुष्य जगतोय हे केवळ त्या पाण्यातल्या जगणाऱ्या जिवासारखं आहे..हे जीव जगताना केवळ त्यांचा जीवनक्रम आणि अंगवळणी पडलेले हे जलवासी जीवन हे कारण आहे अस समजून जगत असतात..!त्यांना त्या पाण्याचे महत्व तेंव्हा कळते जेंव्हा त्या पाण्यातून त्यांना बाहेर काढले जाते..!
माझ्या आयुष्यात रामा तू या पाण्यासारखा आहेस.. माझ्या अस्तित्वाचे कारण आहेस..!तू माझ्या आयुष्यच्या चलनवलनाचे,जगण्याचे कारण आहेस..!

रामा.. या तुझ्या  अस्तित्वाच्या खुणा मला ओळखता आल्या नाहीत..माझे याबाबतीतले आडाखे मी केवळ अज्ञानाने बांधत गेलो..!रोजच माझं आयुष्य तुझ्याशिवाय चालते, अशा चुकीच्या धारणे च्या  आधारे मी  जगत आलो..!

हे तुझं वर्णन मी अनेकवेळा अनेक महाजनाकडून,ऋषी,संतमं डळीकडून ऐकलय पण त्यांनीही मान्य केलय की हे तुझं वर्णन करणं त्यांना ही शक्य नाहीये.. शेवटी तुझ्या अस्तित्वापुढे ते सारे ज्ञाते मौन झाले..तिथे माझ्यासारख्या मुढाची काय कथा..?

रामा..पण मला आता ही खात्री पटलीये की या भोवतीच्या भौतिक जगात, माझ्या अस्तित्वाच्या, अवतीभोवतीच्या घडणाऱ्या प्रत्येक घटनेत तू आहेस..!
पण अदृश्य,असीम  आहेस..!
रामा,आता पुन्हा पुन्हा तुला विनवतोय की मला आपलेसे कर..मला आता भेट दे..!

रामापाशी अशी शुद्ध तळमळ व्यक्त करणं हे समर्थांच्या नितळ,शरण्य  वृत्तीच द्योतक आहे..!

ही अशी वृत्ती उपजणं हे घडेल तेंव्हाच ईश्वरप्राप्ती..!

श्रीराम...

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment