समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*वदनी मदन इंदू तुळीताही तुळेना..|*
*अगणितगुणसिंधू बिंदू तो वर्णवेना..|*
*सकळ भुवन पाळी उपमा काय द्यावी..|*
*विकळशरीरभावे भाविता चित्त गोवी..||*

समर्थ म्हणतात...

या रघुराजाच्या शीतल,निशांत चेहऱ्याच दर्शन घेताना जाणवत की हा पुरुषसौन्दर्याचा आदर्श  अवतार मदन,शीतल,रम्य जाणीव असलेला चंद्र याचा उत्तम मिलाफ आहे.हे  मुखकमल इतकं साजीरे  आहे की या दोघांचाही भाव मला रामरायांच्या मुखावर दिसतो..!

समर्थ म्हणतात...

ह्या रामरायांच्या गुणांचा सागर अगणित आहे.अलोट आहे,अनंत आहे.अशा पूर्णसागराचा बिंदू होऊन हे रामराय जेंव्हा समोर असतात तेंव्हा त्यांचं अणुपासून अनंतापर्यंतच वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.

समर्थ म्हणतात..

संपूर्ण त्रिभुवनांतील सर्व सुखस्थाने,शांतीस्थाने,देवस्थाने,तिर्थस्थाने यांची तुलना या रघुराजाच्या अस्तित्वाशी होऊ शकत नाही.इतका हा रामराया आनंदकुळ आहे.

समर्थ म्हणतात..

या रामरायांची कृपा संपादन करण्यासाठी शरीर आणि मन अनन्यभावाने जेंव्हा आपण समर्पित करतो,तेंव्हा तो रामराया आपलं चित्त त्याच्या या संकीर्तनात अजूनच रंगवून देतो.गुंतवुन देतो.

समर्थ रामरायांचे अस्तित्व अनेक उपमा देऊन समजावून सांगतात.त्याच्या अस्तित्वाचे,त्याच्या कृपेच वर्णन समर्थ हरप्रकारे वर्णन करून स्वतःही त्यात रंगून जातात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्त्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तुजवीण सीण झाला धाव रे रामराया.|*
*कठीण दिवस जातो तापली सर्व काया.|*
*सकळ विकळ गात्रे अवस्था लागली रे..|*
*तुजवीण जगदीशा बुद्धि हे भंगली रे..||*

समर्थ म्हणतात..

रामराया..तू तर विश्रामधाम  आहेस..!तू तापत्रयाने पोळलेल्या प्रत्येकासाठी सावलीच प्रेमळ रूप आहेस.तू जोपर्यंत नाहीस तोपर्यंत मन,बुद्धि आणि त्यामुळे शरीर हे कष्टी होत आहे..!

समर्थ म्हणतात..

रामराया..व्यवहार म्हणून दिवसभर मला प्रपंचासाठी अतीव धावाधाव करावी लागते.आणि जोडीला परमार्थ नसल्यामुळे आणि तुझं दुरत्व आसल्यामुळे माझे अस्तित्व अतिशय तप्त,क्षुब्ध असे वाळवंट झाले आहे.

समर्थ म्हणतात..

रामराया..पंचेंद्रियांच्या सुखाचे डोहाळे हे माझा  पिच्छा सोडत नाहीयेत.त्यामुळे जी गात्र तुझ्या संकीर्तनाने,अस्तित्वाने  सुखकारक होणे हे छान असते.ती गात्रे या प्रपंच ओढाताणीमुळे गलीतगात्र होत चालली आहेत.

समर्थ म्हणतात..

रामराया..जगन्नायका तू असलास की बुद्धि,मन हे स्थिर असते.तुझ्या कृपेमुळे,उपासनेमुळे सुखकारक असे जीवन मार्गदर्शन होते.तू नसलास की मनाची अवस्था द्विधा होऊन विकल्प मनात उभे रहातात.तुझ्याविना जगणं हे सुसह्य होत नाही रे..!

समर्थ रामरायासाठी व्याकुळ असताना मन,शरीराची विकल्पि अवस्था वर्णन करतात.आणि तो विकल्प नष्ट होण्यासाठी जीवनात *राम* येणं महत्वाचं आहे हे ही समजावतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुनाथपदयुग्मि लिन भावे असावे..|*
*रविकुळटिळकाचे नाम वाचे वसावे.|*
*श्रवणमनन भावे आदरेसी करावे..|*
*परम सुख समाधी संतसंगे तरावे.||*

समर्थ म्हणतात..

श्रीरामाचे चरण हे निशांत मुक्तीस्थळ.दोन चरणांचा हा दृढ ठेवा.ह्याच्याशी सदा नम्रतेने पूजनांकित असावे.इथे सर्व आशा अर्पण करून केवळ रामकृपेचा ध्यास असावा.

समर्थ म्हणतात..

या सूर्यवंशी भूषण अशा रामरायाचे नामजप,नामसंकीर्तन हे प्रत्येकाने आपल्या वाचामुखी सर्वकाळ बोलावे.त्याचे वास्तव्य कायमच आपल्या पंचेंद्रियांत असावे.

समर्थ म्हणतात..

या रघुराजांचे चरित्र हे पर्वणी आहे.तो एक आनंदअनुभव आहे.तृप्त करणारी एक संजीवनी आहे.त्याचे श्रवण मनन हे एक आदरयुक्त असे यजन आहे.जे भावभक्ती ने प्रत्येकाने करावे.

समर्थ म्हणतात..

या साऱ्या संकीर्तन,मनन,जपध्यानाने  निःसंग समाधी आपोआपच प्राप्त होते.जी सुखांत निर्माण करणारी असते.याबरोबरच  संतसंगतीने त्या समाधीमध्ये अमूर्त पण पूर्ण चैतन्यमयी अशा व्यक्ततेची भर पडते.

समर्थांनी रामरायांची एक दृढ आणि स्वरूप,सुखदायी अशी प्रतिमा इथे वर्णन केली आहे.आणि त्या प्रतिमेच्या सगुण आणि निर्गुण दर्शनाने मिळणारी फलश्रुती सांगितलेली आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ अनाथबंधु.|*
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ करुणाएकसिंधू.|*
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ कोदंडधारी.|*
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ लीळावतारी..||*

समर्थ म्हणतात..

त्रैलोक्य हे सर्वभूतांचे वसतिस्थान.तिथे स्वामी असणारे रघुराज.हे रघुराज या सर्व लोकातल्या चराचराचे,नश्वरांचे,प्रत्येक ऋणानुबंधाचे, प्रत्येक एकल आयुष्याचे साक्षी आणि सहकारी आहेत.

समर्थ म्हणतात..

या त्रैलोक्यातील रघुराजांचे अस्तित्व हे सर्व  मानवजातीला,प्राणिमात्रांना,आशादायक असे वात्सल्यपूर्ण करुणेचा स्त्रोत्र आहेत.हे एक करुणेचा निरंतर अक्षय सागर आहेत.

समर्थ म्हणतात..

त्रैलोक्य व्यापून उरलेले हे रघुनाथाचे स्वरूप तापत्रयी,तसेच भवसागरातील संकटे,विघ्ने यांचे निर्दालन करण्यासाठी कोदंड स्वरूपाची शक्ती हाती बाळगून आहे.

समर्थ म्हणतात..

त्रैलोक्यनिवासी अशा विष्णूच्या सप्तम अवतारातील अवतारीत अशा या दैवताच्या अगम्य पण सूचित,सुलक्षणी लीळा या समस्त ब्रह्मांडासाठी एकमेव आणि अद्वितीय आशा आहेत.

समर्थ रामराजाचे अतिभव्य असे रूप इथे प्रकट करतात.राम हा केवळ वर्णनाने अनुभवण्यापेक्षा तो स्वतः जेंव्हा प्राचितीने अनुभव देतो तेंव्हा आपल्याला वर्णनात्मक हे कौतुक कमी पडते.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्तोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

*रघुपतीतनूरंगे रंगली नीळशोभा..|*
*रघुपतीरूपयोगे सर्वलावण्यगाभा.|*
*रघुपतीगुणगंधे धैर्य गांभीर्य लोकी..|*
*रघुपति मम चित्तीं बैसला येकनेकी..||*

समर्थ म्हणतात...

हे विश्व राममय आहे.रामरायांच्या निळ्या,सावळ्या कांतीने या गगनाला निळ्या रंगाचे अस्तित्व आले.हे निळे गगन गहन आणि सूनयन झाले केवळ रामरायांच्या अस्तित्वामुळे..!

समर्थ म्हणतात...

रामरायाची तेजल आभा,त्याच सहजसुंदर दर्शन,त्याच मनोहरी सौष्ठव या मुळे विश्वात पौरुष सौंदर्याचा आदर्श सृष्टीत निर्माण झाला.सुखकारी अस हे दर्शन अंतिम सुखाचा विसावा आहे.

समर्थ म्हणतात..

रामरायांचे अनुपम गुण एकबाणी, एकवचनी,एकव्रती,धैर्यव्रती असे अनेक.अशा साऱ्या गुणांमुळे समाजात  चांगुलपणा,सृजनता यांची जोमाने वाढ झाली.हे सारे गुण भूषणावह ठरले.ते एकमेव,अद्वितीय ठरू लागले..!ह्या साऱ्या चांगल्या गुणांचे मनुष्यप्राणी  अस्तित्व जपू लागले.

समर्थ म्हणतात...

असा एकमेव,एकद्वितीय रामराजा माझ्या मनात वास करून आहे.अनेक अशा उत्तम चारित्र्यवान देव,संतामधून त्याचे अस्तित्व वेगळे,मनोहारी असे मला जाणवते.आणि त्याचीच उपासना मी मनोभावे करतो.

श्रीरामांच वर्णन समर्थ करतात.सहजसुंदर अस्तित्व समजावून सांगतात..!जे त्यांना मनातून जाणवत.जे त्यांच्या उपासनेत त्यांना गवसत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्तोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व.*
*अपरिचित करुणास्रोत्रे.*

🌺
*दिनकरकुळवल्ली लोटली अंगभारे..|*
*रघुविरअवतारे दाटली थोरथोरे..|*
*सुखरूप सुखवासी राहिले योगरासीं.|*
*सफळ सितळ छाया फावली रामदासी..||*

समर्थ म्हणतात...

सूर्यवंश हा अपरिमित सुख देणारा वंश.सामाजिक,मानसिक,भावनिक,पारमार्थिक असा प्रत्येक पातळीवर सुख देणारा हा वंश.. जो पृथ्वी सुजलाम,सफलाम करतो..!
ब्रम्हांडापर्यंत हा वंशवेल विस्तारला आहे.(अर्थात सारे त्याचेच वंशज आहेत.)

समर्थ म्हणतात..

रघुराजासारखे नरपुंगवी अवतार..अनेक शक्तीयुक्त अवतार... म्हणजे चक्रवर्ती राजे..!अनेक भक्तीयुक्त अवतार..म्हणजे संत..!या सुर्यवंशाचे देणे आहेत.

समर्थ म्हणतात..

जे जे मनुष्य,प्राणी या वंशाच्या आसऱ्याला गेले. त्याच्या अस्तित्वामुळे वाढले.फुलले.सारे सुखवंत होऊन गेले.

समर्थ म्हणतात..

तेच सुख...!!!आम्ही मिळवलं आहे..!त्यासाठी आम्ही आमची उपासना करून सुर्यवंशातील अवतारीत नरोत्तमाना अर्पण केली आहे.अर्थात त्या छायेखाली आम्ही रामदास कृतार्थ झालो आहोत.

समर्थ सुर्यवंशाचे महिमामंडण करत आहेत.रघुराजाचा हा वंश किती विस्तारला आहे.युगानूयुगे हा सूर्यवंश सृष्टीचे कल्याणच करत आला आहे.आम्हीही रामदासी होऊन त्यांच वंशाच्या छत्रछायेखाली स्वतःचे आयुष्य कारणी लावले आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्तोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे.*

🌺
*पळपळ चळताहे बाळ तारुण्य देही.|*
*तळमळ विषयांची नेणवे हीत काही.|*
*लळलळ गरळा तो काळ लाळीत आहे..|*
*जळजळ शितळा हे भक्तीसेऊनी राहे..||*

समर्थ म्हणतात ..

क्षणाक्षणाने वाढणारे बालक जेंव्हा तरुण होते.देहात उर्मी,चेतना,बळ हे साठू लागते.त्याचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व त्याला आणि समाजाला प्रतीत होऊ लागते.प्रारब्ध आणि संचित याचा योग्य मेळ घालायची ही वेळ म्हणजे क्षणाक्षणाने तयार होणारे तरुणपण.

समर्थ म्हणतात...

या तारुण्यात सगळ्याबरोबर अजून एक भावना वाढते ती म्हणजे विषयवासना.ही विषयवासना तारुण्यसुलभ नक्कीच आहे.पण त्याने भविष्यकालीन आयुष्याचे हीत नक्कीच होत नाही.आणि हे हित होत नाहीये हे तारुण्याच्या उर्मीत जाणवत नाही.

समर्थ म्हणतात..

काळ नावाचा एक विषसर्प आयुष्यातले क्षण या विषयसुखाच्या साथीने मनुष्याचा सत्वधर्म,निश्चलता  कुश्चीळ करत असतो,विषारी करत असतो.

समर्थ म्हणतात...

ही काळाने विषयसुखाच्या साथीने निर्माण केलेली स्वार्थी गरळ, तिचा पुण्यक्षयी,आयुष्यघातकी प्रभाव कमी करायचा असेल,नष्ट करायचा असेल तर भक्ती नावाचे अमृत आपण ग्रहण आणि मनात साठवायला शिकल पाहिजे..!हीच भक्ती या कळीकाळ निर्मित हे हलाहल निववू शकते,शांत करू शकते.

समर्थ आयुष्याचा सुवर्णकाळ म्हणजे तारुण्य.या काळात निर्माण होणाऱ्या,मतीक्षय,पुण्यक्षय करणाऱ्या विषयसुखाच्या सुंदर पण प्रारब्धाच्या दृष्टीने काहीवेळा घातकी ठरणाऱ्या संकटाची जाणीव आपल्याला करून देत आहेत.आणि त्यावर उत्तम उपाय म्हणून भक्ती,उपासनेचा उपचार ही आपल्याला सांगत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२