समर्थांचे साहित्यविश्व (अभंग १)(भाग१)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग १*

*भाग १*

*उपदेश देवुन दीधला मारुती |*
*स्वये रघुपती निरविता..||१||*
*निरविता तेणें झालो रामदास |*
*संसारी उदास म्हणऊनी..||२||*

समर्थ म्हणतात...

उपदेशाच्या दातृत्वातून येणारी विरक्ती अजूनच विलोभनीय असते.रामरायांनी तसाच मारुतीरायांना उपदेश केला.भक्तश्रेष्ठ अशी ख्याती असलेल्या  मारुतीरायांना रामरायांनी प्रेमापोटी उपदेश केला तो विरक्तभक्तीचा..!

समर्थ म्हणतात..

भक्तीची अंतिम अवस्था विरक्तभक्ती. जिथं प्रेम,निष्ठा सगळं निर्गुण होत.आणि अभेदभक्ती,विरक्तभक्ती निर्माण होते.

समर्थ म्हणतात..

रामरायांच्या पदकमलापाशी मी जेव्हा सगुणत्वाचा हट्ट धरून बसलो तेंव्हा त्यांनी मला समजावलं.मला शिकवलं हेच विरक्तभक्तीच श्रेष्ठत्व.

समर्थ म्हणतात..

त्यामुळे  आम्ही रामदास झालो.आणि या  विरक्तभक्ती मुळे रामदर्शनाशिवाय प्रत्येक सांसारिक,प्रापंचिक गोष्टीत सम्यक उदासीनता निर्माण झाली आहे.आणि प्रापंचिक गोष्टींची जागा रामभक्तीने घेतली आहे.

प्रत्यक्ष रामाचे अनुग्रहित समर्थ.समर्थांचा प्रत्येक विचार,आचार हा रामाच्या अस्तित्वाने व्यापलेला.असे समर्थ रामाच्या उपदेशाविषयी या अभंगात सांगत आहेत 

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (भूपाळी) (भाग ४)

*समर्थांचे साहित्यविश्व..*
*भुपाळी*

*भाग ४*

*राम योगीयांचे मंडन..*
*राम भक्तांचे भूषण..*
*राम आनंदाचा धन..*
*करी रक्षण दासांचे..!*

समर्थ म्हणतात..

हा रघुराज आहे ना?तो तापसांचे तप,योगीयांचा योग,संन्याशाचे संन्यसत्व आहे.तो रघुराज त्यांचं सकल साध्य आहे.आणि साधन ही.

समर्थ म्हणतात..

हा रघुराज भक्तांसाठी आनंदाच कारण आहे.आरतीतल वर्णन,अभिषेकातल सुक्त आहे.हा राम भक्तांसाठी एक विश्रामयुक्त धाम आहे.

समर्थ म्हणतात..

रघुराज एक आनंदाच अस्तित्व आहे.थिजलेल्या पण तृषार्त अशा भक्तांच्या मनासाठी, समूहासाठी राम हा सअमृत असा नभ आहे जो भक्तांमध्ये चैतन्य निर्माण करतो.

समर्थ म्हणतात..

रघुराज हा भक्तपालक ही आहे.जो संसारात भक्तांच तापत्रयी पासून आणि परमार्थात षड्रिपुपासून  रक्षण करतो.असा रघुराज हा कोणाच आराध्य नसेल बरे..?सगळ्यांच्या ठायी आणि सर्वांच्या भोवती तोच आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (भूपाळी) (भाग ३)

*समर्थांचे साहित्यविश्व..*
*भूपाळी*

*भाग ३*

*राम भावे ठायी पडे..*
*राम भक्तीशी आतुडे..*
*राम ऐक्यरूपी जोडे..*
*मौन पडे श्रुतीसी..!*

समर्थ म्हणतात..

रघुराज हा भावाचा भुकेला आहे.कोणताही अन्न,वस्त्रदीक अर्पणापेक्षा तो भावार्पण जिथे आहे तिथे लवकर प्रसन्न होतो असा अनुभव आहे.

ह्या रघुराजाला बोलावण्याचा,त्याच्याशी अनुसंधान बांधायचा,आपल्या भोवती सदा कृपामयी ठेवायचा एकच मार्ग आहे..तो म्हणजे अपरिमित भक्ती,अतुल्य भक्ती.

समर्थ म्हणतात..

हा रघुराज एकसंध,समूहाचा स्फुरणदाता आहे.जिथे भक्तीयुक्त ऐक्यता आहे,जिथे शक्तीयुक्त भक्तांचा गजर आहे तिथे हा रघुराज कायम तिष्ठत असतो.

समर्थ म्हणतात..

रघुराजाच गुणानुवर्णन,शक्तीच संकीर्तन करायला लागलो की वेद,पुराणांची महती,आणि त्यांची भव्यता ही कमी वाटते.वेदातले मंत्र,ओव्या ही खूपच अपुऱ्या शब्दांच्या वाटतात.
असा हा एकमेव रघुराज..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच साहित्यविश्व (भूपाळी) (भाग २)

*समर्थांच साहित्यविश्व..*
*भूपाळी*

*भाग २*

*राम नित्य निरंतरी..*
*राम सबाह्य अभ्यंतरी.*
*राम विवेकाचे घरी..*
*भक्तीवरी सांपडे..!*

समर्थ म्हणतात..

तो रघुराज आहे ना तो नित्यसदा सभोवती आहे.तो श्वासापासून अनुभूतीपर्यंत आणि निश्वासापासून मृत्यूपर्यंत असा सजीवतेभोवती आहे.आणि निर्जीवतेत तो सुप्त चैतन्यमयी आहे..!

समर्थ म्हणतात..

तो रघुराज.. हा बाहेर आणि आत म्हणजे सुकृत,अकृत स्वरूपात विराजित असतो.तसाच शरीर,मनाच्या अंतिम कोषात म्हणजे अंतर्मनात आत्माराम म्हणून सदा सर्वकाळ जागत असतो.

समर्थ म्हणतात..

रघुराज हा स्वतःच एक पूर्ण पुरुष आहे.ज्याने त्याच्या आयुष्यात सत्य,विवेकाचा सर्वतोपरी जगण्यासाठी उपयोग केला.हा विवेक जेंव्हा त्याचे भक्त आचरण करतात तेंव्हा त्याठिकाणी स्वतःच विवेकाचे दैवत म्हणून प्रकट होतो.आणि सगळ्या सहवासितांना ही विवेकाचे धनी करतो.

हा रघुराज नेहमी भक्तमय असतो,जिथे भक्ती विवेकपूर्ण,असक्तीहीन,निरामय,निःसंग असते.राम एक व्रती आहे,ते व्रत म्हणजे भक्तवात्सल्य.रघुराज हा असा भक्तासक्त आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच साहित्यविश्व (भूपाळी) (भाग१)

*समर्थांच साहित्यविश्व..*
*भूपाळी*

*भाग १*

*राम आकाशी पाताळी.*
*राम नांदे भूमंडळी...*
*राम योगीयांचे मेळी...*
*सर्वकाळ तिष्ठत...!*

समर्थ म्हणतात..

आकाशाची व्याप्ती आणि भूमीची खोली..ही रामाने व्यापून आहे.हा राम म्हणजे या दोन्ही ठिकाणी सापडणार अमूर्त चैतन्य.जी आकाशाची निळाई तोच रामरायाचा वर्ण..आणि जी भूमीची सकसता ते रघुराजाचे आशीर्वादात्मक कर्म..!

समर्थ म्हणतात...

रामराय जरी विष्णूचा अवतार,स्वर्गस्थ देवतांचा अंश..पण त्याचा निवास मात्र या भूमीतलावरचे  अचल,चल चराचर आहे.राम इथेच नांदतो.आणि समरसतो.

समर्थ म्हणतात..

रामतत्व जरी मूळ ओंकाराचा आविष्कार असले तरी योगी,तापसी,तपस्वी हे सारे त्यांच्या योगलीलात रामच धारण करतात.असा योगीयांचा,संतांचा समूह म्हणजे रामाच समाजाभिमुख दर्शनच आहे..!

समर्थ म्हणतात...

ज्याच एखाद्यावर प्रेम असत ती व्यक्ती आपल्या प्रियजनासाठी,आराध्यासाठी सदासर्वकाळ वाट बघत असते.रामराय पण तसेच.योगी,संत,महंत, भक्त यासगळ्यासाठी  मनापासून तिष्ठत रहाणं हे जरी त्यांचं इप्सित असलं तरी अस होणं रामकृपाच आहे..!


श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ९)

*समर्थरचित चौपदी*
*भाग ९*

*ब्रम्हअनुभव दे रे राम..*
*अनन्यसेवा दे रे राम..*
*मज वीण तू मज दे रे राम..*
*दास म्हणे मज दे रे राम!*

समर्थ म्हणतात..
खूप झाले आता ऐहिक,सामाजिक,प्रापंचिक अनुभव,खूप झाले.आता नको.रामा आता तो अनुभव दे जो मिळाला की मनुष्य तुझा होतो.तो ब्रह्माअधिष्ठित सोहळा मला माझ्या बाबतीत घडताना बघायचाय..तो ब्रम्हअनुभव दे रे रामा..!

रामराया..मला समाजाची,परंपरेची,धर्माची,देशाची कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा करायची बुद्धि आणि कायम संधी दे..!जसा तुझ्या सेवेत,अर्चनेत तुझी मी अनन्यभावाने पूजा करायची अशी इच्छा करतो.तशीच ही सेवा माझ्याकडून करून घेशील ना रे रामराया..?

रामराया.. हे सगळं मी तुझ्याकडे मागतोय पण अस ही होईल ना रे..?हे सगळं मागायच्या ऐवजी तूच मला मिळावास.म्हणजे ही पावनभिक्षा मागायची वेळच येणार नाही.तूच दाता आणि तूच भोक्ता..!आता मात्र हीच भिक्षा दे रे रामा...!

रामराया..शेवटी तुझाच तर मी आहे.तुझा दास,तुझा अश्रीत आहे.तू देशील ते मी घेईन..तू सांगशील तेच आचरण करेन..!त्यामुळे ही पावनभिक्षा मला दे किंव्हा तू स्वतःला मला देऊन टाक. मला रामरूपी करून घे..!आता हे तरी कर ना रे रामा..!

समर्थ पावनभिक्षेची याचना आणि हट्ट हे दोन्ही करतात.अनंताची अक्षयी मागणी..!समर्थ हे लिहिताना त्यांच्यासाठी हे सगळं मागत असतात.पण कळत की आपल्याला ह्या  पावनभिक्षेची जास्त आवश्यकता आहे.खर म्हणजे समर्थ हे सगळं आपल्यासाठीच तर रामाकडे साकडं घालतायत..!आपण झोळी सदा उघडी ठेवूया आणि समर्थांकडे,रामाकडे हीच पावनभिक्षा मागूया..!
मजविण तू मज दे रे राम..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ८)

*समर्थरचित चौपदी*
*भाग ८*

*तद्रूपता मज दे रे राम..*
*अर्थारोहण दे रे राम..*
*सज्जनसंगती दे रे राम.*
*अलिप्तपण मज दे रे राम..!*

समर्थ म्हणतात..

रामराया..
एकाग्रता मनाची दुर्लभ पण छान अवस्था.त्यातुन जन्म घेते तद्रुपता..!तनुमनुचे भाव एक होणं.लिन होणं.स्वतःला विसरून स्वतःतल्या तुला जागत ठेवण,म्हणजे तुझ्याशी तद्रुपता..!ती तद्रुपता रामा मला दे रे..!!

रामराया...तुझी अनेक वचन,तुझी अनेक स्तोत्रे, तुझे अनेक गुणवर्णन हे मला पामराच्या बुद्धीत प्रतीत होऊ देत.त्या त्या शब्दांचे नेमके अर्थ,त्यातील गुह्यता,गूढता,मतितार्थ हे सगळं माझ्या आकलनशक्तीला कळत राहोत.असा अर्थारोहणाचा व्यासंग मला मिळू दे रे रामा..!!

रामराया..तुला माहितीये तुझ्या आसपास तुझ्या भोवती मी असतो त्याचे श्रेय माझ्याभोवती असलेल्या सश्रद्ध,सुहृद,सुस्वभावी सज्जनांना आहे.माझ्यापर्यंत जे मला हितकारक नाही ते पोहचतच नाही.त्यासाठी हीच सज्जनांची मांदियाळी माझ्या भोवती नेहमीच असू देत रे रामा..!!

रामराया..सगळं देतोस.मुक्तपणे देतोस.त्याबरोबर मला अलिप्तता पण दे.कोणत्याही कार्याची उभारणी,स्वबुद्धीचा अभिमान वाटू लागेल इतकं त्यात मला गुंतवू नकोस.मला तिथून लगेच अलिप्त कर.तरच मी निरक्षीर विवेकाने स्वतःला तुझा दास म्हणवून घेऊ शकतो.ते स्वतःसाठी पोषक असलेलं अलिप्तपण मला दे रे रामा..!

समर्थांचा पिंड मूळ संन्यासाचा.पण अशा प्रकारचा पूर्ण संन्यास घेऊन काहीश्या कर्मठ आणि कठीण संन्याशीव्रतामुळे  लोकांच्या कडून जो समाज घडवून घ्यायचा आहे तो घडवून घेता येणार नाही हे त्यांनी ताडल होत.म्हणून त्यांनी समाजात राहून समाजाभिमुख संन्यास शिकवला.अलिप्तता शिकवली.अभ्यास शिकवला.भक्तीला नवीन परिमाण दिलं.रामी रामदासी झाला.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२