समर्थरचित चौपदी (भाग ७)

*समर्थरचित चौपदी*
*भाग ७*

*पावनभिक्षा दे रे राम..*
*दिनदयाळा दे रे राम..*
*अभेदभक्ती दे रे राम..*
*आत्मनिवेदन दे रे राम.!*

समर्थ म्हणतात..

रामराया..तू माझ्या मनाच्या झोळीत घालशील ती केवळ अपूर्व भिक्षा असेल.तुझ्या पावन हातून,पावन मनातून,पावन आशिर्वादातून जे मिळेल ती पावनभिक्षा माझं पूर्ण कल्याण करेल रे रामा..!

रामराया...ही पावनभिक्षा तू देशील कारण तू तितकाच मनाचा कनवाळू, दयाळू आहेस.आणि या भिक्षेचा उपयोग मी तुझ्याच संकीर्तनासाठी करणार आहे.हे सगळं तुझंच  आहे,तुलाच देणार आहे रे रामा..!!

रामराया..या साठी पराकोटीची एकाग्रता जी  तुझं ध्यान,मनन मनात साठवू शकेल,जागवू शकेल..!ती भक्ती मला दे..!अशा भक्तीत कुठलाही भेद निर्माण होत नाही..!कोणीही कितीही आशंका निर्माण केल्या,तुझ्याबद्दल अविश्वास व्यक्त केला तरी माझी भक्ती अढळ राहील ह्याची ग्वाही मी तुला देतो..पण तू मला तशी भक्ती साकारून दे रे रामा..!!

रामराया..मी तुझ्याकडेच व्यक्त होऊ शकतो.माझ्या मनाचा कोपरा न कोपरा मी उलगडून दाखवून त्यातली ममता आदी भावनांची आहुती तुझ्या चरणावर ठेवली आहे.मी माझं अस अस्तित्वच ठेवलं नाहीये.स्वतःला तुझ्यापायी समरसून घेतोय..फक्त तू आता मला उराशी कवटाळून घेशील ना रे रामा..!!

समर्थानी एक सुंदर शब्द प्रचलित आणला पावनभिक्षा..!देणारा दातृत्वाने पावन..घेणारा भक्ती आचरून पावन..ही भिक्षा ही अनादीकाळा पासून सदापुनितच आहे.
ही भिक्षा हे घेणारे समर्थांसारखे युगपुरुष, देणारा युगनिर्माता..!आणि आपण त्या भिक्षेचा आस्वाद घेणारे पांथस्थ,भिक्षुक..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ६)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग ६*

*प्रबंध सरळी दे रे राम..*
*शब्द मनोहर दे रे राम..*
*सावधपण मज दे रे राम*
*बहुत पाठांतर दे रे राम.*
*दास म्हणे रे सद्गुण धाम*
*उत्तम गुण मज दे रे राम.!*

समर्थ म्हणतात...
रामराया मला तुझं उत्तम संकीर्तन करायचं आहे.मला त्यासाठी तुझी,सर्व पौराणिक विषयांची,ऐतिहासिक घटनांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचे विवेचनात्मक सादरीकरण मला करता आलं पाहिजे.या सगळ्याची उत्तम ओळख तू मला करून दे रे रामा..!

रामराया...
तुझं अस्तित्व,तुझं दर्शन,तुझ्या लीला या सगळ्याच सर्वांगसुंदर आहेत.त्या सगळ्यांच वर्णन करण्यासाठी माझ्याकडे  तितकीच सुंदर,व्यक्त शब्दमाला असायला पाहिजे.ही शब्दसंपत्ती मला तुझ्याशिवाय कोण देणार?ती ही मला दे रे रामा..!

रामराया..
इतकं असून सुद्धा मी मूढमती आसल्यामुळे माझ्या हातून तुझ्या संकीर्तनात अनेक चुका होतात,त्रुटी रहातात..तू मला नेहमी सांभाळून घेतोसच..पण अशा माझ्या चुका मला सावधपणे सुधारून पुन्हा धीट पणे तुझं संकीर्तन चालू ठेवता आलं पाहिजे अस प्रसंगावधान मला शिकवशील ना रे रामा..?

रामराया...
तुझं चरित्र म्हणजे एक दीर्घ मनोहर अशा प्रसंगांची शृंखला आहे.त्यात प्रत्येक कृतीतून तू आम्हाला शिकता येतील अशी वचने आहेत.त्याबरोबरच वेदांत,पुराण,उपनिषदे यांतील श्लोक,ओव्या,स्तोत्रे अस अनेक वैभव आहे.हे सगळं माझ्या मतीमध्ये समावेल इतकं पाठांतर माझ्याकडून करवून घेशील ना रे रामा..?

रामराया..मी तुझा अंकित आहे,दास आहे,ऋणी आहे.पण तू मात्र सगळ्या सद्गुणांची,सदवर्तनाची,सदाचाराची खाण आहेस,मेरुमणी आहेस.तू सकल विश्वाचा आदर्श आहेत.विश्वाचा विश्राम आहेस..!हे तुझं वर्णन खूपच थोड आहे.इतका तू अगाध आहेस रे रामा..!

रामराया..
तुझं वर्णन हे गुणवर्धन आहे.पण मला त्यातल जेवढ काही उत्तम आहे ते मला दे ना रे..!मी मनापासून प्रयत्न करेन.मी आचरण करायचा प्रयास करेन.पण मला जे उत्तम,जे सत आहे असे सगळे गुण मिळावेत हे मागण तुझ्याकडे कायम राहील.या दासावर ही कृपा करशील ना रे रामा..?

समर्थ स्वतःला कायम घडवत आहेत.स्वतःच्या उत्तम अशा अस्तित्वाला हेतुपुरस्सर उत्तरं रित्या रचत आहेत.अशी बहुआयामी प्रतिभा समर्थांची आहे.रामाकडे निस्सीम भक्ती करून,मागणी करून त्यांनी ती घडवली आहे..!आपल्यासमोर ही तोच आदर्श आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ५)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग ५*

*रसाळ मुद्रा दे रे राम..*
*जाडकथा मज दे रे राम*
*दस्तक टाळी दे रे राम..*
*नृत्यकला मज दे रे राम!*
समर्थ म्हणतात..

रामराया.. माझं दिसण,माझ्या चेहऱ्याची ठेवण ही जन्मापासून आहे.त्यात बदल करता येत नाही.पण त्यावर सुखाची,अध्यात्माची,भक्तीची अभा असू दे..!माझ्या मुद्रेवर शांत,हसरा असा भाव असू दे..!माझ्याकडे बघून कुणालाही माझा कंटाळा येऊ नये..!कारण या मुखातून तुझीच रामकथा मला त्यांना समजावून द्यायची आहे..!

रामराया..मला संकीर्तनात तुझ्या,वेदांतामधल्या,पुराणामधल्या,इतिहासातील गूढ,गर्भित शिकवण असलेल्या कथांचा सहजतेने उलगडा करता आला पाहिजे..त्यासाठी अशा सर्वविषयातील कथा मला समजून घेता येतील अशी बुद्धि तू मला दे रे रामा..!!

रामराया..या संकीर्तनात मला उत्तम ताल ज्ञान ही असायला हवं.माझी आणि भोवतीच्या वाद्यांची,एकमेकांची मधुर अशी एकता जमली तर तुझी रामकथा अजूनच मनोवेधक होईल.तसेच श्रोत्यांना ही या तालाशी समरस करून घेण्याची कला अवगत करून दे रे रामा..!

रामराया..तुझं संकीर्तन चालू असताना तुझ्या अनेक अवतारांच्या कथाही प्रसंगानुरूप येतातच.अनेक ठिकाणी तुझ्या भजनात तल्लीन होऊन आम्ही पदन्यास ही करतो,नृत्य करतो..!मला त्याच ही उत्तम ज्ञान दे..!ती ही तुझी सेवा च आहे..!ती मला मनोभावे शिकवशील ना रामराया...?

समर्थ उत्तम धर्मज्ञानी आहेत,संस्कृतीज्ञानी आहेत तसे उत्तम मिमांसक ही आहेत.ते उत्तम प्रवचनकार,कीर्तनकार,गायक ही आहेत.रामदासी म्हणवुन घेणाऱ्या प्रत्येकाला हे सगळं अवगत हवं,आणि ते ही अतिशय नेमकेपणाने हा ही त्यांचा आग्रह आहे.म्हणून या सगळ्या गुणांची मागणी समर्थ रघुराजा कडे करत आहेत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ४)

*समर्थरचित चौपदी...*
*भाग ४*

*संगीत गायन दे रे राम..*
*आलापगोडी दे रे राम..*
*धातमाता दे रे राम..*
*अनेक धाटी दे रे राम..!*

समर्थ म्हणतात...

धर्मकार्य,पारमार्थिक व्यक्तींना आपला धर्म,परमार्थ अनेक बाजूनं,प्रकाराने समजवून द्यावा लागतो.नवविधाभक्ती मधून तो प्रचलित करावा लागतो.त्यापैकी एक कीर्तनभक्ती..!आणि त्यासाठी संगीत आणि गायन याची उत्तम जाण असणं आवश्यक आहे.सांगणारा आणि उतरवून,समजावून घेणारा या दोघांना ही हे सगळे बारकावे कळण महत्वाच आहे.ते संगीत गायनाचे ज्ञान मला दे रे रामा..!!

रामराया.. उत्तम आलाप कला कला ही गायनात रुची निर्माण करतात.एखाद्या वर्णनात ते एखादं महत्व पटवून देण्यासाठी उत्तम भूमिका बजावतात..!म्हणून ती आलापगोडी,त्याचा गाभा मला ज्ञात होऊ दे रे रामा..!!

रामराया..या कीर्तनसेवेत प्रभूवर्णनातं वेदकाल,पुराणकाळ,उपनिषदे आणि त्यांच्याशी निगडित सगळ्या आख्यायिका या प्रस्तुत कराव्या लागतात..!त्याबरोबरच सध्याच्या प्रचलित अशा ऐतिहासिक, सामाजिक घटनांचा मागोवा ही मांडावा लागतो.त्यापासुन चे निष्कर्ष इथे सिद्ध करून दाखवावे लागतात..ती ही कला मला अवगत करून दे रे रामा..!

रामराया..अनेक संतानी अनेक प्रकारच्या काव्य रचना,वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या प्रस्तुतीकरणं पद्धती निर्माण केल्या आहेत.त्याचे अनेक असे आविष्कार आहेत.ते त्याच पद्धतीने कायम व्यक्त करता यावे यासाठी या साऱ्याची ओळख मला करून दे रे रामा..!

समर्थ प्रणित उत्तम रामदासी हा उत्तम कीर्तनकार असावा ही समर्थांची अपेक्षा आहे.ऐकवणारा कीर्तनकार  आणि ऐकणारा समाज हे दोघेही तितकेच निष्णात असावेत.म्हणजे हे भक्तीचे दोहन हे सुंदर नवनीत निर्माण करून देते..!त्यासाठी रामाजवळ हे समर्थांच मागण आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ३)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग ३*

*विद्यावैभव दे रे राम..*
*उदासीनता दे रे राम..*
*मागो नेणें दे रे राम..*
*मज न कळे ते दे रे राम.*
*तुझी आवडी दे रे राम..*
*दास म्हणे मज दे रे राम.*

समर्थ म्हणतात..

रामराया..मला प्रगल्भ बुद्धि आणि व्यासंग वाढावा म्हणून साक्षरता,अर्थता आणि मनाच्या शुद्धतेसाठी या सगळ्याचा उत्तम अर्क असलेली विद्या आणि त्याबरोबर येणार बुद्धिप्रामाण्यवादाच वैभव हे दोन्ही अपेक्षित आहे..!ते माझ्या वंद्य आणि श्रेष्ठ लोकांकडून मला प्राप्त होऊ दे रे रामा..!

रामराया..मला औदासिन्य ही अपेक्षित आहे.कुठल्याही प्रतिक्रियेवर लगेच उत्तर देण्याची गडबड ही चुकीची असते. त्यासाठी त्या घटनेकडे,कारणाकडे त्रयस्थ अशा नीरामय वृत्तीने बघण्याची सवय जडावी.हे सकारात्मक औदासिन्य मला दे रे रामा..!!

रामराया..मला न कळणाऱ्या किंव्हा काय मागायचे असते हे ही समजत नसलेल्या अनेक गोष्टी आहेत.ज्यातून माझा उत्कर्ष होऊ शकतो.पण माझ्या सारख्या तुझ्या भक्तासाठी काय चांगले आहे हे तुला मात्र माहीत आहे.ते मला दे रे रामा..!!

रामराया..माझ्या भाळी लिहिलेल्या अनेक हिताच्या गोष्टी आहेत ज्या मला माहित नाहीत.काहीवेळा माझ्या मुढतेमुळे,माझ्या आढयतेमुळे मला त्या कळत ही नाहीत.त्या साऱ्या गोष्टी अवगत करून दे रे रामा..!!

रामराया.. मला या साऱ्या जगात तूच प्रिय आहेस.आणि तूच माझं अंतिम ध्येय आहेस.त्यासाठी अहर्निश अशी तुझी मानसिक,वाचिक भक्ती करण्यासाठी इतर प्रलोभन कमी करून तुझी आवड मला प्राप्त होऊ देत रे रामा..!

रामराया..तुझा मी अंकित आहे.तुला शरण आहे.तुझा चरणरज आहे.या नात्याने मी तुझ्याकडे हे मागण सदोदित मागतोय.मला पारमार्थिक अस सार दे जे मला तुझ्या धामापर्यंत मला घेऊन येईल..!!

समर्थ विचार करतात तो प्रत्येक विचार रामर्पणमस्तू या वृत्तीचा असतो.शहाणपण,बुद्धि हे सारं रामापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची पराकाष्ठा आहे.आणि तेच मागण समर्थांच रघुराजाकडे आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग २)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग २*

*हितकारक दे रे राम..*
*जनसुखकारक दे रे राम*
*अंतरपारखी दे रे राम..*
*बहुजनमैत्री दे रे राम..!*

समर्थ म्हणतात..

रामराया.. जे आयुष्याच खर सुख आहे ते सुख मला दे.ते हिताचे असेल ते दे.हव्यास आणि अप्पलपोटे पणा याचा स्पर्श नसलेल...विचार आणि अस्तित्व शुद्ध आणि सात्विक करणार हितकारक मला दे रे रामराया..!

रामराया..मी या प्रचंड आणि सर्वव्यापी समाजपुरुषाचा एक भाग आहे.माझ्या बरोबरच या समाजात रहाणारा प्रत्येक मनुष्य सुखी राहील अस  सुलभ रहाणीमान तू सभोवती निर्माण कर.म्हणजे माझ्या पूर्ण मनुष्यजातीला  कल्याण,सुख मिळेल.समृद्धी मिळेल.

रामराया..मला बहुश्रुत व्हायचं असेल मला मला समोरच्याच्या भावनांचा, मनाचा अंदाज घेण्याची अचूक कला आली पाहिजे.मला त्यांचं मन,त्यांची देहबोली ही कळली पाहिजे.तरच मी समाजाभिमुख होईन.मला हे सामर्थ्य देणारा तूच आहेस ना..?

रामराया..मला सख्यत्व ही पाहिजे.मला समाजातील प्रत्येक घटकांशी नाळ जोडता आली पाहिजे.वर्णरहीत,भेदरहित असा मैत्र परिवार हे उन्नत मनाच लक्षण आहे.सभोवती सहृद अशा घटकांचा वावर असणे हे उत्तम लक्षण आहे.अशी बहुजन मैत्री मला दे..!

समर्थ हे एक द्रष्टे संत  होते.त्यांना एक आदर्श असा समाज निर्माण करायचा आहे.ते त्याच्यासाठी रात्रंदिवस कार्यरत होते.त्या समाजासाठी समर्थ हे रामाकडे मागत आहेत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग १)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग १*

*कोमळ वाचा दे रे राम..*
*विमळ करणी दे रे राम.*
*प्रसंगओळखी दे रे राम.*
*धूर्तकळा मज दे रे राम!*

समर्थ म्हणतात..

रामराया...माझ्या शरीरातले जीभ,तिने प्रकट केलेले उच्चार आणि त्यायोगे निर्माण होणारे संभाषण अर्थ यावर सगळी आयुष्यातली मदार आहे.तीच हे स्वरूप कोमल असावं असं समर्थ म्हणतात.निग्रह सुद्धा निक्षून सांगावा लागू नये इतका सहजपणे व्यक्त व्हावा..!त्याला कोणत्याही हट्टाची किनार असू नये.अशी वाचासिद्धी मिळण्यासाठी समर्थ रामरायाकडे मागण मागतात.रामराया..माझी वाणी ही सोशिक,प्रेमळ,आल्हाद आणि नेमकी अशी दे..!!

समर्थ म्हणतात...

रामराया,वाचा किंव्हा वाणी यानंतर वेळ येते कृतीची.विमळता म्हणजे सहज आणि सहृदय.कोणीतही कृत्य हे सहृदय म्हणजे खलप्रवृत्ती शिवाय माझ्या हातून घडू दे.किल्मिष आणि कुटीलतेचा स्पर्श माझ्या कुठल्याच कृत्याला असू नये..!अशी कृत्य करायची बुद्धि मला रामा तू दे रे..!

समर्थ म्हणतात...

रामराया.. आयुष्य जगताना येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाची खरी ओळख मला करून दे.तो प्रसंग मला आरस्पानी बघायची कला मला मिळू दे.अनेक प्रसंग वरकरणी दुःखदायक वाटले तरी त्याचा गाभा,परिणाम सुखाचा असतो.किंव्हा अनेक प्रसंग सुख देणारे वाटले तरी त्यातून खेद, दुःख निर्माण होत.अशा प्रसंगाची नेमकी ओळख मला करून दे रे रामराया..!!

समर्थ म्हणतात..

रामराया..आयुष्यात अनेक वेळा असंगाशी संग होण्याची वेळ येते.अशा वेळी या अर्थहीन असंगी व्यक्ती,घटनांना बगल देऊन शुद्धता मनात जागती ठेवावी लागते.समाजात कुठल्याच घटकांना दुखावून चालत नाही.म्हणून एकप्रकारच चाणाक्ष,धूर्त अस वळण देऊन आपला मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित राखण हेच हिताचे असते.रामराया..मला अशा प्रकारची थोडी धूर्त बुद्धि ही दे रे रामा..!!

समर्थांना अपेक्षित एक पूर्णपुरुष,पूर्णमानव आहे.जो बहुआयामी आहे पण स्वतःशी प्रामाणिक आहे.सकृत आहे..!असा पुरुष बनणं हे त्यांच स्वप्न आहे..अशा अनेक पुरुष,स्त्रियांनी हा समाज परिपूर्ण असावा हा समर्थांचा ध्यास आहे..!!

श्रीराम..!

प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२