समर्थांची करुणाष्टके (३), कडवे दुसरे...

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे दुसरे...

समर्थ म्हणतात...

रघुनायक जन्मजन्मांतरीचा..
अहंभाव छेदूनि टाकी दिनाचा...
जनी बोलती दास या राघवाचा...
परी अंतरी लेश नाही तयाचा...!

रामराया...मी किंव्हा आम्ही सगळेच जन्माला येतो तेंव्हा सोहम वृत्ती सोडून कोहम वृत्ती धारण करतो..!कोहम म्हणजे मी आणि माझा मी..!मनुष्यजन्माला आलो तेंव्हाच हा मनुष्यपणाचा अहंकार माझ्या मनाला चिकटला..!

रामराया..हा अहंभाव,ही मनुष्यपणाची बेदरकार वृत्ती हीच माझ्या भक्तीच्या मुळाशी आलेली आहे..!रामा तूच आता माझ्या मनातल्या अहंभाव समूळ नष्ट करून आत्मारामापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवशील का रे..?

रामा..मी जगताना तुझे नाम घेतो,तुझ्या ध्यानात असतो,तुझ्या सेवेत असतो..हे सगळं बघून माझ्या भोवतीचे माझे सगेसोयरे मला तुझा म्हणायला लागले आहेत..!मी तुझ्यात रमलोय अस म्हणायला लागले आहेत..माझी ओळख तुझे समचरण असे समजायला लागले आहेत..!

रामराया..हे सगळं असलं तरी तुझे मूळ स्वरूप आहे..सगुणाच्या पलीकडचं  जे निर्गुण निराकार रूप आहे त्याच अस्तित्व अजूनही मला कळत नाहीये..!

रामकृपा ही रामदासाच्या बाह्य वागणुकीवर नाही तर भक्ताच्या आत राम किती पोहोचलाय..त्याच्यातला आत्माराम किती प्रकट झालाय..?यावर अवलंबून असते.आणि ती अवस्था येण्यासाठीची समर्थांची तळमळ आपल्याला इथे दिसून येते..!
हा आत्मस्वरूप राम आपल्या सर्वांच्या ठायी प्रकट होवो ही समर्थचरणी प्रार्थना..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (3), कडवे पहिले...

समर्थांची करुणाष्टके (3)

कडवे पहिले...

समर्थ म्हणतात...

नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही..
नसे प्रेम हे रामविश्राम नाही..
असा दिन अज्ञान दास मी तुझा..
समर्था जनी घेतला भार माझा...!

रामराया...माझ्या अज्ञानतेने मला तुझ्या भक्तीचे मार्ग माहित असले तरी सुद्धा त्याच आचरण कस करायचं हे कमीच कळत.तुझ ध्यान,तुझं मनन करायचं असत,भक्त करतात हे मला ही माहिती आहे पण त्याच अनुकरण कस करायचं हे कळत नाही..!

रामराया..तुझ्याबद्दल ची माझी भक्ती,तुझ्याबद्दलची माझी ओढ मी तुला कळेल अशा प्रकारे मांडू शकत नाहीये.तुझ्या धामी पोहचल्यानंतर तिथे मला जे सुख मिळेल त्याची गरज मी तुझ्याजवळ व्यक्त करू शकत नाही..!

रामराया...इतका हतबल मनाचा अतिशय विकल अवस्थेत मी माझ्या अज्ञानाने पिडलेलं असलो तरी मी तुझा दास आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे..!

रामराया...इतक्या सगळ्या अवगुणातून माझं आयुष्य चाललेल आहे..मी जगतो आहे याला कारण म्हणजे माझ्या भोवतीच्या तुझ्या खऱ्या भक्तांनी,समाजाने माझा भार घेतलाय..!त्या पुण्याईने मी या भवसागरातून सहजपणे तरून जातोय..!

समर्थ आपल्या उपासनेच श्रेय ही स्वतः घ्यायला तयार नाहीत.करवून घेणारा राम, करणारा आत्माराम, सांभाळ करणारा समाजराम(समाजपुरुष).

मिळवलेल्या पुण्याईच एवढं अर्ग्य आपण इतक्या सहजतेने सोडू शकू का..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे करुणाष्टक (२), कडवे आठवे...

समर्थांचे करुणाष्टक (२)

कडवे आठवे...

सदा सर्वदा राम सांडून कामी...
समर्था तुझे दास आम्ही निकामी..
बहु स्वार्थबुद्धीन रे कष्टवीलो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो...!

रामराया...तुझ्या भक्तीने,तुझ्या उपासनेत असावं हे खरं प्रत्येक मानवाच ब्रीद..!हेच खरं त्याच कर्तव्य..!पण काम नावाचा एक दैत्य ही उपासनेत कायम बाधा आणायच प्रयत्न करतोय..!
प्रत्येकवेळी माझं ध्यान,माझं पूजन हे काम नामक दोरखंड मागे ओढू पाहतोय..!

रामराया..तुझे दास म्हणून आम्ही आम्हाला मिरवतो..!भक्त म्हणून स्वतःला बिरुद लावतो..!पण मला आतून कळतय,समजतंय की या  सगळ्याला मी लायक नाहीये..!त्यादृष्टीने माझे अस्तित्व निरूपयोगी ठरत चालले आहे..!

रामराया..माझ्याभोवती चाललेले मला भुलवू पाहणारे हे सगळे भौतिक स्वार्थचे खेळ मला माझं मन दोलायमान करून,त्यासाठी माझी शाररिक,मानसिक दमछाक करून मला म्हणजे माझ्या आतल्या भक्तीतत्वाला तुझ्यापासून दूर ठेवून वैषम्य देऊ पहात आहेत..!

रामराया...त्यामुळे या सगळ्या ओढताणीची परिणीती माझा हा झालेला जन्म केवळ व्यर्थ जाणार असे वाटू लागले आहे..!

रामराया..माझी ही व्यर्थता शाब्दिक उपासनेतून  तुझ्याकडे व्यक्त करतोय..!तूच आता माझ्या या व्यर्थतेतून मला सोडवून माझ्या आयुष्याची यथार्थता माझ्यावर कृपा करून माझं आयुष्य कृतार्थ करून देशील याची खात्री आहे..देशील ना..?

श्रीराम...!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे करुणाष्टक (२) , कडवे सातवे...

समर्थांचे करुणाष्टक (२)

कडवे सातवे...

समर्थ म्हणतात...

किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती..
किती धर्मसंस्थापना अन्नशांती..
परस्तावलो कावलो तप्त झालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया..तुझ्या भक्तीत तल्लीन झालेले..योगसमर्थ्याने स्वतःच्या शरीर आणि मानसिक आवश्यकतांना नियंत्रित केलेले असे कितीतरी योगी,हठयोगी,पुण्यमूर्ती,कैवल्यमूर्ती तुझ्या दर्शनासाठी तुझ्या कृपेसाठी तिष्ठत तुझी आराधना करतायत..!

रामराया..तुझ्यासाठी पुण्यकार्य करताना अनेकांनी अनेकमार्ग स्वीकारलेत..काहीजण अन्नछत्रे चालवतायत..कितीजण भजन,प्रवचन,कीर्तन यामार्गाने धर्मसंस्थापना करून पुण्यसंचय करतायत..!

रामराया...या सगळ्यांचे दर्शन घेतो.त्यांच्याबद्दल माहिती होते...तेंव्हा मला माझ्याबद्दल पश्चाताप होतोय..!मला माझाच प्रचंड राग येऊ लागलाय..मी का तस होऊ शकत नाही.?या जाणिवेने मी दग्ध होतोय..आणि ती धग माझ्या आयुष्याला दग्ध करू पहातेय..!

रामराया..म्हणून मला अस वाटू लागलंय की ह्या दग्ध देहाला तुझी कृपा मिळू शकत नाही..तर माझा हा जन्म व्यर्थ जाऊ लागला आहे..!

समर्थ परमेश्वर प्राप्तीचे मार्ग सांगून स्वतःला ते अवलंब करता येत नाहीयेत याची खंत व्यक्त करतायत..!
इतका हा उत्तुंग धर्मकार्य,समाजकार्य करणारा महासंत रामाजवळ ही खंत व्यक्त करतोय,म्हणजे रामकृपे साठी किती विनय अजून आपल्यात यावा लागेल याचा आपण सारे विचार करू शकतो..!!

श्रीराम..!


©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२