Karunaashtke 4

समर्थांच करुणाष्टक...
चौथी पायरी..
चौथ कडवं..

समर्थ म्हणतात...

तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे..
तुजविण मज वाटे सर्व संसार ओझे..
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी..
अचल भजनलीला लागली  अस तुझी..

अत्यंत वस्तुस्थितीपुर्ण पण भक्तीयुक्त मागणे..!या जगात जगण्यासाठी, करण्यासाठी जे जे शुद्ध पद्धतीने करावे लागते करताना,ज्याला प्रपंच म्हणतात,हे समर्थ कधीच नाकारत नाहीत.

प्रपंच,गृहस्थाश्रम या सगळ्यात आपलं शरीर,मन,धन याची आवश्यकता असते.यातल्या प्रत्येक गोष्टीला सांभाळावे लागते..!त्यांचे लाड करावे लागतात...त्यांची मर्जी सांभाळावी लागते..!

पण समर्थ हे सगळं करताना या तिन्ही गोष्टी राम च आहेत हे समजतात..!
या शरीरात आत्माराम वसतो..!तो जिवंतपणा ची जाणीव देतो..!या मनात रां या बिजाक्षराच्या रुपात जो राम वसतो तो चैतन्य देतो..!आणि कष्टाच्या रुपात जो लक्ष्मीरुपात जो राम असतो तो मिळण्याऱ्या मोबदल्यात,धनात असतो..!

सारी रामाचीच रूप..!

प्रत्येक गोष्टीत रामाचं अस्तित्व शोधण ही रामाची अनन्य भक्ती..!
प्रभू रामरायांनी दिलेल्या कंठींकेत,प्रत्येक मण्यात तो फोडून राम शोधणारा हनुमंत समर्थांचा आदर्श..!

ज्याच्यात राम नसेल ती वस्तू,जागा,मोह,आयुष्य समर्थाना विलक्षण परक होत..!
किंबहुना रामस्पर्श नसलेल अस्तित्व त्यांना पूर्ण त्यागमय होत..!

अशा गोष्टींच,वस्तूंच ओझं समर्थाना कधीच मान्य न्हवत..!

पण अनेकवेळा अस होत की व्यवहार म्हणून अशा गोष्टी माणूस मान्य करू लागतो..!
अशा गोष्टी ज्यात राम नाही,सत्व नाही अशा गोष्टी केवळ लोकानुनय म्हणून कराव्या लागतात अस आपण मानतो..!

समर्थाना याच धोक्याची पूर्ण जाणीव आहे..!अस रामविरहीत आयुष्य माझ्या अंगवळणी पडून देऊ नकोस ही समर्थांची रामकडे मागणी स्वगुणपरीक्षेचा एक नवीन आयाम आहे..!

त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अचल अस तुझं अस्तित्व शोधायची,तुझं गुणगान गाणार माझं मन अस्तित्वात आणणार अस मन रामा तूच मला देशील अशी खात्री आहे..अस समर्थ म्हणतात..!

अस एक अबाध्य वळण माझ्या बुद्धीला,दिनचर्येला मिळो..!

अस समर्थांच रामाजवळ कळकळीने मागण..!!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtke 3

समर्थांच पहिलं करुणाष्टक
आज तिसरी पायरी..
तिसर कडवं...

विषयजनित सुखे सौख्य होणार नाही..
तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही
रविकुळटिळका रे हीत माझे करावे
दुरीत दुरी हरावे सस्वरूपी भरावे..

समर्थ कायमच संन्यस्त जीवन जगले..!विषयसुखाच्या पल्याड असलेला हा अवलिया एकच आसक्ती बाळगून होता ती म्हणजे रामप्राप्ती..!

बर ही निरिच्छता त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी प्राप्त झाली होती आणि तरीही हा महापुरुष अजूनही म्हणतोय की विषयजनीत सुखे सुख नाही..!निरिच्छतेची अजून एक पायरी..!दर्शनाची अभिलाषा ही सुद्धा एक आशाच..!माझ्यावर कृपा कर हे म्हणणं ही एक स्वार्थ च..!
रामराया तुझं दर्शन गोड नक्कीच आहे..पण तुझ्यात सामावण्या इतकं ते मनोहर नक्कीच नाही..!रामकृपे पेक्षा राममय होणं हे छान..!
म्हणून समर्थ सांगतात की तुझ्यावीण सगळच बेचव आहे..!अगदी तुझी कृपा,तुझा वरदहस्त ही..!
त्यामुळे रामरायाला वाहिलेला हा समर्थ देह त्याचं अंतिम हीत कर अशी प्रार्थना करतोय..!
जो रामराय कृपाळू, कनवाळू,दयाळू आहेच..सौख्यदायी आहेच..
पण तरीही अपेक्षा अशी आहे की त्या रामरायाने ह्या सगळ्यापेक्षा स्वतःच्या सस्वरूप करून हा देह संपवावा..!!

समर्थ रामरूप असून सुद्धा रामस्वरूपा साठी किती आसुसले होते,किती आतुर होते..!

ही आतुरता पाहिजे..!

अंतिम हीत हे कळलं पाहिजे.सुख हे हीत नक्कीच नाही..!

भक्ती असणे आणि ती भक्ती अनुभूतीपर्यंत पोहचवणे याचे रोखठोक मार्ग समर्थानी त्यांच्या साहित्यात अनेक दाखवलेत..!
समर्थानी रामाप्रति असलेल्या अमाप भक्तीच वर्णन ही तितक्याच नेमकेपणे केलं आहे..!
सुख दुःखाच्या पलीकडे असणारी समचरणी अवस्था म्हणजे अंतिम सुख..!

शेवटच्या ओळीत समर्थ रामाचं वर्णन रविकुळटिळका अस करतात..!

रामाचं तेजस्वीपण जस सूर्यकुळाची ओळख आहे तशीच ओळख रामा तुझ्यावरच्या भक्तीने माझी होऊन माझ्यावर विरक्तीच,मुक्तीच तेज दे..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtke 2

दुसऱ्या कडव्यात समर्थ म्हणतात...

भजनरहीत रामा सर्वहि जन्म गेला..
स्वजनजनधनाचा वेर्थ म्या स्वार्थ केला.
रघुपती मती माझी आपुलीशी करावी..
सकळ त्यजूनि भावे कास तुझी धरावी..!

काय मजा आहे बघा समर्था सारख अनन्य भक्त ज्यांना रामकृपा,हनुमंतकृपा,दत्तात्रय कृपा दर्शनासहित प्राप्त झालीये ते म्हणतायत की भजनरहित रामा सर्वही जन्म गेला..!
किती अद्भुत आणि विनयशील आहे हे त्यांचं मागण..?
कस असतना..?
आपल्याला संसार असतो,नाती असतात, काळज्या ही असतात..सुख असत,दुःख ही असत..!
असायलाच हव..आपण माणूस आहोत..!!
ह्या सगळ्यातून आपण आपल्याला जमेल,रुचेल,आवडेल तशी भक्ती ही करतो..आणि आपण स्वतःला भक्त म्हणवतो..!
पण समर्थ ज्यांच्या श्वासात राम होता त्यांनी स्वतःवर भजनरहित होण्याचा आरोप का बरं ठेवला असेल..?

आपण ना मनुष्याच्या कृतीत उणेपणा शोधतो..आणि समर्थासारखी द्रष्टी व्यक्ती स्वतःच्या वृत्तीतला नसलेला उणेपणा शोधून तो बोलून रामसमोर शरण जाते..!

हे असे आपण कितीवेळा करतो..?

समर्थ जसे अत्यंत विरक्त वल्ली होती तसेच ते लोकोत्तर संत ही आहेत..!त्यावेळची परिस्थिती ही खूपच विचित्र होती..!यवनांच्या अधिपत्याखाली हे राष्ट्र होते..यातून बाहेर पडण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते समर्थानी केलं..!अनेक माणस जागी केली,त्यांच्यातली स्वातंत्र्य उर्मी जी मरगळून पडली ती त्यांनी पुन्हा जाजवल्य केली..त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर अखंड तजविजा आणि राजकारण केले..!ही सगळे धकाधकीचे मामले तीक्ष्ण बुद्धीने करत असताना त्यांचा मूळ पिंड जो रामदासाचा होता,रामशरण्याचा होता तो काही निमिष दूर गेला असेल..!
समर्थ त्या काळाविषयी बोलतायत..!या सगळ्यातून रामा या जन्मात मला तुझ्यासाठी खूपच कमी वेळ मिळाला रे..!
आपल्या आणि परक्या माणसांची परीक्षा करत,त्यांची खरी ओळख समाजाला पटवत,अखंड पायपीट या उत्तुंग जीवनात अनेक आपल्यापरकीयांना जवळ ही करावं लागलं..अंतर ही द्यावं लागलं..!रामा तुझा विचार न करता त्यांचा विचार,त्यांच्या बद्दलचे आडाखे करण्यात मी माझा स्वार्थ साधत गेलो..!हे सगळं करता करता कित्येक वेळा मी तुझ्या आस्थेपासून,तुझ्या अस्तित्वापासून दूर गेलो,स्वार्थीपणे वागलो ना रामा मी..?बर त्यात मनुष्य असल्याने पोटाचा,भुकेचा स्वार्थ तरी मला कुठं चुकला?? त्यातही मी फक्त माझा विचार करत गेलो..
मला माहित होतं हे सगळं वेर्थ आहे..तुझ्या अस्तित्वाशिवाय काहीच महत्वाच नाही..!जरी मी केलं नाही तरी माझ्याकडून तू करवून आहेस..तरीही या स्वार्थी पणातून जन्म मी घालवला..!
रामा आता तरी माझी ही बुद्धी बदलून दे..मला आता तरी शिकव की हे सगळं करत असताना तुझ्या केशरी शेल्याच छत्र मी कस धरून ठेवायचं.?किंबहुना हे ही सांग की हे सगळं सोडून तुझं फक्त तुझंच चिंतन कस करता येईल..?

समर्थ हे समर्थ का आहेत हे अशावेळी  कळत..!
आपल्या आयुष्याचा हिशोब ते रामासमोर खुलेपणाने मांडून राहिलेली उणीव जोडण्याची रामसमोर विनंती करतात..!हे आपले समर्थ..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Chaitra Shuddha Pratipada (Gudi Padwa )

आजपासून नऊ दिवस रामरायाच नवरात्र पाळूया आपण...


समर्थाची रामाला उद्देशून लिहिलेली करुणाष्टके ..
रोज एका कडव्याच निरूपण...
थोडं लिहिणार आहे मी त्याबद्दल..तस प्रत्येक अष्टकाबद्दल,त्यातल्या प्रत्येक कडव्या बद्दल लिहायचं तर बुद्धी पुरणार नाही..
पण तरीही प्रयत्न करतोय...!

श्रीराम समर्थ

रामनवमी आणि त्या आधीचे आठ दिवस हे रामपर्व,रामनवरात्र म्हणून ओळखले जातात..!
रामकृपेचे दिवस..रामसहवासाचे दिवस..!

आजपासून नऊ दिवसांनी नवमीचा दिवशी राम जो मूर्तीत आहे तो मनात,आयुष्यात,घरात पुन्हा यायचा दिवस..!
सगुणातून सजीवतेत तो राघव येणार..!
समर्थानी केलेली करुणाष्टके ही राम अवताराच्या आधी आपली मानसिक पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आपण अनुभवू शकतो..!

राम येणार ना..?

तो येणारच पण आपली तयारी काय..?
करुणाष्ट्कात समर्थ रामाला साद घालताना स्वतः अनुदिन,अनुतापे तापलोय अस सांगतात..!अनुतापाने दग्ध झालेलं मन रामाची पायवाट आहे ना..?
हे अष्टक असच..!

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया..
परमदिन दयाळा निरसी मोहमाया..
अचपळ मन माझे ना आवरे आवरीता..
तुजवीण सीण होतो धाव रे धाव आता.!


हे पाहिलं अष्टक आणि त्यातील पाहिलं कडवं...!
कित्येकवेळा कित्येक माझ्यापेक्षा श्रेष्ठ विभूती कडून हे तुम्ही ऐकलं असेल..नव्हे नव्हे स्वतः वाचलं आणि म्हंटल ही असेल..!
शुद्ध मराठीत असलेलं ही रचना वेगळी काय सांगणार अस जर आपण म्हणत असाल तर एकच उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला या अष्टकाचा गर्भितार्थ कळेल..!

..आपण अनेक वेळा घरातून,स्वैपाकघरातून अहो ऐकलत का? हे ऐकलं असेल..
या तीन शब्दाचे किती अर्थ असू शकतात..?
काहीजण सहजपणे आलो म्हणतील..काहीजण आता काय नवीन अस म्हणून काळजीत पडतील..काहीजण हीच नेहमीचंच आहे असं म्हणून दुर्लक्ष करतील.. अस खूप काही..!

एवढ्या एका वाक्यात इतके गर्भितार्थ आणि निर्णयात्मक विचार असू शकतात..तर समर्था सारख्या चतुरंग पुरुषाने लिहिलेलं..आळवलेल किती गूढ असेल..?

या अष्टकात समर्थ
आपल्याला शबरी व्हायला शिकवतात.!
हो आपण शबरी झालो तरच राम येतील ना..?
समर्थ म्हणतात...
राम येण्यासाठी आपलं मन अनुतापी होऊ दे...आणि ते ही अनुदिनी..!

अनुताप म्हणजे दुःख नाही बर का..?तर अनुताप म्हणजे स्वतःच्या मनात सगळं असूनही दाटलेली हुरहूर..अस्वस्थता.. रामप्राप्ती ची ओढ..आणि भौतिक जगाबद्दलची उदासीनता..!

अनुदिनी सुख असून ही जी अपूर्णता असते तिला रोज वाट मोकळी करून देता येत नाही..!
हा अनुताप भौतिक नात्यात कुणाला सांगता येत नाही..या अनुतापाचा शेवट ही रामाची प्राप्ती किंव्हा प्रसन्न होणं..!

आपण देवळात येतो..कदाचित रोज येतो..पण मनाशी प्रामाणिक पणे आपण विचार करूया हे मंदिरात आपलं येणं हे आपसूक असत की ठरवून असत..?निर्हेतुक असत की सशर्त असत..!
आपण मोहमाये सकट रामाकडे येतो..!
बर इथं येतो आणि नमस्काराचा उपचार करून परत ही घेऊन जातो..!मग या मंदिरात येऊन आपण मिळवतो काय..?अनुताप हा कधीच असत नाही यामुळे..!
आजपासून अस करूया..रिक्त मनाने येऊ या मंदिरात..आणि जाताना राममय होऊन जाऊया..!मागायचं ही नाही आणि प्रदर्शन ही करायचं नाही..!

आणि मग आपल्या न कळत आपल्या भोवतीच्या मोहमाया असतील तर त्या नष्ट करायची बुद्धी आणि कृती राम च देईल...!

त्या जाळून टाकणारा राम नवमीला येतोय.!रामाला पुर्ण पुरुष म्हणतात..प्रत्येक नात्याला न्याय देणारा ..प्रत्येक नात जिवंत ठेवणारा राम..!

अवघड असत मोहमाया टाळून नात जगवण..खर तर अपेक्षा असते म्हणून नात जन्म घेत !या जन्माभोवती,नात्याभोवती,कर्तव्याभोवती घिरट्या घालणार आपल मन कधीतरी थकतच..!
तो रामराय येणारे ना..त्याच्या मांडीवर आपण हे मन,बुद्धी शरणगतेची उशी ठेवायची..!

आपल्याला माहीत आहे का राम हा एकमेव देव असा आहे ज्याला मनुष्यपणाची सगळी दुःख भोगायला लागली..!
आपण रामाला देवस्वरूप नको ठरवायला..आपण रामरायाला मैत्र करूया..आयावबहिणीनी माहेर ही करावं..तरुणी नी या रघुपतीला सखी करावं ना..तरुणांनी एक बलशाली आदर्श करावं..
वृद्धांनी आयुष्याचा घालवलेला काळ राम करावा...
असा जर राम करता आला ना..आपल्यात समावता आला न..तर राममय वृत्ती आणि त्याप्रमाणे त्या रघुराजाला आवडणार राममय आयुष्य आपल्याला ही जगता येईल..!

येता जाता राम नाम जपणाऱ्या आपल्यासारख्या जेष्ठ माणसांना हे सांगणे कदाचित अनुचित असेल पण भजनरहीत जन्म गेला अस म्हणताना आपण विचार करूया की मुखाने रामनाम घेत असताना किती काळ आपण तो राम आपल्या चपळ मनात   जागत ठेवला..!
मी आठवणीत नाही जागत ठेवला अस म्हणतोय..!
कारण अस आहे की या चपळ,सदा धावपळीच्या आयुष्यात जर आठवणी पेक्षाही राम मनात जागता असेल तर मन,शरीर कधीच दमू शकत नाही.आणि हे आपल्याला पटत जेंव्हा मन अनुतापी होते..आणि दुर्दैव अस की बहुतांशी तो आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध,वृद्धापकाळ असतो..!सर्व जन्म निघून गेलेला असतो..!
गात्र तशीही थकलेली असतात..अशावेळी हा अनुताप नाईलाजाने येतो..!
अस नको ना व्हायला..!
नाईलाजाचा अनुताप नाही तर श्रद्धेतून जन्माला येणारा अनुताप समर्थ रामासाठी तुमच्याकडे असावा असं सुचवतायत..!

तो रघुराज आपल्याला दिसण्यासाठी आपली पहिली पायरी आजच्या दिवशी ..अनुदिन अनुताप..!!🙏

©प्रवीण कुलकर्णी