समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ८) (भाग १)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ८*

*भाग १*

*तोवरी तोवरी डगमगिना कदा..|*
*देहाची आपदा झाली नाही.||१||*

*तोवरी तोवरी परमार्थ स्वयंभु..|*
*जव पोटी लोभ आला नाही..||२||*

समर्थ म्हणतात..

मनुष्य तोपर्यंत शूर असतो.आपमग्न असतो.स्वतःच्या गुणगान करण्यात मश्गुल असतो.स्वतःची प्रौढी,योग्यता,आर्थिक स्थिती सांगण्यात पुढे असतो..!

जोपर्यंत देहाला कोणताही त्रास होत नाही.जोपर्यंत स्वतःला मानसिक तोशीस लागत नाही.वार्धक्याची चाहूल लागत नाही.स्वतःच प्राकृत बिघडत नाही..!

समर्थ म्हणतात..

तोपर्यंत आपला संसार,आपले नाते संबंध,आपले गणगोत,आपले सुखासीन जीवन याबाबतीत अतिशय अभिमानी असतो.

जोपर्यंत त्याच्यासमोर कुठल तरी वैभव की जे त्याच्यापेक्षा ही मोहक,उठावदार आणि लोभ होऊ शकेल अस समोर येत  नाही.अशा मनुष्याच स्वमग्नता ही डळमळीत असते.पोकळ असते.

समर्थ मनुष्याच्या नेमक्या स्वभावाच्या वर्मावर बोट ठेवतात.मनुष्याला देव,धर्म,कृपा यांची तेंव्हाच आठवण येते.जेंव्हा तो अस्वस्थ होतो.जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत तो स्वतःच्या कर्तृत्वात अभिमानी रहातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ७) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ७*

*भाग २*

*जन्मभरी धरिले तुज हृदयी ..|*
*आता या समयी पावे बा..||३||*

*निष्काम ती तुज सेवायाची आशा..|*
*अंती रामदासा सांभाळावे..||४||*

समर्थ म्हणतात..

रघुराजा...आयुष्यभर तुझे पूजन,तुझी उपासना,तुझा नामजप याशिवाय आम्ही वेगळं काय केलंय रे..?तुझी उपासना,दर्शन म्हणजे आमचा निजध्यास..!तुला हृदयापासून आळवले आहे.तुझे संकीर्तन केले आहे..!

समर्थ म्हणतात...

रघुराजा..या संकीर्तनाचे फळ हे तुझे निरंतर धाम आहे हे आम्ही अनेक सत्पुरुषांकडून ऐकले आहे.आणि ते आम्हाला ही मनापासून पटले आहे.आता तुझी कसोटी आहे की या अंतिम क्षणी तू तुझी ही महती खरी करणार ना..?

समर्थ म्हणतात..

तुझं संकीर्तन, पूजन हे निष्काम करायचं हे आम्हाला अनेक ऋषी,महंत आणि ज्ञानी जनांकडून उमजले आहे.आणी तशीच निर्विकल्प,निष्काम उपासना आमच्याकडून घडावी असा आम्ही प्रयत्न ही केला आहे.

समर्थ म्हणतात..

हे सगळं यासाठी की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी श्वासांचे स्मरण विसरेल त्यावेळी तुझ्या सस्वरूपात स्थान मिळेल.तू दास म्हणून आमचा सदेह स्वीकार करशील..!आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून वाचवून तुझ्या धामी आम्हाला कायमचा आश्रय देशील..!हो ना रामराया..?

समर्थ निष्काम उपासनेचे अंतिम सकाम फलित इथे समजावत आहेत.तसेच दास्य भक्ती ची परिणीती सख्य भक्तीत कशी होते याचेही विवरण ते या अभंगात प्रस्तुत करत आहेत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ६) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ६*

*भाग २*

*तुज समुदाय दासांचा..*
*परी आम्हा स्वामी कैचा.|*
*तुजसाठी जिवलगांचा.*
*संग सोडीला..||३||*

*सगुण रघुनाथ मुद्दल.*
*माझे हेचि भांडवल..|*
*दास धरून पैलपार..*
*टाकी या भवाचे..||४||*

समर्थ म्हणतात...

रघुराजा..तुझ्याभोवती नेहमीच तुझ्या भक्तांचा मेळा असतो.तुझं संकीर्तन, तुझं पूजन या योगी तुझ्याभोवती कायम योगी,तापस,भक्त यांचा वावर असतो.आणि असणारच..!
हे जरी सत्य आहे तरी मीही तू माझा स्वामी आहेस याच निष्ठेने तुझ्या दारी आलो आहे.तुझ्याशी अनुसंधान जोडून आहे.

समर्थ म्हणतात...

रघुराजा..आम्ही तुझ्या भक्तीच्या आधारे आमचे  सगेसोयरे बाजूला ठेवून तुझ्या पदकमलाच्या सान्निध्यात आलो आहोत.आणि आता निग्रहाने तिथेच आयुष्य वाहून आहोत.

समर्थ म्हणतात...

रघुराजा..कारुण्यसिंधु असा तू राम हीच आमची आता मिळकत,तुझं नाम हेच चलन आणि तुझा आशीर्वाद हीच उपजीविका आहे.तुझी जी वेगवेगळी नामाभिधाने आहेत तीच आमची आता बलस्थाने आहेत.

समर्थ म्हणतात...

रघुराजा..हेच आमचे दास्यत्व आता मान्य कर.आमचा समूळ स्वामी होऊन आमच्या सुकृतातल जे वैगुण्य आहे ते मिटवून घे.आणि आमची की आयुष्याची वाटचाल या भवसागरातून काढून परमार्थाच्या विहंगम अशा तीर्थक्षेत्री आणून आमच्या  आयुष्याचा उद्धार कर.

समर्थांनी रामरायाला सर्वस्व केलं आहे.जगवता,राखता राम तसाच सांप्रत व्यवहार ही राम च आहे.आणि हा व्यवहार पाळून ते परमार्थात मुक्तीचा फायदा करून देण्याची रामरायाकडे प्रार्थना करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ६) (भाग १)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ६*

*भाग १*

*रामा तुझ्या स्वामीपणे*
*मानी ब्रम्हांड ठेंगणे..|*
*तुजवीण कोण जाणे..*
*अंतर हे आमुचे..||१||*

*तुजवीण मज माया..*
*नाही नाही रामराया..|*
*आम्हाअनाथा कासया.*
*उपेक्षिसी..||२||*

समर्थ म्हणतात...

रघुराजा तू माझा सर्वकाही आहेस.माझं जीवित्व,माझं व्यक्तित्व,सारे व्यवहार हे तुझ्या आधिपत्याखाली आहेत.तू नियंता आहेस.तू त्राता आणि तूच निवारा आहेस.

समर्थ म्हणतात..

रघुराजा तू माझा स्वामी म्हणजे मी तुझा दास आहे.आणि हे दास्यत्व इतकं विलोभनीय आहे की सर्व सुखाच शिखर स्वर्ग सुख आणि ब्रम्हांड मालकीचं सुख हे खूपच कोत वाटत.अपूर्ण वाटत.हे दास्यत्व म्हणजे सुख,दुःख याच्या पलीकडचा परमानंद म्हणजे हे दास्य सुख आहे.

समर्थ म्हणतात..

रघुराजा..तुझ्याविना कोणत्याही आनंदच मायाजाल हे ठेंगण च आहे.तुझी भक्ती,तुझं पूजन,तुझं नामस्मरण हे सारं या भौतिक मायेच्या पलीकडच मायासुख आहे.आणि माया सुद्धा परब्रम्ह माया असल्याने अलौकिक आणि अतुलनीय आहे.यापेक्षा कोणतीही सुख माया असू शकत नाही.

समर्थ म्हणतात..

रघुराजा..ही तुझी माया,तुझं स्वामित्व मला मान्य आहे.मग परमार्थ मार्गात असे अनाथ अवस्थेत आम्ही का आहोत.?तू आम्हाला अजून पोरकं का ठेवलं आहेस..?का आम्ही असे तुझ्या पूर्ण स्वामीत्वा पासून वेगळे आहोत.?

समर्थ रामकृपा आणि त्याची सावली यांची तुलना शाररिक,मानसिक,सामाजिक मायेसी करतात.आणि त्यात निर्णय देतात की रामाच्या स्वामीपणा पेक्षा या सगळ्या भौतिकतेची किंमत शून्य आहे.त्याचा आयुष्याला काहीही उपयोग नाही.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ५) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ५*

*भाग २*

*वेदशास्त्री अर्थ शोधोनी पाहिला..|*
*त्याही निर्धारिला भक्तिभाव..||३||*

*रामी रामदासी भक्तीच मानली..|*
*मने वस्ती केली रामपायी..||४||*

समर्थ म्हणतात..

वेद, उपनिषदे,पुराणे ही सगळी अशा निस्सीम भक्तीचे स्रोत आहेत,ज्यात त्या निर्गुण अशा परमेश्वराची स्तुती आणि सगुणाच पूजन याच वर्णन आहे.आणि या दोन्हीच मूळ ही पराकोटीची भक्तीच आहे.

समर्थ म्हणतात...

अनेक ऋषी,मुनींनी या साऱ्या धर्मसहित्यात भक्तीचे अनेक दाखले,त्याचे त्या त्या काळातील मंत्र,ऋचा यातून होणारे सकृत परिणाम याचीच महती गायलेली आहे.

समर्थ म्हणतात..

आम्ही रामदास झालो हा या भक्तीचाच परिणाम आहे.जी भक्ती वर्षानुवर्षे आमच्या कुळात आहे.जी भक्ती या रामादी अवतारांनी त्या त्या अवतारकाळात अजून बळकट आहे हे या पृथ्वीवर अवतार घेऊन सिद्ध केलं आहे.

समर्थ म्हणतात..

आता ही राममय भक्ती इतकी आयुष्यच एक भाग बनून गेली आहे की तिने मनातील प्रत्येक इच्छेचा ताबा घेतला आहे.या भक्तीचा आधार हा रामचरणाशी एकरूप होईपर्यंत असेल इतकी ती मनात सुदृढ झाली आहे.

समर्थ निस्सीम भक्तीचा आदर्श घालून देतायत.भक्तीचे अध्यात्मातील स्थान,परमार्थामध्ये योग्य अशी वाटचाल ही भक्ती आचरून हे आयुष्य सफल आणि सुनंदन करून देते अस समर्थ सांगतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ५) (भाग १)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ५*

*भाग १*

*सगुणाकरिता निर्गुण पाविजे |*
*भक्तीविण दुजे सार नाही.||१||*

*साराचे ही सार ज्ञानाचा निर्धार..*
*पाविजे साचार भक्तियोगे..||२||*

समर्थ म्हणतात...

आपल्याला सगुणतत्वातली भगवंत मूर्ती समोर दिसते.ती आपण भजतो.पूजन करतो.पण त्यात जे देवत्व विराजत असत ते निर्गुण असत.खर म्हणजे हे पूजन असत ते निर्गुणाच असत पण ते सहज प्राप्त नसत म्हणून सगुणाचा आधार घ्यावा लागतो.

समर्थ म्हणतात..

या सगुणाची पूजा,आराधना करत जर निर्गुणाच दर्शन घ्यायचं असेल तर त्याला अनन्य भक्तीचा मार्गच योग्य आहे.ते निर्गुण अस ब्राम्हतत्व आपले इप्सित असलं पाहिजे.आणि ते ह्या सगुणाची भक्ती करतच प्राप्त होत.

समर्थ म्हणतात..

साऱ्या शास्त्रांच सार हे ब्रम्हतत्व,निर्गुण देवतत्वांपर्यंत पोहचण्यासाठी धरलेली ज्ञान संपादनाची कास हेच आहे.ही भक्ती साधक,मुमुक्षु वृत्तीच त्या निर्गुणापर्यंत घेऊन जाण्यासाठी उत्तम असे माध्यम आहे.

समर्थ म्हणतात..

या ज्ञानयज्ञाची पूर्णाहुती ही अनन्य भक्तीच्या श्रीफलाने असेल तर सगुणातून निर्गुण तत्वाच ज्ञान अतिशय सुनिश्चितते ने प्राप्त होत.आणि ही भक्ती आचार,विचार आणि साकारते ने अधिक प्रकर्षाने कृतार्थता आणते.

समर्थ या अभंगात निर्गुणाचा अप्राप्य मार्ग सगुणाच्या वाटेवरून कसा सोपा करता येईल याच मार्गदर्शन करतात.अर्थात या मार्गावर ज्ञानाची सोबत ही अखंड असावीच लागते.त्याशिवाय ते निर्गुण अस ब्रम्ह त्याची कवाड खुली करत नाही अस समर्थ सुचवतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२