समर्थांच करुणाष्टक (२), कडवे तिसरे...

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे तिसरे...

समर्थ म्हणतात...

सदा प्रेमरासी तया भेटलासी..
तुझ्या दर्शने स्पर्शने  सौख्यरासी..
अहंता मनी शब्दज्ञाने बुडालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो...!

रामा.. तुझी कृपादृष्टी ही किती भावुक आहे रे..जे जे भक्त मनातून तुझी सात्विक  आराधना करून तुझ्याशी एकरूप झाले अशा सगळ्यांना तू प्रेमभरे तुझ्या  सस्वरूपाची ओळख करून दिलीस.!त्यांच्या हृदयातल्या आत्मारामा पर्यंत पोहचण्यासाठी तू त्यांची साथ दिलीस..ते आत्मसुख,तो निजानंदी बहर तुझ्या भेटण्याने त्यांना मिळून गेला..!

रामा..तुझ्या नुसत्या दर्शनाने,तुझ्या कृपा स्पर्शाने सगळी भौतिक सुखे निष्प्रभ ठरून कायमची,आत्मसुखाची,परमेश्वर मिलनाची गाढ सुखराशी त्यांच्या पदरात तू रीती केलीस..!

रामा..मी मात्र माझ्या अल्पज्ञानाने काही थोडे फार ग्रंथ वाचून मी तुझ्या अनुभूतीला लायक झालो आहे असा अभिमानयुक्त गैरसमज करून घेऊन त्याच अज्ञानाच्या दिखाऊ अंधारात चाचपडू लागलोय..!
तुझं असणं हे शब्दाच्या पलीकडे,तुझं वर्णन शब्दातीत आहे हे विसरून फक्त शब्द माहीत झाले म्हणून तू मला समजलास इतक्या बेपर्वा बुद्धीने मी तुझ्या पासून दुरावत गेलो..!

रामा या सगळ्यामुळे,माझ्या या अभिमानाच्या ओझ्याने माझं या भूमीवर रहाणं  ओझं,भार आहे अस जाणवू  लागलं आहे..!

रघुवीरा..त्या सगळ्या संत,महंत,सज्जन व्यक्तींशी मला माझी तुलना करायची नाहीये.पण निदान त्यांच्या पर्यंत, त्यांच्या उंच भक्तीची पातळी गाठेपर्यंत तू मला लेकरू समजून समजावून घेशील ना??

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे करुणाष्टक (२), कडवे दुसरे....

समर्थांचे करुणाष्टक (२)

कडवे दुसरे....

बहु दास रे तापसी तीर्थवासी..
गिरीकंदरी भेटी नाही जनासी..
स्थिती ऐकता थोर विस्मित झालो..
तुझा दास रे व्यर्थ जन्मासी आलो...!

रामा..तुला मिळवण्यासाठी प्रत्येक जण तप करतोय फक्त प्रत्येकाची तपपद्धती वेगवेगळी..शाररिक कष्टाने,मानसिक कष्टाने..काहीजण जमेल तस तप करतायत..!
सगळ्यांच इप्सित,साध्य रामा तूच आहेस..!
अशा सगळ्या मानवाकडे,त्यांच्या वैयक्तिक तपाकडे बघून मला कुतूहल,आश्चर्य वाटत..!

रामराया..काहींची तप तर यापेक्षा कठोर असतात..!स्वतःच्या देहाला अतीव कष्ट घेत,स्वतःच्या सहनशक्तीची परीक्षा घेत..मानसिक शक्तीची परिसीमा गाठत हे तपश्री एकांतात,विजनवासात,गुहेत,कुटी बांधून समाजापासून दूर फक्त रामा तुझी आराधना करतायत..!
किती प्रकारे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री मला हेच दिसतंय..!

रामा..हे सगळं बघून माझ्यामनात खंतवजा आश्चर्य वाढू लागल आहे..!ही माझी आश्चर्यचकित अवस्था ही माझी तुझ्या दर्शनाची भूक जास्त वाढवतीये..!

रामा..पण हे सगळं मला अजून जमत नाहीये..!हे शाब्दिक,मानसिक तप पुरे पडतंय अस मला वाटत नाही..!
आणि मग माझं शरीर,माझी काया या जगात येऊन वाया चालली आहे..याची जाणीव होतीये..तुझ्याशिवाय माझं आयुष्य व्यर्थ चाललय हे कळू लागलंय..!!

समर्थाचे शब्द आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतात..!
आपल्याला जर हा जन्म व्यर्थ घालवायचा नसेल तर त्यांनी घालून दिलेली रामकृपेची पायवाट ही आपल्याला चाललीच पाहिजे..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

.... स्वामी.....

.... स्वामी.....

या शब्दानंतर कैवल्य,ज्ञान,आश्वासक कोमल नजर अस सगळं बुद्धी आणि नजरेसमोर येत..!

स्वामी म्हणजे ज्याच्यासाठी आपलं संपूर्ण सर्वस्व अर्पण करायची असते ती वंदनीय व्यक्ती..!

पण त्या स्वामींच्या दृष्टीने त्यांची स्वतःबद्दल ची व्याख्या म्हणजे एका त्या जगदिशापुढे जगातल्या बाकीच्या सर्वस्वाची पत्रास बाळगत नाहीत ते..!

अस स्वामीपण लेऊन आलेले परमपूज्य श्रीधरस्वामी यांची आज पुण्यतिथी..!

श्रीधरकुटी च्या केशरी उंबऱ्यावर माथा टेकून आत गेल्यावर माथ्यावरच्या लाकडी जुन्या तूळईकडे लक्ष जात..!
जाणवत कैवल्याची झुंबर ठायी ठायी जाणवतात..!

ठशीव बांधकाम आणि आतला मृदभाषी वावर..त्या बोलाचे प्रतिध्वनी अजून ही ऐकणाऱ्याला ऐकू येतात..!

बाहेरून आत गेल की निरव अशी शुद्ध सात्विक निरामय शांती जाणवते..!

काय असेल अस वेगळं तिथे??शांतिब्रह्म स्थिरावल असेल..?ओंकार शुद्धस्वरूपी राहिला असेल..?
स्वामींच्या वर्णनात्मक श्लोकात म्हणतात तशी ती निजतृप्ती इथे येऊन तृप्त झाली असेल??

इथे आलेल्या सगळ्यांनाच आयुष्यभर पुरणारा स्वानंद मिळून जातो..!

माझे वडील मला सांगतात की श्रीधरस्वामींचा हात त्यांच्या पाठीवरून कित्येक वेळा फिरला आहे..!
त्या स्वानंदाचा कैफ त्यावेळी त्यांच्या नजरेत दिसतो..!
तोच श्रीधरकुटीत आलो की अलुट लुटता येतो..!

इथल्या कणाकणाने स्वामींच अस्तित्व पाहिलंय..!त्यांची अनेक मंत्रमय,मौन अनुष्ठाने या वास्तूने पाहिली आहेत..!

शांत वास्तू.. दिव्य अनुभूती.
सत्य शिकवण..निजानंद निजरूप..!
स्वानंद ओळख..तृप्त मन..
श्रीधरस्वामी ते स्वरूप..!🙏

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (२), कडवे पहिले...

समर्थांची करुणाष्टके (२)

कडवे पहिले...

समर्थ म्हणतात...

असंख्यात रे भक्त होऊनी गेले...
तिहीं साधनांचे बहु कष्ट केले..
नव्हे कार्यकर्ता भूमीभार झालो..
तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो...!

रामराया...मारुतीरायापासून तुझ्या भक्तांची शृंखला ही अतुलनीय आहे..!तुझे असंख्य भक्त,तुझे असंख्य प्रशंसक,तुझ्या चरणी लिन झालेले लक्षावधी संत,साधू असे कितीतरी..!
हे सगळे कितीतरी संख्येने आहेत..!त्यांची तुझ्याप्रती  असलेली निष्ठा याला कोणतीही मर्यादा नाही..!

या सगळ्यांच्या,भक्तश्रेष्ठ महाजनांच्या रांगेत माझं स्थान खूपच मागे आहे..!

रामराया...या सगळ्या नरश्रेष्ठांनी तन, मन,धनाने तुझी अपार सेवा,भक्ती केलेली आहे..त्या भक्तीचे  अतिशय नेत्रदीपक मानदंड त्यांनी माझ्यासमोर घालून दिलेले आहेत..!
आपण आहोत त्या शाररिक,मानसिक,आर्थिक अवस्थेत तुझी भक्ती अबाध्य कशी ठेवायची ह्याचे ही आदर्श त्यांनी घालून दिले आहेत..!

पण रामराया..या सगळ्यांच्या तुलनेत माझी भक्ती,माझें आर्जव, माझे तुझ्याबद्दलचे ज्ञान खूपच तोकडे वाटायला लागले आहेत..!

रामा..अश्या साऱ्या तुझ्यापर्यंत पोहचण्यासाठी चाललेली माझी धडपड ही केवळ धडपड रहातीये..!तुझ्यासाठी मला भक्त म्हणून,सेवेकरी म्हणून जे कार्य करायचे ते अपूर ठरतंय..!मी स्वतः माझं हे शरीराच ओझं या भूमीवर निर्हेतुक घेऊन फिरतोय अस मला वाटायला लागलं आहे..!माझा हा कर्तव्यहीन देह या भूमीभार आल्याची लाज मला वाटायला लागली आहे..!

रामा...हे सगळं असलं तरी तुझा दास मी आहे अस मी मानतोय..!तुझा दास असुन मनासारखी आणि तू प्रसन्न होण्याइतपत सेवा करता येत नाहीये म्हणून माझा जन्म मलाच लाजिरवाणा वाटतोय..!

समर्थ किती समर्थपणे आपली पार्श्वभूमी भक्त म्हणून व्यक्त करतायत..?
हे ही करणं आपल्याला जमत नाही..!
कारण राम आणि आपल्यामध्ये आपला देह  येतो..!
त्या देहाचं असणं हे त्या रामपर्यंत जायचं एक माध्यम आहे तेच या साधनेत शाप ठरत आहे..!
हा देह भक्तीविना,उपासनेविना भूमीभार ठरतोय अस प्रांजळ मत समर्थ इथे व्यक्त करतायत..!

अस प्रांजळ आपल्याला आपल्या मनाशी होता येईल..?
यायलाच पाहिजे..!

श्रीराम...

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

Shri Hanuman Jayanti

हनुमान जयंती विशेष


"हनुमंत आमुची कुळवल्ली.."



समर्थउपासनेतली एक सवायी आहे..!

नयनी पाहता हनुमंत..
ज्यासी वर्णिती महंत..
ज्याचा महिमा अनंत..
मुख्य प्राण रामाचा..!!

आज जन्मघेणाऱ्या या भक्तश्रेष्ठ या रामदासाचे यथोचित वर्णन आहे हे..!

तो हनुमंत डोळ्याने पहावा..!इतकंच..!दर्शन घ्यावे..दर्शन घेणारा हा संकटमुक्त होईल इतपत दास्यभक्तीतून त्याने  श्रेष्ठत्व मिळवले...!दासहनुमंत हे  मारुतीच अतिशय लाघवी स्वरूप..!
अपरंपार सामर्थ्य रामतत्वाशी जोडल गेलं की किती बळकट आणि अनुकरणीय देवत्व निर्माण होत..त्याच उदाहरण म्हणजे हा वायुसुत..!

स्वामी रामाचे वहन..
केले लंकेचे दहन..
त्याची कीर्ती गहन..
बलभीम नामाचा..!

खर म्हणजे रामसेवा करणाऱ्या या कपीश्रेष्ठाने लंकेचे दहन केले..!
सेवकधर्मा च्या ओघात केलेला हा पराक्रम आपल्याला वेगळाच दृष्टिकोन देऊन जातो..!

लंका रावणाचीच असते अस नाही..!ही लंका आपल्यात ही आहे..ज्यात अहंकार,आसक्ती,ईर्षा, बेदरकारी सगळं आहे..!आपल्यातल्या या लंकेचे दहन जर आपण करू शकलो ..तर अत्यंत गहन कीर्ती असलेल्या या हनुमंत,राम या देवतांची कृपा मिळण्यासाठी आपण प्राप्त होऊ शकू..!
आणि ते साध्य करण्यासाठी हा बलभीम नाव धारण केलेला हनुमंत नक्कीच साह्य करतो..!

सदा बांधोनीया माज..
करी रामाचे निजकाज
ज्याचे शिरी रघुराज..
सेवक पूर्ण कामाचा..!

असा हा हनुमंत..ह्या मारुतीरायांना आपण रामरायाचे दास आहोत याचा सत्य अभिमान आहे..!रामप्रभु ना जे अपेक्षित आहे..!जे त्यांना भावते..आवडते..अपेक्षित असते..ते करण्यासाठी सदा आतुर असलेला हा हनुमान..!
रामरायांचे प्रत्येक निर्णय,त्यांनी दाखवलेली पारमार्थिक दिशा ही हनुमंताला प्रिय आहे..!
निःसंशय हे मारुतीराय त्यांनी सांगितलेलं,उपदेशलेलं हे सगळं पूर्ण मनाने तनाने मारुतीराय जीवनात आणतात..!

सर्व देवांचा वरिष्ठ..
वारी दासांचे अरिष्ट..
रामदास एकनिष्ठ..
मारुती हा नेमाचा..!

हे मारुतीराय सगळ्या देवांच्या जवळ असणारे आसल्यामुळे ती सगळी दैवते या रामदासाचा आग्रह कधीच मोडत नाहीत..!
आणि असा एकनिष्ठ पण सर्वश्रेष्ठ असलेल्या मारुतीची आपण नेमाने उपासना केली तर सगळी भवभयाने निर्माण झालेली अरिष्ट निरसून जातील यात शंकाच नाही..!

अशा या भक्तश्रेष्ठ मारुतीची  उपासना करणाऱ्या भाग्यवान कुळातले आपण आहोत..!

आजच्या दिवशी हा  रामउपासनेचा अनुग्रह आपण पुन्हा त्यांच्याकडून  घेऊया..!

श्रीराम...
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

Karunaashtake - 15

समर्थांचे करुणाष्टक (१)

कडवे पंधरावे...

समर्थ म्हणतात...

जळचर जळवासी नेणती त्या जळासी..
निसिदिन तुजपासी चूकलो गुणरासी..
भूमिधरनिगमासी वर्णवेना जयासी..
सकलभुवनवासी भेटि दे रामदासी...!

रामा...माझ्या भोवतीचे जग हे मी माझ्या कर्तृत्वाने,माझ्या नशिबाने मिळवलेले आहे असा केवळ गैरसमज बाळगुन मी आयुष्य जगतोय हे केवळ त्या पाण्यातल्या जगणाऱ्या जिवासारखं आहे..हे जीव जगताना केवळ त्यांचा जीवनक्रम आणि अंगवळणी पडलेले हे जलवासी जीवन हे कारण आहे अस समजून जगत असतात..!त्यांना त्या पाण्याचे महत्व तेंव्हा कळते जेंव्हा त्या पाण्यातून त्यांना बाहेर काढले जाते..!
माझ्या आयुष्यात रामा तू या पाण्यासारखा आहेस.. माझ्या अस्तित्वाचे कारण आहेस..!तू माझ्या आयुष्यच्या चलनवलनाचे,जगण्याचे कारण आहेस..!

रामा.. या तुझ्या  अस्तित्वाच्या खुणा मला ओळखता आल्या नाहीत..माझे याबाबतीतले आडाखे मी केवळ अज्ञानाने बांधत गेलो..!रोजच माझं आयुष्य तुझ्याशिवाय चालते, अशा चुकीच्या धारणे च्या  आधारे मी  जगत आलो..!

हे तुझं वर्णन मी अनेकवेळा अनेक महाजनाकडून,ऋषी,संतमं डळीकडून ऐकलय पण त्यांनीही मान्य केलय की हे तुझं वर्णन करणं त्यांना ही शक्य नाहीये.. शेवटी तुझ्या अस्तित्वापुढे ते सारे ज्ञाते मौन झाले..तिथे माझ्यासारख्या मुढाची काय कथा..?

रामा..पण मला आता ही खात्री पटलीये की या भोवतीच्या भौतिक जगात, माझ्या अस्तित्वाच्या, अवतीभोवतीच्या घडणाऱ्या प्रत्येक घटनेत तू आहेस..!
पण अदृश्य,असीम  आहेस..!
रामा,आता पुन्हा पुन्हा तुला विनवतोय की मला आपलेसे कर..मला आता भेट दे..!

रामापाशी अशी शुद्ध तळमळ व्यक्त करणं हे समर्थांच्या नितळ,शरण्य  वृत्तीच द्योतक आहे..!

ही अशी वृत्ती उपजणं हे घडेल तेंव्हाच ईश्वरप्राप्ती..!

श्रीराम...

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

Karunaashtak - 14

समर्थांच करुणाष्टक(१)

कडवे चौदावे

समर्थ म्हणतात...

उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी..
सकळभ्रमविरामी रामविश्रामधामी..
घडिघडि मन आता रामरूपी भरावे..
रविकुळटिळका रे आपुलेसे करावे...!

समर्थ आपल्या साधनकाळातल्या साधनेचे,रामदर्शनाच्या आतुरतीचे वर्णन जसे करतात तसेच या सर्व साधना संक्रमणाची फलश्रुती ही त्यांनी सांगितली आहे..!

रामा..तुझ्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग अनुतापा पासून सुरू होतो आणि मग तो उपरती कडे वळू लागतो..!उपरती ही निरिच्छा निश्चित नाही..पण उपरती ही मी आयुष्यभर केलेल्या कार्याच मनातून सिंहावलोकन आहे..!हे आणि हे करताना निर क्षीर बुद्धी प्रामाणिकपणे वापरली तर निर हा त्या घटनेचा अनुभव होतो आणि क्षीर आहे त्याला उपरती म्हणायला हरकत नाही..!
या माझ्या क्षीर विवेचनात तुझी प्राप्ती हीच माझ्या प्रत्येक कार्य आणि कर्तुत्वाची पूर्णता आहे हे माझ्या लक्षात आल्याने या सगळ्या आधीच्या आयुष्यातले सगळे किंतु,सगळ्या शंका,वेगवेगळ्या कार्यात निर्माण झालेले भ्रम,त्यापासून मिळालेली निराशा या सगळ्याच निराकरण,त्याचा विश्राम हा तुझ्याच समचरणात आहे..!हे मला आता कळून चुकलं आहे..!

रामा..इथपर्यंत तू आता मला घेऊन आलायस आता मात्र यापुढचा प्रत्येक क्षण मला तू अंतर देणार नाहीस अशी अपेक्षा आहे..!
कारण त्यासाठी लागणारी इंद्रियशुचिता,मनाची शुचिता,आचरण शुचिता हे सगळं आता माझ्या आयुष्याचा भाग होऊ चालला आहे अस मी समजतोय...आणि ते मला आवडू ही लागलं आहे..!

रामा..या सगळ्या माझ्यातल्या आत्मारामाला जाग करण्याच्या तुझ्या कृपेमुळे या जगातली इतर सगळी भौतिक,शाररिक सुख बाजूला करून तुझ्या प्रत्येक सस्वरूपाला तनामनात भरून घेण्याची तयारी मी केलेली आहे..!

रामा..आता ही माझी अपेक्षा पूर्ण करशील हे मागण ही मी तुझ्याचपाशी आग्रहाने करतोय..!

समर्थासारखं रामाजवळ हे आग्रहाने मागण्याइतपत योग्यता कधीतरी आपल्याकडे येऊ शकेल..?
खरतर यायला पाहिजे..!!!

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

Karunaashtake - 13

समर्थांच करुणाष्टक (१)

कडवे तेरावे....

समर्थ म्हणतात...

सुख सुख म्हणता दुःख ठाकोनी आले..
भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले...
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना..
परम कठीण देही देहबुद्धी वळेना...!

समर्थ म्हणतात..

सुख,सधनता याचा शोध घेणे हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव..!जन्माला आल्यापासून सुखकारक अस शोधत मानवाच मन फिरत असत..!
मानसिक,आर्थिक,शाररिक सुख शोधणे आणि त्यासाठी धडपड करणे हेच इतिकर्तव्य होऊन जाते..!
पण त्या सुखाच समाधानात रूपांतर कधीच होत नाही..!

 मग या सुखाची लालसा आणि समाधान यातली उरलेली जागा दुःख व्यापू लागते..!
दोन्हीतल अंतर वाढलं की दुःखाची व्याप्ती वाढते..!

रघुवीरा.. मग या सगळ्या मध्ये पारमार्थिक उपासना  करायच भान उरत नाही.!किंव्हा या सुख,दुःखाच्या ओढताणी मध्ये उपासनेची गरज आहे हे मन जाते..!दुःखाच सार मानसिक दुश्चित्तपणात उतरू लागत..!

रामा,मग दुश्चित्त मन हेलकावू लागत..खोटे आसरे शोधू लागत..फसवी नाती जोडू लागत..पण आपल्या आयुष्याच हीत ज्या तुझ्या रामाश्रयात आहे  ती कल्याणकारी दिशाच अंधुक होते..दूर होते..!

रामा,ह्या सगळ्या मानसिक ओढाताणीत देहाचे चोचले,देहाच्या भौतिक गरजा ह्या महत्वाच्या वाटू लागतात..चित्त तिकडेच धावू लागत..आणि त्यामुळे ती  तुझ्याकृपेची जी परम निरामय अशी पायवाट मी विसरू लागलोय..!

आपल्याला ही अशीच जाणीव होतेय ना??

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

KArunaashtake - 12

समर्थांच करुणाष्टक १

कडवे  १२

समर्थ म्हणतात..

सकळ जन भवाचे अखिले वैभवाचे..
जिवलग मग कैसे चालते हेचि साचे..
विलग विषमकाळी सांडिती सर्व भाळी..
रघुविर सुखदाता सोडावी अंतकाळी..!


एका नियोजित चाकोरीतून जन्म जगताना..भव आणी भय या दोन रेषामध्ये आपल मन आंदोलन घेत असत..!भवाची प्राप्ती ही समोरच्या अनेक लोकांकडून होते..तर भय त्या साऱ्यांच कारण सांगून मनातच उभे रहाते..!
भवामध्ये साथ देणारे त्या भवाच्या महिरपीच्या झगमगाटात स्वतःचा वाटा शोधत असतात..ते लोक ती कारण तेवढ्याच साठी असतात.. तात्पुरती..!

आणि अशा तात्पुरत्या संगाच वर्णन आपण जन्मोजन्मी असल्याचं फुशारकीने सांगतो..!

ही भोवतीची लोक ठराविक विषम,त्रासदायक,विषादाची  वेळ आली की तुझं नशीब,तुझ्या प्राक्तनात हे अस म्हणून स्वतःच्या नात्याला त्यातून सोडवून घेतात..!आणि ते बरोबर ही आहे..!

आणि मग आठवतो रामा तुझा खरा आसरा..!तूच शेवटी या सगळ्या भवभयाच्या समुद्रातून शेवट पर्यंत तरून न्हेणारा अदृश्य नावाडी आहेस हे पटत..!

रघुवीरा..हे मला पटतय किंबहुना आलेल्या अनुभवावरून मला ते लक्षात येऊन शेवटी तुझी महनीयता मी जाणून घेतलीये..!

आपल्या कधी लक्षात येणार..?

श्रीराम..