समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ४) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ४*

*भाग २*

*बोले शब्दज्ञान..|*
*अंतर्यामी समाधान.||३||* 
*रामी रामदास कवी.|*
*न्यायनीतीने शिकवी.||४||*

समर्थ म्हणतात...

संत,ज्ञानी लोकांच्या पदरी असतात विपुल शब्दांची भांडारे. ज्यायोगे ते परमेश्वर भक्ती,शक्ती आणि वृत्ती हे सारे समजून सांगतात.त्यांना जे ज्ञान जाणिवेने अनुभुती ने मिळत ते शब्दांच्या द्वारे आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतात.

समर्थ म्हणतात...

हे सारं सांगून ज्ञानी जन त्या त्या दैवतांच्या मानसपूजेचे,धर्मसेवेचे समाधान मिळवतातच.पण त्या बरोबर ते त्यांच अंतर्मन  शुचिर्भूत करून घेतात.पावन करून घेतात.

समर्थ म्हणतात...

असा हा शब्दांचा धनी असलेला रामदास जो रघुराजाचा अनन्य सेवक आहे.तो रामस्तुती कविमनाने करतो.आणि ही स्तुती आपल्यासारख्या भक्तजनापुढेही प्रस्तुत करतो.

समर्थ म्हणतात...

ही काव्ये,ओव्या,भजने  नीतिशास्त्र,न्यायशास्त्र,भक्तीशास्त्र याला अनुसरूनच आहेत.आणि म्हणूनच या सगळ्या पारमार्थिक कथा हा रामदास,जनांना उपदेशीत करत आहे.

समर्थ आदर्श अश्या या पंथा तील रामदासाची व्यक्त होण्याची पद्धत आणि तिची पार्श्वभूमी आणि त्याच्या व्यक्तिमत्वातील  उत्तम लक्षणे या अभंगात वर्णन करून सांगत आहेत.हा आदर्श असा रामदासी आपल्या समोर उभा करायची शक्ती या काव्यकृतीत आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ४) (भाग१)

*समर्थांचे साहित्यविश्व.*
*अभंग ४*

*भाग १*

*पांचा लक्षणी पूरता..*
*धन्य धन्य तोच ज्ञाता.*||१||
*विवेक वैराग्य सोडिना.|*
*कर्ममर्यादा सांडिना||२||*
समर्थ म्हणतात..

पंचेंद्रियातून निर्माण होणाऱ्या गरजा,मागण्या अमाप असतात.काहीवेळा अतिरंजितही असतात.त्या प्रपंच संपवत नाहीत आणि परमार्थ लाभू देत नाहीत.अशा साऱ्या पंचेंद्रिय सवयींना पुरून उरत असेल,तरच तो मनुष्य परमार्थाची कास धरू शकतो.

समर्थ म्हणतात..

असा जितेंद्रिय मनुष्य केवळ स्वतःच आयुष्य भक्तमय करत नाही तर अवघ कुळ,समाज तो पुनीत करून घेतो.असा पुरुष आतून,मनातून स्वच्छ होऊन केवळ ब्रम्हज्ञानाचा अधिकारी असतो.

समर्थ म्हणतात..

असा मनुष्य विकारविरहित झाल्याने मनोवृत्तीतूनही निर्मळ होतो.मन हे भक्ती साठी,स्पर्श पूजनासाठी,वाणी जपासाठी,नजर कैवल्यासाठी होऊन जाते.वागण्यात कोमलता आणि आचरणात वैराग्य दिसू लागते.

समर्थ म्हणतात..

असा मनुष्य जे कर्म करतो ते अलौकिक असते.सत्प्रवृत्त असते.पण ते कर्म करताना तो स्वतःचा कर्माभिमान बाजूला ठेवून कार्यवेगळा होऊन जातो.असे कार्य केंव्हा पुढील कार्यकर्त्याकडे द्यायचे याची विवेकबुद्धि तो जागी ठेवून त्या कार्याला स्वतःपुरती मर्यादा घालतो.

समर्थ उत्तम साधकाची ओळख सांगतात.पंचेंद्रियाच्या लोभावर विजय मिळवत असा साधक स्वतःचा जन्म धन्य करून घेतो.तो कार्यकर्ता,धर्मप्रतिपालक असतोच पण तो निस्पृह ही असतो.एखाद्या स्वनिर्मित कार्यातून स्वतःला वजा करून कार्य पुढे चालेल अशी अशी अखंड तजवीज करणारा हा साधक एक आदर्श घालून देतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ३) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व.*
*अभंग ३*

*भाग २*

*भाग्ये आले संतजन..|*
*झाले देवाचे दर्शन.||३||*
*रामदासी योग झाला..|*
*देही देव प्रकटला..||४||*

समर्थ म्हणतात..

सुसंगती ही आपल्या ललाटी लिहिलेली असायला लागते.संतसंग, सज्जनसंग, देवसंग हे सगळे संग नशिबाचा भाग आहेत.पूर्वपुण्याईने ते प्राप्त होतात.आणि यथायोग्य आयुष्याला वळण देतात.

समर्थ म्हणतात...

संतसंगती मिळाली की शुभ तेच आपल्या भोवती घडते.अवघाची शकुन असा जीवन प्रवाह होतो.कारण जिथे सत्य,सत्व आणि संत तिथे भगवंत.तो आपसूकच आपल्या सन्मुख येतो आणि दर्शन देतो.

समर्थ म्हणतात..

एकदा देव प्रसन्न झाला की हा देह त्याचा दास होऊन जातो.रामाच्या स्वरूप डोळे बघतात.हात त्याची पूजा करतात.कान त्याच संकीर्तन श्रवण करतात.वाणी त्याचा जयजयकार करते.असा अवघा देह रामदास होऊन जातो.

समर्थ म्हणतात..

देव जर मनात,तनात उमटू लागला,देहातून कीर्तनात थिरकू लागला.भजनात रंगू लागला,हा देह देवच होऊ लागतो.कारण देव शोधाया गेलो..देव होऊन गेलो ही अवस्था आपोआप निर्माण होते.

समर्थ मांडतात अवघा  आयुष्याचा प्रवाह.त्यातला भक्त प्रवाह फक्त आठ ओळींच्या अभंगात.देव कसा शोधावा?कुठे शोधावा ,तो शोधत असताना आपण चुकतो  कुठे..?हे सारं अभंगात ते वर्णन करून शेवटी ते स्वतः देवत्वाच्या पायरीपर्यंत स्वतःला घेऊन जातात.आणि तो रामराया आपल्याला समर्थांच्यात दिसू लागतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ३)(भाग १)

*समर्थांचे साहित्यविश्व.*
*अभंग ३*

*भाग १*

*देव जवळी अंतरी.|*
*भेटि नाही जन्मभरी||१||* 
*मूर्ती त्रैलोकी संचली.|*
*दृष्टी विश्वाची चुकली ||२||*

समर्थ म्हणतात..

देव म्हणून जी संकल्पना आहे ते चैतन्य आहे.ओज आहे.जे दाखवता येत नाही,पहाता येत नाही..ते फक्त जाणवत.ते सभोवती असत.कायम असत.ते आत,शरीरात जीव म्हणून आणि शरीराबाहेर पंचमहाभूते होऊन असत.

समर्थ म्हणतात..

पण आपण इतके मुढ आहोत की इतक्या जवळ सर्वव्यापी असून ही तो आपल्याला कळत नाही.जाणवला तरी त्याची असण्याची खात्री पटत नाही कारण तो अमूर्त असतो.तो मूक असतो.पण सचेत असतो.

समर्थ म्हणतात..

त्रैलोक्य हे खरं म्हणजे देवाचच दृश्यरूप.तो देव या त्रैलोक्याचा निर्माता,पालनकर्ता आणि संहारकरता ही आहे.पण तो देव या त्रैलोक्याचा व्याप्ती व्यापून ही दोन अंगुळे उरला आहे.

समर्थ म्हणतात..

पण त्रैलोक्याचा स्वामी असलेल्या या देवाला हे सकल विश्व शोधते आहे.पण ते चुकीच्या पद्धतीने.तो देव माणसे आकारात शोधतात पण तो निराकार आहे.ऐहिकात शोधतात पण देव विदेही आहे.

समर्थ देवाच्या शोधासाठी निघालेल्या मानवाच्या मूढ बुद्धीच वर्णन करतायत.अंतर्मनातला देव शोधायचा सोडून बाहेर शोधणारा माणूस हा चुकीच्या पद्धतीनेच देव शोधतो.तो जवळच अंतरात आहे.हे मानवाला केंव्हा कळणार..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग २) ( भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग २*

*भाग २*

*घेउनी कडिये धरुनी हनुवटी.|*
*कई गुजगोष्टी सांगशील.||३||*

*रामदास म्हणे केंव्हा संबोधीशी.?|*
*प्रेमपान्हा देशी जननिये..||४||*

समर्थ म्हणतात...

रामराया...
खूप लटक्या रागांना भुलून किंव्हा तापत्रयीच्या माझ्या त्रासामुळे जेंव्हा मी दुश्चित्त होतो तेंव्हा रामराया तू असा अचानक मला तुझ्या आधाररुपी कडेवर घेऊन माझ्या हनुवटीला धरून माझी समजूत काढशील ना?

समर्थ म्हणतात..

रामराया...मला तू समजावशील, सांगशील काही इष्ठ गोष्टी ज्या मला माझं मन स्थिर होऊन  पारमार्थिक रंगात तू मला सहज रंगवून घेशील ना.?

समर्थ म्हणतात..

रामराया...सांग ना केंव्हा बोलावशील..?केंव्हा स्वतःच्या आसपास मला कायम ठेवून घेऊन मला या प्रपंचातून अनासक्त करशील..?

समर्थ म्हणतात..

रामराया ..मी अधीर झालोय.तू आता माझी रामाई होऊन मला छातीशी कवटाळून मला प्रेमाच,वात्सल्याच अमृत दे..!आणि ते प्राशन करून मी आयुष्यच कल्याण करून घेईन.

समर्थ बालक होतायत.रघुराजाच रामाईत रूपांतर होऊन ती समर्थांची काळजी घेतीये.त्यांचे लाड पुरवतीये. त्यांचे पारमार्थिक हट्ट जाणून घेऊन समर्थाना आश्वस्त करती आहे.
असे मातृस्वरूपातले रामराय समर्थ अनुभवत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग २)(भाग १)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग २*

*भाग १*

*का हो रामराये दुरी धरियेलें..|*
*कठीण कैसे झाले चित्त तुझे.?||१||*

*देऊन आलिंगन प्रीति पडीभरे..|*
*मुख पीतांबरे पुसशील..||२||*

समर्थ म्हणतात..

रामराया..सांग ना? मी तुझ्यासन्मुख उभा राहून तुझी उपासना,आराधना करतोय.तुझी मानसपूजा करतोय.नामपूजा करतोय.पण तु मला अजूनही दूरच ठेवलं आहेस.अस का बरं करतो आहेस.?

समर्थ म्हणतात..

रामराया..तू तर दयार्द्र चित्ताचा म्हणून प्रसिद्ध आहेस.तू भक्तांच्या मनातलं ओळखून प्रसन्न होतोस.मग आता तुझं हृदय इतकं कठीण का झालय.?का तू मला तुझ्या चरणाशी जागा देत नाहीयेस.?

समर्थ म्हणतात..

रामराया..तू मला जवळ घेऊन प्रेमभराने उराउरी भेटशील.मला आलिंगन देऊन कृतार्थ  करशील..!पण हे केंव्हा करशील रे..?

समर्थ म्हणतात..

रामराया..माता जशी बालकाला जवळ घेऊन पदराने त्याच कपाळ,मुख मायेने पुसते. तस तू ही तुझ्या रेशमी पितांबराने माझ्या कपाळावर उमटलेले धर्मबिंदू टिपून घेशील ना?

समर्थ रघुराजाला आईच्या रुपात बघून त्याने वात्सल्यपूर्ण प्रेम,काळजी आपली करावी असा बाल्यसुलभ हट्ट त्याच्याकडे करतायत.लिन भक्तीच आणखी एक रूप.समर्थ जगतायत आणि आपल्याला ही ते रूप दाखवत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

आम्ही काय कुणाचे खातो..

*आम्ही काय कुणाचे खातो रे..?तो राम आम्हाला देतो रे....!!!*

समर्थांची ही रचना समर्थांच्या मुखातून ऐकली असती तर किती भाग्यवान झालो असतो आपण..?

सहा,साडेसहा फुटी बलदंड देह,उजव्या हातातील कुबडीचा त्या अंतहीन आकाशाकडे रोख...अंगावरच्या भगव्या वस्त्राची ज्योतिसारखी फडफड..गळ्यातली त्वेषात हलत असलेली रुद्राक्षमाळ..आणि चेहऱ्यावर वर असीम रामभक्तीच तेज,डोळ्यात कैवल्यपूर्ण विश्वास..!
असे समर्थ जेंव्हा प्रत्येक संकटाला,प्रत्येक हतबलतेला असा प्रश्न विचारताना कसे असतील..?

मलंग अवस्थेतील हा महात्मा या पूर्ण जगात फक्त राम आणि रामभक्तीवर अवलंबून होता.देहाची फिकीर नाही..मानवी ऐहिकतेची पर्वा नाही..!
फक्त राम..!घेणारा,देणारा,अनुभवणारा,सावरणारा राम...!
इतका पराकोटीचा  पारमार्थिक त्वेष हा त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीवर ओढलेला आसूड होता.

परकीय आक्रमणामुळे पराधीनता शिगेला पोहचली होती.जो तो दबकून आयुष्य जगत होता.अशा परिस्थितीला नजरेला नजर देऊन हा प्रश्न विचारणारा सैराट असा हा मनजेता..!

तटावर फुटलेल्या वटवृक्षासारखा आशेचे किरण फोडणारा हा संत.केवळ पाषाण असलेल्या उभ्या चिरेबंदीत जीवन शोधणारा हा आशावादी संत..!
तो राम तिथे जगवतो,ती रामवृत्ती आयुष्याच्या रूपाने तिथे जन्म घेते..!हे सिद्ध करून त्याचा उद्घोष करणारा हा नरसिंह..!

सजीवांची उत्पत्ती,निर्जीवांची व्युत्पत्ती हे सारं राम निर्माण करतो.तो रामच आम्हाला देतो.

कोणी कुणाचं दास नाही,कोणी कुणाचा त्राता नाही.सार काही फक्त राम आहे.

कष्टाच्या रूपाने राम शिणतो.मोलाच्या रुपात राम मिळतो.

इतकी काहींची बेछूट आरोळी देणारा हा समर्थ रामदास नावाचा अवलिया..!

हे समर्थ रामरायांच्या रुपात आपल्या मागे उभे असतील तर आपण ही तितक्याच मलंग,अलख अवस्थेत म्हणू शकतो...

*आम्ही काय कुणाचे खातो रे.. तो राम आम्हाला देतो रे..!🙏*

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग १) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग १*

*भाग २*

*म्हणोनी आमुचे कुळी कुलदैवत |*
*राम हनुमंत आत्मरूपी ||३||*

*आत्मरूपी झाला रामी रामदास.|*
*केला उपदेश दिनोद्धार..||४||*

समर्थ म्हणतात...

आमुच्या कुळात कुलदैवत म्हणून रामराय अवतरले.आणि त्याबरोबर  हनुमंतराय ही.पण हे दोघेही केवळ सगुण रूपातच पूजन करण्यासाठी आमचे कुळी राहिले नाहीत तर आम्हा  प्रत्येकाच्या मनात निर्गुण स्वरूपात आत्मरूप होऊन राहिले आहेत.संपूर्ण कुळच राम झालं आहे.

समर्थ म्हणतात..

या साऱ्या रामकृपेचा परमोच्च बिंदू म्हणजे माझ्यासारख्या या दासाचा रामरायांनी रामदास करून घेतला आहे.रामरायांनी त्यांच्या आत्मस्वरूपाची ज्योत माझ्या हृदयी चेतवली आहे.आणि या आत्मतत्वाने असा काही आमूलाग्र बदल घडवला आहे की या दिनाचा रामदास होऊन गेला आहे.

समर्थ रामकृपेची परिणीती किती उद्बोधक होते याच वर्णन स्वतःच्या राममय अवस्थेवरून सांगतायत.या अभंगात रामाची कृपा असेल तर दिनाचा रामदास कसा होऊ शकतो याच वर्णन समर्थांनी केलं आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२