समर्थ रामदास रचित गणपती स्त्रोत्र-२

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-२*

🌹🌺
*गंडस्थळे झिरपती बहु वास जेथे..|*
*सुवासमस्त रिझले अळीकुळ तेथे..|*
*शुंडा प्रचंड मिरवी गजकर्णथापा..|*
*तेजाळ अंकुश म्हणे दुरितासि कापा..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात...

गणराजाच्या या विशाल रूपाने थक्क होऊन पहात असताना जाणवते की त्याच्या गंडस्थळातून वीरश्री,पौरुषी मद झिरपतो जो त्याच्या भाळावर कायम विराजत असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

त्या मदा ने उन्मत्त झालेली गणराजाची भृकुटी आणि एकूणच भाळप्रदेश त्याच्या अलिप्त सुवासाने अधिकच उत्तेजित अशी वीरश्री, पौरुषेय वीरश्री प्रदर्शित करते आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अतिशय चपळ अशा सोंडेने हा गणराज जेंव्हा आनंद प्रदर्शन करत असतो तेंव्हा भल्या मोठ्या कर्णयुगुलांच  लयबद्ध फडकावण ही प्रचंड अशी अभेद्य मोदतांडवाची सुरुवात असते.

समर्थ रामदास म्हणतात...

ह्या सगळ्या आनंदतांडवा मध्ये तळपणारा अंकुश सदा तल्लख असतो.या साऱ्या आनंदतांडवामध्ये विघ्न आणणाऱ्या असुर प्रवृत्तीचा नायनाट करण्याचं सामर्थ्य सदा हा गणपती बाळगून आहे.

समर्थांना प्रत्येक देवतेमध्ये असणारे अपूर्व असे भक्तवत्सल रूप भावते तसे त्या त्या देवतांच्या अंगभूत असणारी वीरश्री ही समर्थाना अतिशय प्रिय आहे.ह्या ओवीत समर्थ विरगणपती स्वरूपात विशाल असलेल्या गजाननाचे वर्णन करत आहेत.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास स्वामी रचित गणपतीस्त्रोत्र-१

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-१*


🌹🌺
*विद्यानिधान गणराज विराजताहे..|*
*सिंधुर तो घवघवीत रसाळपाहे..|*
*विघ्नांसी मार अनिवारचि होत आहे..|*
*आनंदरूप तुळणा दुसरी न साहे..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्यासमोर जो विराजमान झालेला प्रफुल्ल देव आहे तो गजानन जो सकल विद्यांची एक अनंत साठवण आहे.तो गणपती असा एकमेव अधिपती आहे जो प्रतिष्ठित झाला की भोवती श्रद्धा,विद्या,सुमती,ज्ञान ह्या सगळ्यांच वास्तव्य आधिष्ठान पावत.

समर्थ रामदास म्हणतात..

हा विद्याप्रधान गजानन... त्याच स्वरूप, सगुणरूप,मूर्तरूप हे लाल शेंदुराने लिप्त असे आहे.ह्या  शेंदूरअर्चित गणेशाचे दर्शन हे तेजोमय रक्तरंगी जाणीवरूप आहे..!

समर्थ रामदास म्हणतात..

हा गणेश विघ्नहर्ता म्हणून प्रख्यात आहे.त्याच अस्तित्व,त्याच दर्शन,त्याच देवत्व इतकं प्रखर आहे की सर्व विघ्नरुपी दानवांच निर्दालन हा गणेश लीलया करतो.आणि त्याचा विघ्नावरती झालेला वार त्या संकटांना अनिवार,सहन न होईल असा असतो आणि भक्तांना आशिर्वादपूर्ण असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या गणरायाचं स्वरूप हे उल्हासयुक्त आहे.प्रेरक आहे.हे मुखदर्शन सुखाची प्राप्ती आहे.ह्यातून प्रतीत होणार चैतन्य इतकं मोदप्रद आहे की त्याच धाम, त्याच सगुण रूप विराजित असलेलं स्थान सोडून कुठेही मन रमत नाही.आणि त्यासारखं इतकं सुखनंदन देवअस्तित्व दुसरं कुठे मिळत ही नाही..!

समर्थ रामदास गणपतीची  करुणास्रोत्ररुपी पूजा करताना सुंदर,रसाळ वर्णन करतात.समर्थांच्या शब्दांनी प्रत्यक्ष ते सुंदर ध्यान आपल्यासमोर उभं रहात.आणि आपण त्याच दर्शन आपल्या स्वतःत साठवून ही घेऊ लागतो..!

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी..|*
*उदासीन जो वीतरागी विरागी..|*
*जनस्थानगोदातटी वास केला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट जाला..||*

समर्थ म्हणतात...

श्रीरामाच एक वेगळं स्वरूप.त्याच राजेश्री दर्शन,त्याचा एक भरजरी अवतार सोडून इथे तो त्यागी बनून राहिलाय.इथे तो वनवासी जीवन जगतोय.भाग्याला आलेलं वैभव मागे ठेवून हा रामराजा इथे उभा आहे..!

समर्थ म्हणतात...

रामराय..इथे जो आहे.तो रागलोभ मागे सोडून,राजयोग बाजूला ठेवून..!एक प्रकारचं प्रापंचिक वैराग्य लेवून हा राम एका तापस वेषात इथे उभा आहे..!

समर्थ म्हणतात...

हे स्थान पंचवटी.जे गोदावरीच्या निर्मळ तटावर वसलेलं आहे.जिथं रामप्रभु सपत्नीक वास करत आहेत.लक्ष्मणाच्या संगतीत.पंचवटीची भूमी या पदस्पर्शाने पावन झाली आहे.

समर्थ म्हणतात...

असा वैराग्यपूर्ण राम या डोळ्यासमोर उभा आहे.मी त्याच दर्शन घेऊन,दास्यभक्ती करून  तृप्त आहे.तो रामराय जो माझ्या जपात,चिंतनात आहे तो साक्षात माझ्यासमोर सगुणरुपात उभा आहे.

समर्थ पंचवटी इथे गेल्यावर रामप्रभूंच्या समोर उभे राहिल्यावर त्याच वर्णन करतात.तो राम त्यांना कसा दिसला याचही वर्णन करून आपल्याला आलेला अनन्य अनुभव इथे कथन करतात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विधिकुळभूषणाचे धाम सर्वागुणांचे..|*
*भरण अभरणाचे सर्वलावण्य साचे..|*
*सुख परमसुखाचे ध्येय ब्रह्मदिकांचे..|*
*भजन हरीजनाचे गुज हे सज्जनांचे..||*

समर्थ म्हणतात..

आचार,विचारांनी युक्त असे ज्याचे कुळ आहे.अशा समस्त कुळाला ही जो राम भूषणावह आहे.असा राम जो सर्वगुणांचा एक समुच्चय आहे.एक ठिकाण आहे जिथे या सर्व उत्तम गुणांचा सहज वावर असतो.

समर्थ म्हणतात..

ज्या रामरायांच्या शरीरावर जन्मतःच तेज आहे.देवत्व आहे.याशिवाय त्याच हे मुग्ध पुरुषी शौष्ठव अनेक अशा आभूषणाने अजूनच तेजाळून उठलं आहे.त्याच मनोहारी दर्शन अजूनच सुखदायी होत चालल आहे.

समर्थ म्हणतात..

हे सुख जे रामाचे अस्तित्व आहे..!किंव्हा ज्या अस्तित्वात रामाच वास्तव्य आहे ह्याचा चिरंतन शोध अनेक तापसी संत,महंत, मुनिश्रेष्ठ च नाही तर अनेक देव ही त्या रामाच्या  आश्रयाची,कृपेची,त्याच्या ठायी असलेल्या उत्तम सुखप्रवृत्तीची आस धरून आहेत.

समर्थ म्हणतात..

ह्या सगळ्याची आस, ध्येय असलेले जे सज्जन मनुष्य आहेत त्यांना हे सगळं प्राप्त होण्यासाठी एकच सोपा साधा मार्ग आहे तो म्हणजे हरिकीर्तन,रामसंकीर्तन..!ज्यायोगे हे सगळं रामसुख सज्जनलोक प्राप्त करून घेतात.घेऊ शकतात.

समर्थ सज्जनांच्या सज्जन मतीच गुज इथे वर्णन करतात.ते ज्याच्यामुळे त्यांच्या मनात तेवत असत त्या रामसंकीर्तनाची महती आणि रामअस्तित्व इथे वर्णन करून सांगतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*हरीजनभजनाचा होय साक्षी मनाचा..|*
*सकलत्रिभुवनाचा प्राण साधुजनांचा.|*
*परि हरिभजनाचा आखिलासे दिनाचा.|*
*घननिळ गगनाचा रंग सर्वोत्तमाचा..||*

समर्थ म्हणतात...

हा रामराया त्याच्या संकीर्तनाच्या ठिकाणी असतो.जिथे रामनाम तिथे राम.तो आपण करत असलेल्या प्रत्येक कृती,हालचालींचा एकमेव साक्षीदार ही आहे.की ज्याच्या आधारे ते कार्य सत्वगुणी करायला हुरूप येतो.

समर्थ म्हणतात..

हा राम,त्याचा सत्वगुण तिन्ही लोकात जो चांगुलपणा आहे त्यात रममाण आहे.आणि हा सत्वगुण अनेक साधू,सज्जन,संतांच जगण्याच साध्य आहे.अर्थात राम या साऱ्याच्या आयुष्यातील जिवंतपण आहे.

समर्थ म्हणतात...

तो रामराय हरिभजनी असलेल्या दासांचा अखिल असा सर्वसंगी आहे.तो त्यांच्या मनात कायम विराजित असा देववास आहे.त्या सत्वगुणी मनुष्यातील उर्वरित दैन्याचा परिहार आहे.

समर्थ म्हणतात..

निळ रंग हा मनाला आराम देणारा..तृप्त करणारा.जो रंग आकाश मुळरूपात पांघरते.असा रंग रामरायांच्या तनु चा ही आहे.त्यामुळे आकाशासरखी छाया म्हणजे सर्वोत्तम असा रामराय..!

समर्थ सत्वगुणी राम आणि  सत्वगुणी मनुष्यातील सत्य,सुंदरतेचा आविष्कार वर्णन करून सांगतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*स्मरण स्मररिपूचे विषहर्ते वपूचे.|*
*निजविज निगमाचे सार सर्वागमांचे.|*
*मन त्रिभुवनाचे गुज योगीजनाचे..|*
*जिवन जड जीवांचे नाम या राघवाचे..||*

समर्थ म्हणतात...

षड्रिपूच्या संगाने मनात,शरीरात जो विषरूपी संसर्ग होतो.मन कलुषित होते.शरीर हे वासनासंगाने कुष्ठ होते.अतृप्तीमुळे डहूळले जाते.हे सारे रामवृत्ती आणि रामनामाने सज्जनसंगी होते.शुद्ध होते.

समर्थ म्हणतात..

हे रामरायांचे स्वरूप,दर्शन हे पुराणकथाचे फळ आणि वेद,वेदांगाचे स्वरूप आहे.आणि हेच स्वरूप कुठल्याही सज्जनमनात ही असते.कारण ते शुद्ध आहे.सत्व आहे.

समर्थ म्हणतात..

तिन्ही लोकांचा चांगुलपणा असलेलं हे मन ल्यायलेले हे मनुष्य अनेक संत,महंत, तापसी यांच्या वचना प्रमाणे आयुष्य काढत असतात.स्वतःही तृप्त,आनंदी असतात..आणि सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला ही तसच करतात..!

समर्थ म्हणतात..

अशा मनुष्याचे सर्व कर्तव्य आणि गुण लाभलेले आणि जगत असलेल्या प्रत्येकाचे स्थिर असे ठिकाण,लिन होण्याचे ठिकाण, विश्रांतीस्थळ हे फक्त रामनाम आहे.आणि ते जपून आयुष्य सफल करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

समर्थ रामराया आणि समाजातील सत्वगुणी माणसे याची सांगड घालून त्यांच्यातला राम आपल्यापुढे उलगडून सांगतात.त्याची लक्षणे आणि सुखांकीत अस्तित्व आपल्यापुढे प्रदर्शित करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्तोत्रे*

🌺
*दशशतवदनाचा धीर मेरू बळाचा..|*
*परम कुशळ वाचा शेष सर्वोत्तमाचा..|*
*अगणितगुणमुद्रा शोधिता त्या नरेंद्रा.|*
*अकळ विकळभावे जाहला गुणनिद्रा..||*

समर्थ म्हणतात..

रामरायाच मूळ स्वरूप हे दहासहस्त्र मुखांच्या समाजपुरुषा सारख आहे.तो समाजपुरुष स्वत्वगुणी आणि धीरोदात्त प्रवृत्तीचा आहे जसा राम आहे.हा सामंजस्य आणि सत्यप्रिय अशा गुणांचा एक पर्वतप्राय आदर्श आहे.

समर्थ म्हणतात..

सर्वांना प्राणप्रिय असा हा नरोत्तम आहे.अतिशय कोमल वचनी तर आहेच.पण तो सगळ्या सद्गुणांचा श्लेष आहे..सार आहे.आणि त्यामुळे सगळ्या चराचराचा शेषावतारासम आधार ही आहे.

समर्थ म्हणतात...

सहस्त्रमुखी या रामचंद्राच्या अस्तित्वात अगणित गुणांचा संचार असतो.या सगळ्या त्याच्या मुद्रातून,भावातून त्याच दर्शन हे सर्वोत्तम अशा पुरुषाचच होत.

समर्थ म्हणतात...

हा सर्वोत्तम असा रामराजा माझ्या प्रत्येक आयुष्याच्या अवस्थेत गुण अस्तित्व होऊन गेलेला आहे.त्याचे गुण माझ्या आयुष्याचे इप्सित,साध्य झालेले आहेत.

समर्थ रामरायांचे  समाजपुरुषाच्या रुपात वर्णन करतात.त्या समाजपुरुषाच अस्तित्व स्वतःच्या अस्तित्वातून निर्माण होते याची समाजाभिमुख जाणीव ही आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२