समर्थांची करुणाष्टके (६) कडवे दहावे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे दहावे.

समर्थ म्हणतात..

म्हणे दास मी वास पाहे दयाळा..
रघुनायका भक्तपाळा भुपाळा
पहावे तुला हे जीवी आर्त मोठे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया...मी तुझा दास आहे याची खात्री तुला आहे ना..?तो मी असल्याने तुझ्या वाटेकडे आस लावून बसलोय..!तुझ्या प्रकटते ची प्रतीक्षा आणि तुझ्या विरहाचा हा काळ खूपच असह्य होऊ लागला आहे.

रामराया..तुझी किती प्रकारे आळवणी करू..?तू रघुनायक वृत्तीचा अंतिम सद्गुरू आहेस..भक्तांचा पालनहारी आहेस..त्राता आहेस..नव्हे नव्हे तू साऱ्या पृथ्वीचा,भूमीचा एकमेव सृजनकर्ता आहेस...!

रामराया...सगुण रूपातील तू,मूर्तीरूपातला तू,मनोबुद्धि तला तू,विचारातला तू,समाजमनातला तू..नेहमीच तू माझ्या समोर असतोस..मला अनुभव देतोस..पण रामराया..आता मला तू त्या विश्वरूपाच,प्रत्यक्ष दर्शन दे जे मारुतीरायांना दिलंस..आता ही एकमेव इच्छा मनात उरली आहे..!

रामराया..अशा अंतिम इच्छेच्या मी इतका अधीन झालो आहे की ती पूर्ण होत नसल्याने माझ्या आयुष्याचा क्षण न क्षण आता केवळ एकप्रकारच्या उदासीनतेत घालवत चाललो आहे.

समर्थ विनवतायत,आळवतायत रामराया पुढे हट्ट धरतायत,मन उलगडून रामासमोर नतमस्तक होतायत..!भक्तीच्या आधीन जाऊन सार रामचरणाशी सादर करतायत..ही पारमार्थिक उंची केवळ आदर्शच नाही तर अवर्णनीय आहे हो ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे नववे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे नववे.

समर्थ म्हणतात..

भजो काय सर्वापरी हीण देवा..
करू काय रे सर्व माझाची ठेवा..
म्हणो काय मी कर्मरेखा न लोटे..
उदासीन हा काळ कोठे ना कंठे..!

रामराया..मी तुझं पूजन,अर्चन करतो..तुझ्यासमोर उपासना करतो,संकीर्तन ऐकतो पण हे सगळं करून सुद्धा मी तुझ्या इतर भक्तांची तुलना करतो तेंव्हा माझ्या या सगळ्या उपासनारुपी पूजनाची मर्यादा माझ्या लक्षात येऊ लागते.माझी बौद्धिक हिनता जाणवू लागते..!

रामराया.. मला माहित आहे माझ्यातल्या गुण-दोषानुसार मला प्राप्त होत आहे.माझ्या कर्तृत्वानेच मी माझं उणेपण ओढवून घेतलं आहे.माझ पूर्वसंचित कमी पडतंय म्हणून तुझं सस्वरूप दर्शन अजून होत नाहीये..!

रामराया...माझं हे कर्मानुसार मिळणार फळ मी भोगतो आहे.मी कितीही प्रयत्न केला तरी ही माझी कर्मरेखा उलटत नाहीये.किंव्हा तुझं दर्शन मिळण्याइतपत सुकर होत नाहीये.

रामराया..या सगळ्या मानसिक जडणघडणी मध्ये माझं मन तुझ्या प्राप्तीशिवाय अतिशय उदासीन रहाते आहे.आणि तसच निरस माझं आयुष्य जगायला लागत आहे.

समर्थ आपण करत असलेल्या उपासनेची काही वेळा वाटणारी मर्यादा इथे सांगतात.ही मर्यादा पूर्वकर्म आणि दुष्कृतामुळे अशी रहाती आहे की काय अशी शंका ते  रामाला विचारून त्यातून तरून जाऊन रामस्वरूप भेटावे अशी प्रार्थना रामाकडेच करतात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे आठवे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे आठवे.

समर्थ म्हणतात..

अखंडीत हे सांग सेवा घडावी..
न होता तुझी भेटि काया पडावी..
दिसेंदीस आयुष्य हे वेर्थ आटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..जन्माला येऊन तुझ्या संतत नामावलीच्या जपात,उपासनेत सदा लिन असावे.सदा तुझा विचार,तुझ्या कृपादृष्टीचा मागोवा घेत आयुष्य भक्तिमय व्हावे..!

रामराया...तुझ्या भेटीशिवाय जर या शरीरातले श्वास थांबले किंव्हा तुझ्या भेटीची अलोट इच्छाशक्ती असून शरीराने साथ दिली नाही..माझ्या शरीराने नश्वर अवस्था प्राप्त केली तर माझ्या या जीवनाची सार्थकता कशी होईल..?


रामराया..जशी जशी गात्र शिथिल होऊ लागली आहेत..तसे तसे आयुष्य पुढं सरकू लागले आहे.आणि तुझ्या सगुण दर्शनाचा योग अजून जवळ आला अस जाणवत नाहीये त्यामुळे हे जगणं केवळ असार आणि व्यर्थ आहे असे वाटू लागल आहे..!

रामराया..या सगळ्याची परिणीती माझं आयुष्य  खूपच निरस होऊ लागलं आहे.आणि त्यामुळे मन हे उन्मनीत पण उदास होऊ लागलं आहे..!

समर्थ अहर्निश रामाच्या सेवेत,विचारात,उपासनेत आहेत पण साधनाकाळात येणाऱ्या मनुष्यसुलभ निकाराच्या दुश्चित्तपणाचा ही अनुभव त्यांना आहे त्याच वर्णन समर्थ आपल्यासाठी करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे सातवे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे सातवे.

समर्थ म्हणतात..

समर्था मनी सांडि माझी नसावी..
सदा सर्वदा भक्तचिंता असावी..
घडेना तुझा योग हा प्राप्त कोठे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया...तू एकमेव,अद्वितीय आहेस.तू कृतसमर्थ आहेस.या साऱ्या चरचराचा तू स्वामी आहेस.रामराया..मी या तुझ्या भवसागराचाच एक भाग आहे ना..?मग माझ्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस..!

रामराया..तुझ्या मनात तुझ्याच किर्तीप्रमाणे भक्तचिंता असते..!भक्तांच्या दुःखांचा,चिंतेचा तू हारक आहेस.तीच तुझी भक्तपालक म्हणून चिंता माझ्यासाठी दाखवशील ना..?

रामराया..मला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ असते.एक निश्चित कृपेचा मुहूर्त असतो.तो निश्चित तपाने,उपासनेने थोडा  समीप येतो..!मला अजून कळत नाहीये की माझी उपासना फलद्रुप होण्याचा क्षण,मुहूर्त,योग नक्की केंव्हा आहे..?

रामराया..तो योग,ती वेळ येईपर्यंत जो उदासीन किंव्हा प्रतिक्षेचा काळ आहे तो काळ सहजतेने संपावा..आणि तोपर्यंत उपासनेशी दृढ रहायची बुद्धि तूच मला दे..!!

समर्थ निकराने रामदर्शनाचा हट्ट रामरायाकडेच करतायत.रामरायांच लक्ष माझ्याकडे आहेच..पण तो रामराय मला त्याच्या स्वरूपात घेत नाहीये.त्यासाठी ठराविक वेळ लावतोय याचीही जाणीव त्यांना आहे.आणि तशी ती वेळ असते याची जाणीव ते आपल्याला ही करून देतायत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे सहावे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे सहावे.

समर्थ म्हणतात..

आहा रे विधी त्वा असे काय केले..
पराधीनता पाप माझे उदेले...
'बहुतामध्ये' चुकता तूक तुटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..माझे अदृष्ट लिहिणारा,त्याप्रमाणे प्रतिपाळ करणारा,माझं सौख्य बघणारा तूच आहेस..मग मला कळत नाहीये अस काय माझ्या भाळी लिहिलं आहेस की तु मला अजून भेटत नाहीयेस..!?

रामराया..माझं हे पराधीन अस जगणं हे कदाचित माझं पूर्वपाप याच फळ असेल का?की ज्यामुळे मला तुझ्याशी एकरूपतेचा सात्विक आनंद मिळत नाहीये..!

रामराया..या सगळ्याची परीक्षा मी तटस्थ पणे करतो तेंव्हा मला कळत की या तुझ्या कृपेच्या थोड्याश्या दिरंगाईमुळे समाजात ज्या अजाणते पणे चुका होतात त्याला ही समाजाकडून माफी मिळत नाही..!त्याकडूनही माझी उपेक्षा  होते आहे.!

रामराया..या सगळ्याची परिणीती म्हणजे माझ मन जास्तीत जास्त मलूल,उदास होण्याकडे होत आहे..!आणि त्यामुळे मला माझी वाटचाल ही तशीच जाणवू लागली आहे..!

समर्थ आपली ही सारी भक्तीपंथातली, उपासनापंथातली वाटचाल सगळ्याबाजूने तपासून बघत आहेत.या मार्गात त्रुटी कोणतीही राहू नये आणि रामकृपा यथावकाश व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे पाचवे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे पाचवे.

समर्थ म्हणतात..

कृपाळूपणे भेट रे रामराया..
वियोगे तुझ्या सर्व व्याकूळ काया..
जनामाजि लौकिक हाही न सुटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे...!

रामराया...तू दयासागर आहेस,कनवाळू आहेस..!भक्तांच्या शुद्ध भावाला पावणारा आहेस.तुझी अशी दिगंत कीर्ती माझ्याबाबतीत खोटी का ठरतीये.?तू तुझ्या या दयावृत्तीने मला भेटून माझं आयुष्य सार्थकी लावण्यासाठी माझ्यावर कृपा करत नाहीयेस..?

रामराया..तुझ्या सगुणीमूर्तीत तू मला दिसतोसच..पण निर्गुणत्वाने ज्याची मला आस आहे..त्यासाठी मी माझं अस्तित्व पणाला लावलंय..ते जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी कमालीचा अस्वस्थ आणि अशांत असणार आहे..माझी काया,माझी वाणी ही व्याकुळ होत चाललीये..!

रामराया..हे सगळं असून सुद्धा समाजामधील माझी ओळख ही सुद्धा माझी उपाधी बनत चालली आहे.समाजाच्या अपेक्षाही मी पूर्ण करू शकत नाहीये.त्यापद्धतीने समाजाभिमुख अस माझं अस्तित्व होत नाहीये..!

रामराया...या सगळ्याची परिणीती ही माझं अस्तित्व,दिवस रात्र,माझं जगणं हे सगळंच अतिशय शोचनीय अवस्थेत पोहचू लागल आहे.जिथे केवळ अशांतता आहे..!

आयुष्याच्या त्या वळणाच  समर्थ वर्णन करतायत जिथं रामाशिवाय प्रत्येक गोष्ट अपुरी आणि निरस वाटू लागते.ती अवस्था रामभेटीचा मुहूर्त जवळ आलाय याच द्योतकच आहे..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे चौथे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे चौथे.

समर्थ म्हणतात...

अवस्था मनी लागली काय सांगो..
गुणी गुंतला हेत कोणासि मागो..
बहुसाल भेटावया प्राण फुटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..आयुष्यातल्या एका अशा वळणावर मी येऊन थांबलोय जिथे मनाची अवस्था ही तुझ्या भक्तीत लिप्त आहे.पण मनाच्या आतला स्थायीभाव हा भौतिक गोष्टीत अडकलेला आहे.अशी द्वैतात असलेली माझी अवस्था तुला माहीत आहे तुला वेगळं काय सांगू..?

रामराया..तुझ्या स्वरूपात,तुझ्या निराकार विश्वरुपात माझं तन मन गुंतलय त्यामुळे तुझी समूळ प्राप्ती हा एकमेव हेतू उरलाय आता याबद्दल इतर कुणाला सांगून काय उपयोग..?तुझी प्राप्ती,तुझ्यात गुंतण हे तुलाच मागितलं पाहिजे..!!

रामराया...वर्षानुवर्षे मी तुझ्या दर्शनाची,अस्तित्वाची सवय लावून घेतली आहे.मी अतिशय शांतपणे तुझी भक्ती आचरण करतोय पण आता मात्र तुझ्या सस्वरूपासाठी मी व्याकुळ झालोय.इतका की तुझ्या दर्शनाशिवाय माझा प्राण जाईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.

रामराया..अशा निराश होऊन शरीर सोडण्याच्या विचारातून माझं मन उदासीन होऊ लागलं आहे.आणि त्यामुळे तुझ्याशिवाय कुठेच काळ मला घालवता येत नाहीये..!

भक्तीची परिसीमा म्हणजे व्याकुळता आणि व्याकुळतेचा अंत म्हणजे भगवंतप्राप्ती या सूत्रानुसार चालणारा परमार्थ समर्थ व्यक्त करतात..!
आपल्यालाही प्राप्त होण्यासाठी...!!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे तिसरे...

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे तिसरे...

समर्थ म्हणतात...

बळे लाविता चित्त कोठे जडेना..
समाधान ते काही केल्या घडेना..
नव्हे धीर नैनी सदा नीर लोटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..माझं मन मी तुझ्या भक्तीत गुंतवायचा  प्रयत्न करतोय.कदाचित त्याच्या स्थायीभावानुसार त्याच्यावर एकप्रकारची जबरदस्ती करतोय.त्याचे अंश इतर ठिकाणी भौतिकतेत अडकलेले असल्यामुळे ते एका ठिकाणी एकाग्र होत नाहीये.

रामराया..हे सगळं असताना सुख मिळत पण त्यापासून निर्माण होणारे आणि अपेक्षित असणारे समाधान हे काही प्राप्त होत नाहीये.कारण मला माहित आहे सुखाच्या अपेक्षेला  अंत नाही आणि समाधानाला मात्र पूर्णत्व आहे...

रामराया..आता मात्र माझा धीर सुटत चाललाय.मला तुझी आस अशा टोकाला घेऊन चाललीये जिथे तुझी ही भक्ती व्याकुळते मध्ये मिसळत चाललीये आणि ती माझ्या डोळ्यातून अश्रूद्वारे व्यक्त होऊ लागली आहे..

रामराया..या सगळ्या मंथनातून तू मला तुझ्या कुशीत ओढून घे कारण तुझ्याशिवायचा हा काळ उदासीनते मध्ये असल्या मुळे मला तो सफल जगता येत नाहीये रे..!!

आपण ही आपली भक्ती ही शब्दाकडून व्यक्ततेकडे आणि व्यक्ततेतून प्रापंचिक उदासीनतेकडे न्हेली तर हे आयुष्य केवळ सुखकारक नाही तर समाधानाचे होईल..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे दुसरे...

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे दुसरे...

समर्थ म्हणतात...

घरे सुंदरे सौख्य नानापरीचे..
परी कोण जाणेल ते अंतरीचे..
मनी आठवीताची तो कंठ दाटे..
उदासीन हा काळ कोठे ना कंठे..!

रामराया..पंचेंद्रियांना  सुखकारक आणि ज्ञानेंद्रियांना केवळ स्वार्थात्मक सुख घेण्याची सवय लागलीये.घरीदारी असताना तीच माझी निकड आहे असा गैरसमज माझा झाला होता..!अशी सगळी सुख म्हणजेच आयुष्य असा एकप्रकारचा ग्रह मी मनात घेऊन जगत होतो..!

रामराया..पण ही सगळी भौतिक सुख असून सुद्धा ती मनापर्यंत पोहोचून पूर्ण,अविरत सुखात परावर्तित होत नाहीयेत.मला कळलंय की जे मनापर्यंत जातंय ते सुख मला समाधान देणार नाहीये.ते वेगळंच आहे.ते मिळाव म्हणून मला आत निर्माण झालेली रुखरुख मी कुणालाच सांगू शकत नाहीये.आणि ती तुझ्याशिवाय कुणाला कळेल अस मला वाटत ही नाहीये..!

रामराया..ही सगळी वस्तुस्थिती मला कळली आहे.आणि ती पटलीही आहे.एकप्रकारे मी हतबल आणि विरही झाल्यामुळे ईश्वरप्राप्तीची ओढ जाणवून..मला भरून येऊ लागते..!मी सद्गदित होऊन जातो..!

रामराया..अशा अवस्थेत वारंवार तो मनोहर संतसंग,तुझे चरण आठवून,ते अखंड,अविरत  प्राप्त होत नसल्याने माझं आयुष्य जास्तीच उदासीन,निरस होऊ लागलं आहे..!

आपल्याला ही या सगळ्या अनुभवाची प्राप्ती होतच असते.पण विषयसुखाच्या आत्यंतिक ओढ आणि गोडी मुळे आपल्याला अजूनही प्राप्त न झालेल्या पारमार्थिक परमसुखाकडे आपण डोळेझाक करतो.आणि एका क्षणी पश्चाताप दग्ध होतो..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे पहिले...

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे पहिले...

समर्थ म्हणतात..

समाधान साधुजनांचेनि योगे..
परि मागूते दुःख होते वियोगे..
घडीने घडी सीण अत्यंत वाटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..साधुसंत,सज्जन यांच्या संगतीची बहार ही वेगळीच.धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्र,देवक्षेत्र याठिकाणी असणारे त्यांचे लाभणारे सहवासाचे सुख,त्यांची शिकवण हे सारे केवळ आणि केवळ सुखाचे झरे असतात.

रामराया..संसारातून,प्रपंचातुन काहीकाळ या महाभागांच्याजवळ सहवासात,सान्निध्यात जाऊन पुन्हा त्याच प्रपंचात परत यावं लागत..कर्तव्यापोटी.अशा  त्यांच्या सुखसंगाच्या नंदनवनातून माघारी येणं, त्या पायऱ्या खाली उतरण  केवळ क्लेशदायक होत.

रामराया..त्यानंतरची त्या स्थानाची ओढ आणि पुन्हा त्याच संतचरणी पुन्हा परतण्याची जी एकसंध हुरहूर लागून रहाते.ती माझ्यासारख्याला खूप जाणवते..त्यामुळे मला या प्रपंचात कोणताही रस उरत नाही.माझा हा  प्रपंच निरस होऊ लागला आहे.

रामराया..या सगळ्यामुळे एकप्रकारची विकल अवस्था मनाची झाली आहे.निरस झालो आहे.मला हे आयुष्य असार वाटू लागल आहे..!

आपण ही अशा अवस्थेत अनेकवेळा जातो..नाईलाजाने परत आपल्या प्रपंचात येतो..!आणि या येरझाऱ्यातून स्वतःची दमणूक करून घेतो.असा काळक्रमण करणं अवघड होतं जात.याला उपाय एकच..गुरुचरणी अखंड अढळपद..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे विसावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे विसावे...

समर्थ म्हणतात..

रामदास म्हणे माझा..
संसार तुज लागला..
संशयो वाटतो पोटी..
बुद्धि दे रघुनायका..!

रामराया... मी स्वतःला तुझा दास समजतोय,तुझा सेवेकरी,तुझा अंकित मी आहे.माझं जगणं,माझा प्रपंच,माझा उदरनिर्वाह हे सगळं आता तू आहेस.त्यामुळे माझं जीवित असणं हेच आता रामदासी आहे.
रामराया..हे सगळं असून सुद्धा मला उगीचच संशय वाटतो.मन भयभीत होतय.तुझ्या निर्गुण भक्तीत स्वतःच अस्तित्व मिळून जावं तो क्षण दुरावतोय की काय अशी आशंका मनात वारंवार उठती आहे.

 रामराया..या सगळ्याचा सुखांत हा तुझ्याशी एकरूप  होण्यातच आहे..म्हणून मला अश्वस्त होण्यासाठी तू मला अचल अशी बुद्धि दे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे एकोणिसावे.

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे एकोणिसावे.

समर्थ म्हणतात..

आशा ही लागली मोठी.
दयाळुवा दया करी..
आणिक नलगे काही..
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया..मनुष्याचा स्थायीभाव आहे.तो आशावादी आहे.मी ही त्याला अपवाद नाहीये.मला ही आशा फक्त तुझ्या समचरणी एकरूपतेची आहे.
आता तू मला आणखी प्रतीक्षा करायला लावू नको.मला माहिती आहे तू दयाळू असल्यामुळे तू मला जास्त वाट बघायला लावणार नाहीस.तुझ्या कृपेची अश्वस्तता याशिवाय मला कोणतीच वांछा नाहीये.अशी कृपा,अशी करुणा तू माझ्यावरही करशीलच.

फक्त मला तोपर्यंत धीर धरायची बुद्धि दे रे रघुनायका...!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे आठरावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे आठरावे...

समर्थ म्हणतात..

उदंड ऐकिली कीर्ती..
पतीतपावना प्रभो..
मी येक रंक निर्बुद्धी..
बुद्धि दे रघुनायका..!

रामराया..तुझ्यासमोरच्या प्रत्येक संकीर्तनात तुझ्या कृपेचे वर्णन,लळीत मी ऐकत आलोय.
तुझ सगळ्या भक्तांच  पापक्षलन करून रामरंगी रंगवून घेणारा अशी ओळख आणि त्यासाठीचा अनभिषिक्त असा ईश्वर अस  तुझ अस्तित्व आहे.
रामराया..या सगळ्यांशी तुलना करताना मी एक अतिशय निरस,संगहीन,विकारी,रुचीहीन,भिकारी असा आहे त्याची जाणीव आहे.
रामराया..मला यातून उठून तुझी चरणरज होण्याची यथोचित  बुद्धि दे..म्हणजे माझे आयुष्य कारणी लागेल..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे सतरावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे सतरावे...

समर्थ म्हणतात...

भक्त उदंड तुम्हाला..
आम्हाला कोण पूसते..
ब्रीद हे राखणे आधी..
बुद्धि दे रघुनायका..!

रामराया.. तुझी कीर्ती जगद्विख्यात आहे.तू सर्वसमावेशक आहेस.त्यामुळे तुझे अनुयायी,तुझे भक्त,तुझे पाईक असंख्य आहेत.या सगळ्या मांदियाळीत माझें अस्तित्व,माझी भक्ती ही खूपच थोटी आहे.त्यामुळे माझी खुशाली विचारण्यासाठी तुझ्याशिवाय कोणीही उत्सुक नाही.
रामराया..तू ही भक्तांचे हट्ट पुरवणारा,निरागस भक्तीला पावणारा, त्यांच्यासाठी धावून येणारा असा आहेस.अशी तुझी ख्याती आहे.
आता माझा ही तुझ्या पायाशी हट्ट आहे तुझी ही ख्याती,तुझं ब्रीद आता पाळ...
आणि मला ही तुझ्याशी अविचल रहायची बुद्धि दे..!!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे सोळावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे सोळावे...

समर्थ म्हणतात..

सोडविल्या देवकोटी..
भूभार फेडिला बळे..
भक्तांसी आश्रयो मोठा.
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया..तुझी कीर्ती अशी आहे देवाधिकांच्या संकटसमयी तू धावून येऊन,वेळोवेळी विविध सात्विक,तामसिक अवतार घेऊन त्यांची संकटातून सोडवणूक केली आहेस.

रामराया..देवाधिकांबरोबर त्यांच्या अनेक भक्तांसाठी ही तू संकटमोचन होऊन त्यांच्यावर सुखाची सावली निर्माण करतोस..!
रघुनायका..हे सगळं करतोस च याचा अर्थ माझी मूढमती तू सहज बदलून मला सत्व बुद्धि देशीलच..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे पंधरावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे पंधरावे...

समर्थ म्हणतात...

काया वाचा मनोभावे..
तुझा मी म्हणवीतसे...
तू भक्तवत्सला रामा...
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया..जाणत्या संतानी सांगितल्याप्रमाणे मी अनुकरण करतोय.माझ शरीर तुझ्या सेवेसाठी,माझी वाचा तुझ्या संकीर्तनासाठी,माझं मन तुझ्या चिंतनासाठी,माझा भाव तुझ्या कृपेसाठी..अर्पण करायचा मी प्रयत्न करतोय.

रामराया..म्हणून कदाचित मला तुझा पाईक म्हणून जग ओळखू लागलंय...त्या योगे मी तुझा भक्त म्हणवून घेतोय.

रामराया...माझा पालनकर्ता तू आहेसच.मी तुझा लेकरू आहे हे सुद्धा तितकंच सत्य आहे.

रामराया..तुझं भक्तवत्सल अस रूप आहे.तुझं केवळ दर्शन ही मला जगातल्या चांगुलपणाच अस्तित्व दाखवत.

रामराया..तेच भक्तवत्सल रूप समोर ठेऊन तुला मी मागणी करतोय... मला प्रसन्न होऊन तुझ्या रामरंगी रंगायची बुद्धि दे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे चौदावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे चौदावे...

समर्थ म्हणतात...

उदास वाटते जीवी...
आता जावे कुणीकडे..
तू भक्तवत्सला रामा...
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया.. आता अशी वेळ आलीये..की तुला पाहिलं नाही,तुझ्या समीप आलो नाही..उपासना केली नाही..अस जर झालं तर मला चुकल्या सारख वाटत.मला उदास झाल्यासारखं वाटत..त्यामुळे कुठं जावं,काय करावं म्हणजे मला समाधान मिळेल हे कळत नाही..
रामराया..तू  वात्सल्यरुप  म्हणजे मला साथ देणारा,मन राखणारा,माझी काळजी घेणारा असा तू आहेस..!
रामराया.. आता फक्त मला तू तुझ्याशी एकरूप व्हायची  बुद्धी मला दे म्हणजे मला हा परमार्थ साधता येईल.आणि माझं सार्थक होईल..!

श्रीराम..!

प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे तेरावे..

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे तेरावे..

समर्थ म्हणतात..

पीशुणे वाटती सर्वे..
कोणीही मजला नसे..
समर्था तू दयासिंधू..
बुद्धि दे रघुनायका..!

रामराया..एकदा तुझ्याकडे मुख करून बसलो की पूर्ण समाज माझ्या पाठीशी जातो..मी या समाजाप्रती विन्मुखता स्वीकारतो.आणि मला माहिती आहे की तुझ्याकडे यायचं असेल तर  भौतिक,ऐहिक आयुष्याकडे पाठ करायलाच हवी.आणि मग सहाजिक मला तुझ्यासमोर सगळे परके वाटतात..!तुझ्याशिवाय माझ्याजवळच अस कोणीच रहात नाही.तूच कर्ता, तूच करविता.याची मला मनोमन खात्री आहे.सर्वशक्तिमान असा तू आहेस. रामा..माझ्यासारख्या अजाण भक्तासाठी तू पूर्ण दयावंत आहेस..फक्त मला तुझी ही दया, कृपा ओळखायची बुद्धि तू मला दे..म्हणजे रघुनायका आयुष्याच सार्थक होईल..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे बारावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे बारावे...

समर्थ म्हणतात..

देईना पुर्विना कोण्ही..
उगेची जन हासती..
लौकीक राखिता येना..
बुद्धि दे रघुनायका..!

रामराया...मला अपेक्षा  खूप आहेत.पण त्या पारमार्थिक जास्त हव अस वाटू लागलं आहे...आणि ऐहिक, भौतिक याची गरज कमीनाचे पण तेही आता कोणाकडून मिळत नाही आणि मला मागवत नाही.कारण भौतिक सुख माझं पूर्ण समाधान करत नाहीत.आणि पारमार्थिक सुखाची ओढ मला त्या सगळ्या मायेत गुंतून देत नाहीये.माझी ही एकंदरीत अवस्था बघून लोक माझी चेष्टा करू लागले आहेत.कारण माझं व्यक्तित्व मला एक दिशा देत नाहीये.हास्यास्पद होत चालले आहे.मला माझ्या आयुष्याची कमीत कमी ओळखही या समाजात निर्माण करता येत नाहीये.काय करू रामराया...?

मला ही ओळख निर्माण करायची आणि समाधान अंगी बाणवता येईल अशी  स्थिर बुद्धि दे रे रामा...!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे अकरावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे अकरावे...

समर्थ म्हणतात...

संसार नेटका नाहीं..
उद्वेग वाटतो जिवी..
परमार्थ आकळेना कीं..
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया..मला कळतय संसार म्हणजे साकल्य बुद्धीने जीवनरहाटी समजली जाते.ती सफलतेने  पुरी होणं महत्वाच आहे.तो संसार सफल होण्यासाठी सहजता जरुरी आहे.पण ती येत नाहीये.नाती आहेत पण परमसुख मिळत नाही..साधन आहेत पण समाधान नाही..समाज आहे पण समाजाभिमुखता नाही...!आणि तस नसल्याने एकप्रकारची निरिच्छता,उद्वेगता निर्माण होत चाललेली आहे.जिथं संसार,प्रपंच जमत नाही..त्यामध्ये नानाप्रकारच्या शंका,कुशंका असतात..तिथं परमार्थाची वाट कशी जमू शकेल..?

रामराया..या परमार्थाच,प्रपंचाच सकळ आकलन होऊन तो माझ्या मनात,देहात,आयुष्यात सदृढपणे रहावा अशी बुद्धि मला देशील ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे दहावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे दहावे...

समर्थ म्हणतात...

कळेना स्फूर्ति होईना..
आपदा लागली बहू..
प्रत्यही पोट सोडीना..
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया..मला तुझं गुणगान करताना आंतरिक ऊर्जा,प्रतिभा ही आवश्यक आहे.मी हे करताना येणारी मानसिक,भौतिक,सामाजिक संकट,विघ्न ही वाढत चाललेली आहेत.हे सगळं आहेच याशिवाय माझे  शरीरधर्म,भूक माझी पाठ सोडत नाहीये.हे सगळं भागवण्यासाठी,शमवण्यासाठी जी लागते ती धडपड,अर्थार्जना साठी काहीसा कासावीसपणा मला तुझ्या उपासनेपासून लांब न्हेऊ पहातोय.
रामराया..मला या सगळ्याबद्दलची सम्यक दृष्टी आणून ह्या सगळ्याला दुय्यमता आणून तुझ्या उपासनेची दृढ बुद्धी दे रे..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे नववे..

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे नववे..

समर्थ म्हणतात..

चित्त दुश्चित्त होता हे..
ताळतंत्र कळेचिना..
आळसू लागला पाठी..
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया.. माझं मनच माझ्या विरुद्ध झाल्यासारखं आहे.म्हणजे मला ध्यास तुझा लागलाय..आणि मन हे भौतिक सुखाकडे मला ओढू लागलं आहे.मी त्याला तुझ्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करतोय पण ते नेमकं उलटी कडे जातंय.तुझ्या समचरणाची ओढ,त्याची पायवाट मी एकाग्रपणे चालू शकत नाहीये.कोणत्याच यमनियमांची तमा न बाळगता हे मन विद्ध होत चालल आहे.आणि त्या मागे धावता धावता,त्याला आवरता आवरता माझी मानसिक थकवणूक होत चाललीये..आळस,दुश्चित्त पणा हा वाढू लागला आहे..!याचा अर्थ असा नाही की मी त्याला भुलतोय. पण तरीही ही माझी कसोटीची वेळ आहे हे नक्की..!
रामराया..हे सगळं मनाच मानीपण ताब्यात ठेऊन ते मला तुझ्याकडे वळण्याची कृतबुद्धी आता तरी मला दे ना रे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे आठवे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे आठवे...

समर्थ म्हणतात...

संसारी श्लाघ्यता नाही.
सर्वहि लोक हासती..
विसरू पडतो पोटी..
बुद्धी दे रघुनायका..!

रामराया...माझा संसार मग तो प्रपंचातला असो किंव्हा परमार्थातला असेल त्यात प्रवाहीपणा नाहीये.एकसंधता नाहीये.आणि माझ्या वागणुकीच,समाजातील वावराच हसू होऊ लागल आहे.समाजमनाला माझा विसर पडू लागला आहे.मी असून नसल्यासारखा झालो आहे.
रामराया..हे सगळ सुरळीत  करायची बुद्धी मी तुला मागतोय..!ती बुद्धी रघुनायका मला देशील ना?..!


श्रीराम.!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे सातवे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे सातवे...

समर्थ म्हणतात...

प्रसंग वेळ तकेंना..
सुचेना दीर्घ सूचना..
मैत्रिकी राखता ये ना..
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया...या आयुष्यात जगण्यासाठी प्रसंगानुरूप वागणे,रहाणे हे क्रमप्राप्त आहे.काळानुरूप सात्विक, बदल करण हे ही अपेक्षित आहे.त्याप्रमाणे ते आचारात आणण हे ही आलंच. पण भविष्याचा,आयुष्याचा कोणताही अंदाज न आल्यामुळे मला हे काहीच करता येत नाही.याशिवाय तू जे अनेकमार्गाने मार्गदर्शन करतोस त्याही सूचना मला अज्ञानतेमुळे कळत नाहीयेत.
समाजाशी,भोवतीच्या लोकांशी अगदी माझ्या स्वतःच्या मनाशीसुद्धा  जुळवून घेणं,मैत्री राखण जमू शकत नाहीये..!
रामराया...अगदी सरळ सांगायचं झालं तर आयुष्यातली,नात्यातली,समाजातली सुसूत्रता मी हरवून बसलोय ती जुळवून देण्याची यथोचित बुद्धी तू मला देशील का रे..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे सहावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे सहावे...

समर्थ म्हणतात..

नेटके लिहिता येना..
वाचिता चुकतो सदा..
अर्थ तो सांगता येना...
बुद्धि दे रघुनायका....!

रामराया....ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल,महानुभवांनी जपलेल अस अध्यात्म,आचारग्रंथ मी माझ्या मनपटलावर उतरवू पहातोय तेही निर्दोषरित्या जमत नाहीये..!लिहिलेलं ,आठवलेलं मनाला वाचून सांगावं तर ते ही मन द्विधा असल्यामुळे जमत नाहीये..!या सगळ्याचा एक अर्थ तो म्हणजे तुझ्या भक्तीची मी केलेली अनास्था,हे सुद्धा मला माझ्या मनाला पटवून देता येत नाहीये..!
रामराया..इतक्या दोलनामय टोकावर मी उभा आहे की तू जर मला याबद्दल मार्गदर्शन केलं नाहीस..तू शिक्षित केलं नाहीस तर मी काय करू..?म्हणून मला त्यासाठी योग्य ती बुद्धी देशील ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे पाचवे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे पाचवे...

समर्थ म्हणतात..

तुझा मी टोणपा झालो.
कष्टलो बहुतांपरी..
सौख्य ते पाहता नाही..
बुद्धी दे रघुनायका...!


रामराया...मी तुझ्या प्राप्ती साठी अनिर्बंध झालोय..!इतर कुठल्याही मानवी कृतीची,भावनांची तमा न बाळगण्या इतपत मी निर्मम झालोय..टोणपा झालोय..!आणि त्यायोगाने मी खूप कष्टावलो जातोय कारण मला इतर कशातच ममत्व राहीनास झालंय.आणि ओघानेच त्या विविध मार्गापासून मिळणार सुख ही प्रथीत होत नाहीये.
रामराया.. या सगळ्या भवमय कसरतीतून स्वतःला  सांभाळण्याची बुद्धी तू मला दे रे..देशील ना..?

श्रीराम ...!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे चौथे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे चौथे...

समर्थ म्हणतात....

बोलता चालता येना...
कार्यभाग कळेचिना..
बहुत पीडिलो लोकी...
बुद्धी दे रघुनायका...!

रामराया...माझी व्यक्तता ही तुझ्यापर्यंत,समाजापर्यंत पोहचू शकत नाहीये.कदाचित तुझ्या कृपेमुळे येणारी उत्कटता  अजून पूर्ण जागी होत नाहीये.त्यामुळे या जन्मी येऊन जे माझं इतिकर्तव्य आहे त्याचा ही यथोचित मला बोध होत नाहीये.
माझं मन आणि भोवतीचा समाज या दोन टोकामध्ये सांधता सांधता मला मी समाजापासून दुरावलो जातोय अस वाटू लागलं आहे..!त्यातून मला समाजापासून पीडा होतीये असा आभास होतोय..!
पण रामराया,मला तस काहीही नाहीये हे समजण्याची बुद्धी तुझ्यामुळे मिळतीये पण ते वळण्याचीही देशील ना??

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे तिसरे.

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे तिसरे.

समर्थ म्हणतात..

अन्न नाही वस्त्र नाही..
सौख्य नाही जनामध्ये..
आश्रयो पाहता नाही..
बुद्धी दे रघुनायका...!

रामराया..उदरभरण करण्यासाठीचा प्रपंच मला साधता येत नाहीये.तुझ्या भक्तीशी रमलेला,त्यातच गुंतलेला मी असल्यामुळे हा व्यावहारिक प्रपंच मला साधता येत नाहीये. मला अन्न,वस्त्र याची आवश्यकता,निकड पुरवता येत नाहीये.अर्थात अस विदेही होणं हे चांगलंच पण  ते सुद्धा मला साधलेल नाही.मी एकसारखा तुझ्या नामात,तुझ्या दर्शनाच्या धुंदीत असल्याने समाजामध्ये मला सुख मिळेनास झाल आहे..किंबहुना ते मला आवडेनास झालं आहे.
त्यामुळे मी धड तुझा नाही अन त्या भौतिक सुखाचा,समाजाचा नाही..अशा एका द्वैत स्थितीत आलो आहे..!
मला यातून बाहेर येण्याची..सफल बुद्धी रामराया मी तुझ्याकडे मागतोय..देशील ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने... समर्थांचा विनोद..

जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने...

समर्थांचा विनोद..

समर्थानी दासबोधात टवाळा आवडे विनोद. अशी फक्त एक उक्ती वापरल्याने काही वसंत कानेटकर यांच्यासारख्या  समीक्षकांनी समर्थाना विनोदाच वावडे आहे असा निर्णय देऊन टाकला..!

वास्तविक पाहता भाषाप्रभु असलेले समर्थ हे आयुष्यातल्या,परमार्थाच्या,संसारातल्या प्रत्येक रंगाची,बाजूची जाण असलेले आहेत.
समर्थ टवाळा आवडे विनोद असे म्हणून विनोद आणि तो करणाऱ्यांच मूल्यमापन करतात ते अभ्यासपूर्ण..!
या उक्तीचा अर्थ दुसरा अर्थ असा होतो की टवाळखोराना फक्त विनोद,भाषिक टोमणे एवढेच आवडतात.!
त्यामागे गर्भितार्थ, हलकेफुलकेपणा,भाषाशास्त्र किंव्हा बुद्धि असे काहीच नसते.
वास्तविक रित्या समर्थांनी रचलेली भारुडे,काव्ये असे अनेक प्रकार आहेत.की ज्यात त्यांची विनोदबुद्धी दिसते.

यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग जेंव्हा ३६ वर्षानंतर आईला भेटायला समर्थ जेंव्हा गेले तेंव्हा त्यांचा बलदंड पण थोडासा अघोरत्वा कडे झुकलेला चेहरा व शरीरयष्टी बघितल्या वर आईला शंका आली की नारायणाला भूतबाधा तर झाली नसेल..??
त्यावेळी समर्थानी दिलेलं उत्तर त्यांच्या विनोदबुद्धीची उंची दाखवत..!
समर्थ म्हणतात..
होते वैकुंठेचे कोनी.
शिरले आयोध्याभुवनी..
लागे कौसल्येचे स्तनी..
तेची भूत गे माये..
सर्व भूतांचे हृदय..
नाम त्याचे रामराय..
रामदास नित्य गाय..
तेची भूत गे माये...!

ह्या विनोदात काळजी, श्रद्धा, शाब्दिक कोटी,स्वपरिक्षा,स्वओळख आणि उपदेश हे सारं आहे..!
इतका सर्वांगीण विनोद करू शकलेल्या समर्थाना विनोदाच वावडे कस असेल..?

दासबोधात ठीकठिकाणी अनेक शाब्दिक कोट्या समर्थानी केल्या आहेत.!किर्तनभक्ती,स्वगुणपरीक्षा समासात तर त्यांनी त्याचा मुबलक वापर केला आहे.
आळशीपणा,निद्रानिरुपण यामध्ये त्यांनी अनेक मनुष्य अवस्था साकारल्या आहेत त्यात उत्तम विनोदनिर्मिती झाली आहे.
मुर्खलक्षणामध्ये ज्यामुळे विनोद निर्माण होतात असे अनेक स्वभावविशेष समर्थांनी वर्णन केले आहेत.

समर्थ नेहमी फक्त विनोदापेक्षा त्याच्या उच्च पातळी,उत्तम कसदार असण्याबद्दल आग्रही आहेत.

समर्थांच्या साहित्यात उपरती ही एक अतिशय महत्वाची अवस्था मानली गेलीये..!
त्यात त्यांनी स्वतःवर केलेले अनेक विनोद आणि त्यामुळे स्वतःचे झालेले हसे हे सुदधा स्वतःहुन वर्णन केले आहेत.!
स्वतःवर विनोद करणाऱ्याला स्वतःतला माणूस कळतो.त्याच साक्षेपी मूल्यमापन करता येत.
समर्थांचा विनोद केवळ करमणूक नाही तर तो एक उत्तम भाषासौष्ठवाचा नमुना आहे.सर्वांगीण,सर्वशक्त..!
विनोदाचा अतिरेक त्यांना मान्य नाही.समर्थांचा विनोद स्वत्विक तर आहेच पण तो विचारी ही आहे.!

थोडक्यात समर्थांचा विनोद हा सुद्धा सारखाच समर्थ आहे..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२५३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे दुसरे.

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे दुसरे.

समर्थ म्हणतात...

मन हे आवरेना की..
वासना वावडे सदा..
कल्पना धावते सैरा..
बुद्धि दे रघुनायका...!


रामराया...तूच या शरीरात दिलेलं मन आहे ना ते मन ही आता अति चंचल होऊ लागलंय.हे चांचल्य मला,माझ्या वृत्तीला आवरता येत नाहीये.या कल्पनेची मुख्य उत्पत्ती जी वासना,अतिरेकी स्वप्न आता हे ही आता नको वाटतेय..पण सदा हे सगळं मनात डोकावतय..!हे चंचल मन ही कल्पनाशक्ती,वासनाशक्ती घेऊन सैराट अवस्था निर्माण करतीये..!
इतकं सगळं मानसिक द्वंद्व चाललय रामा आता या सगळ्यातून सावरायची बुद्धी तू मला देशील..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (५) कडवे एक

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे एक.

समर्थ म्हणतात...

युक्ती नाही बुद्धि नाही
विद्या नाही विवंचिता..
नेणता फक्त मी तुझा...
बुद्धी दे रघुनायका...!

रामराया...

मी,माझा प्रपंच,माझं जगणं हे सारं आता तूच आहेस.पण या व्यवहारी  जगात जगण्यासाठी आपल्याला व्यवहार नावाचं चातुर्य वापरावं लागत ना..?आणि ते ही सहज मनाने वापरण हे या भौतिक जगात शक्य नाही..!त्याला सावधानता,कुशलता लागते.ती प्राप्त कशी करायची यासाठी विद्या लागते..!पण या सगळ्या व्यवहारिक जगापासून दूर व्हायचा संकल्प असल्यामुळे मी या बाबतीत मी अज्ञानी रहातोय अस मला वाटायला लागलं आहे.पण रामराया मी तुझा भक्त आहे ना..मला  सांभाळून घे..मला या सगळ्याची बुद्धी दे...!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (४) कडवे नववे.

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे नववे.

समर्थ म्हणतात..

ब्रिदाकारणे दीन हाती धरावे..
म्हणे दास भक्तांसी रे उद्धरावे..
सुटो ब्रीद आम्हांसि सांडूनि जाता..
रघुनायका मागणे हेंचि आता..!

रामराया....अनादी काळापासून तू भक्तांना प्रसन्न होणारा आहेस.त्यांच्यासाठी धावून येणारा आहेस.त्यांच्यासाठी तिष्ठत असतोस..आणि हे तुझं असणं हे कायमच तुझं ब्रीद आहे..हे तू भक्तांना दिलेलं वचन आहे..!ते आता सिद्ध करशील ना..?

रामराया..तू हे सिद्ध करून साऱ्या भक्तांचा उद्धार करून त्यांचं जीवन कृतार्थ करशील.त्यांच्या मनात भक्ती निर्माण करून,त्याच पोषण करून तू मनुष्याला सिद्ध स्वरूपापर्यंत किती सहजपणे आणतोस.ते आता माझ्यासाठी करशील ना रे रामा..!

रामराया..तुला माहिती आहे का?अस जर तू केलं नाहीस तर तुझी संत,महानुभवांनी केलेली स्तुती ही खोटी ठरेल.. तू मला,माझ्यासारख्या भक्तांवर कृपा केली नाहीस तर तुझं भक्तपालक हे ब्रीद खोटे ठरेल ना..?

रामराया..माझी भक्ती जरी कमी पडत असेल,माझ्यातल्या वैगुण्य जरी अजून पुरत सरल नसेल तरी कृपावंत  हे ब्रीद राखण्याची मागणी मी तुझ्याकडे वारंवार करतोय..!

समर्थ वात्सल्यभक्ती अनुसार येणारा अधिकार इथे वापरतायत.आपण ज्याच्या भक्तीत,प्रेमात अखंड आहोत तिथंच आपण प्रेमाचा अधिकार गाजवू शकतो..!समर्थ तोच लाघवी अधिकार इथे वापरतायत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८१२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (४), कडवे आठवे.

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे आठवे.

समर्थ म्हणतात...

समर्थापुढे काय मागो कळेना..
दुराशा मनी बैसली हे ढळेना..
पुढे संशयो नीरसी सर्व चिंता..
रघुनायका मागणे हेंचि आता..!

रामराया...मला कधीकधी माझं हसू येत..मी जगन्नाथासमोर किती किरकोळ आणि सलग मागण्या करतोय..!तुझ्यासारख्या दयावंतापुढे मी काय मागायचं या बद्दल पूर्ण अनभिज्ञ आहे..!

रामराया...या कायमच्या आशंकांमुळे मला कधी कधी तुझें प्राप्तव्य मिळेल की नाही याबद्दल अनिश्चितता मनात येत रहाते...!

रामराया...आता तरी यापुढे तू माझ्या मनातले हे सगळे संशय,सगळे व्यत्यय नाश करून टाक..म्हणजे मला तुझ्याशी एकत्व जोडता येईल..!

रामराया..हे सगळं मला आत्मसात करता याव असा आशीर्वाद मला तुझ्याकडून मिळावा ह्याची मनापासून मागणी मी तुझ्याकडे वारंवार करतोय..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (४), कडवे सातवे.

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे सातवे.

समर्थ म्हणतात...

मनी कामना कल्पना ते नसावी..
कुबुद्धी कुडी वासना निरसावी..
नको संशयो तोडी संसारवेथा..
रघुनायका मागणे हेचि आता...!

रामराया...मनाची द्विधा अवस्था तुला काय सांगू..?आयुष्यातील अनेक भ्रामक इच्छांनी आणि त्या पूर्ण होत नसतील तर त्याच्या कल्पनाविलासानी उन्नत होणार मन मला आता नको आहे रे...!

रामराया..अशा कामना पूर्ण करण्यासाठी येनकेन प्रकार अवलंबावे लागतात..असात्विक विचार,कृती करायला लागतात..आणि त्यातून जी वाईट इच्छा निर्माण होते ती वासना..या सगळ्याचा मला तिटकारा आलाय..त्यातून मला आता बाहेर घे रे..!

रामराया..मला आता कुठल्याही दोलनामय अवस्थेत,मोहपाशाच्या गुंत्यात रहायच नाहीये..माझ्या मनात कोणताही त्याबाबतीत संदेह नाही..आणि जर माझ्या नकळत जर तो राहिला असेल अस तुला वाटत असेल तर तो तू पूर्ण छेदून टाक..!!

रामराया..या सगळ्या अनेक अशा चक्रव्यूहातून मला तू अलगद बाहेर घेऊन तुझ्या कुशीत घे हेच मागण आहे माझं...!

समर्थ आता स्वतःची भक्ती निरक्षीर विवेकाने तपासून पाहू लागले आहेत..!त्यांना समजू लागले आहे की या आपल्या उपासनेत नक्की कशाची बाधा कायम रहाणार आहे..!आणि ती बाधा नाश करण्यासाठी समर्थ रामरायाला ही मागणी करतायत..!आपल्याला ही निरक्षीर बुद्धी यायला पाहिजे होय ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (४), कडवे सहावे

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे सहावे

समर्थ म्हणतात...

भवे व्यापलो प्रीतिछाया करावी...
कृपासागरे सर्व चिंता हरावी..
मज संकटी सोडवावे समर्था..
रघुनायका मागणे हेचि आता...!

रामराया...माझ्या भोवतीची ही सारी आव्हाने,आकर्षणे याची वास्तवता मला प्रपंचात ओढतायेत,त्यातच मी गुंतत चाललोय..अशा सगळ्या ओढाताणीत तुझ्या सबळ सावलीची अपेक्षा माझी तुझ्याकडे आहे रे..!

रामराया..तू माझ्या या  अनावश्यक  मानसिक,शारीरिक धावपळीतून उत्पन्न होणारी होरपळ,चिंता दूर करण्यासाठी माझ्यावर कृपा करशील याची तुझ्याकडून अपेक्षा  आहे..!

रामराया..या सगळ्यामुळे मी इतका कोंडीत सापडलोय,मी माझ्याच  मानसिक कैदेत सापडल्यासारखा झालोय..या संकटातून मला सोडव रे...!

रामराया...या सगळ्या कृपेचा अखंड ओघ माझ्याकडे असू दे ही मागणी तुझ्याकडे वारंवार करतोय..!

समर्थ उपासनेत,भक्तीत रंगत जात असताना येणारी आकर्षणे आणि त्यातून सोडवणूकीच रामाला मागण याच वर्णन अतिशय तरलतेन आणि स्वच्छवृत्तीने करतात..हो ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके..(४), कडवे पाचवे...

समर्थांची करुणाष्टके..(४)

कडवे पाचवे...

समर्थ म्हणतात

नको द्रव्यदारा नको येरझारा..
नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा...
सगुणी मज लावी रे भक्तीपंथा..
रघूनायका मागणे हेचि आता..!

रामराया..प्रत्येक दिवशी माझी पूर्ण क्रयशक्ती ही अर्थार्जन,उदरभरण,इंद्रियसुख यासाठी खर्च होत चाललेली आहे..प्रपंचाची ऐहिक जोडणी करत माझी शाररिक आणि मानसिक घालमेल होऊ लागली आहे..!जी आता मला नकोशी वाटू लागली आहे..!

रामराया..या सगळ्या प्रापंचिक उठाठेवी करताना मला माझं अनुभवाच आणी मिळवलेलं शैक्षणिक चातुर्य, बळ वापरायला लागत आहे..!त्यातून मी काहीवेळी यशस्वी झालो पण मग स्वतःच्या बुद्धिबद्दल उगीचच गर्व वाटू लागतो आहे..!

रामराया..या सगळ्या नकोश्या झालेल्या उपाध्याना मी कंटाळलो आहे..!मला आता तरी तुझ्या भक्तीची वाट दाखव..म्हणजे तुझ्याशी एकरूप होण्याची पहिली पायरी जी सगुणभक्ती आहे ती तरी मला प्राप्त होईल...!

रामराया.. ही सगुण भक्ती,ही प्रपंच,उपाधीची मुक्ती मला आता तरी प्राप्त करून दे ही प्रार्थना मी वारंवार करतोय..!!

समर्थ त्यांच्या साधनेतील भक्तीची कवाड आता उलगडू लागले आहेत.!प्रपंच निरिच्छता,वैषयीक उदासीनता यामुळे निर्माण होणाऱ्या सगुणभक्तीच्या दिशेच इथे वर्णन करतायत..!
आपण ही सगुणभक्ती अनुभवूया ना??

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (४), कडवे चौथे

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे चौथे

समर्थ म्हणतात..

सदा सर्वदा योग तुझा घडावा..
तुझे कारणी देह माझा पडावा..
नुपेक्षी मज गुणवंता अनंता..
रघुनायका मागणे हेचि आता...!

रामराया..अहर्निश जगतोय,श्वास घेतोय..मला या प्रत्येक घटिकेला तुझं अस्तित्व व्यापून असावं..माझ्या पूर्ण आयुष्यावर तुझ्या कृपेची छाया भरून उरावी असा ध्यास मनाने घेतलाय..!

रामराया..तुझ्या संकीर्तनात,तुझ्या भक्तीत,तुझ्या सेवेत माझा देह झिजून गेला तरी चालेल..मला तुझ्या सख्यत्वाच चंदन प्राप्त होईल..!!

रामराया..पण हे सगळं मी तुला मागतोय,फक्त मागतोय..पण याचा कंटाळा येऊन तू माझी उपेक्षा करणार नाहीस याची खात्री आहे..कारण तु कृपासागर आहेस..अनंत आहेस..अपरिमित गोडवा आहेस..!

रामराया..हे सगळं माझ्यासाठी करावंसं..माझ्या जगण्याच इप्सित साध्य करून घ्यावस ही मागणी मी तुझ्याकडे नाही करणार तर कुणाकडे करणार..?

समर्थ या कडव्यात आयुष्यच फलित सांगतात.जन्माला येऊन मनुष्याने काय साध्य करायचे हे ते आवर्जून सांगतात..आणि त्याप्रमाणे त्यांनी ते साध्य केलेलं ही आहे..!
आपल्याला ही ह्या साध्याची प्राप्ती व्हावी ही सुद्धा प्रार्थना समर्थांकडे,रामाकडेच आपण करूया...!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके(४), कडवे तिसरे...

समर्थांची करुणाष्टके(४)

कडवे तिसरे...

समर्थ म्हणतात...

मनी वासना भक्ति तुझी करावी...
कृपाळूपणे राघवे पुरवावी..
वसावे मज अंतरी नाम घेता..
रघूनायका मागणे हेचि आता...!

रामराया...मला माहिती आहे की इच्छेच आग्रही रूप म्हणजे वासना..! वासनेन मन व्यापल की दुसरं काहीच सुचत नाही..!पण माझ्या मनात दाटलेल्या या भक्तीरुपी वासनेच ध्येय ही तुझ्या चरणाशी एकरूपता,तुझं सख्यत्व एवढीच आहे.

रामराया..मला माहिती आहे तू इतका कोमलमनाचा,दयाळू आहेस की माझा हा तुझ्या भक्तीसख्यत्वा चा हट्ट तू प्रेमाने,मायेने पुरा करशीलच...!

रामराया...तू तुझ्या सांप्रत कीर्ती प्रमाणे मनःपूर्वक नाम घेतल्यावर सत्वर आणि विनाविलंब पावतोस..तसा माझ्या नामस्मरणाने प्रसन्न होऊन माझ्यात वसलेल्या आत्मारामाशी माझी भेट घडवून कृपा करशीलच..!

रामराया.. तुझ्याकडे आता हेच मागणे आहे रे..माझ्या या नामपूजेने,मानसपूजेने,सकृत पूजेने प्रसन्न होऊन मला तुझ्याशी एकरूप होऊ दे..!

समर्थ रामरायाला आता भक्तवत्सल अधिकारवाणी ने प्रेमळ साद घालतायत.. आग्रह करतायत..!स्वतःच्या उपासनेशी आपण दृढ असू तर समर्थासारखा योगी अशी आग्रही उपासना करू शकतो ..हो ना.?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (४), कडवे दुसरे...

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे दुसरे...

समर्थ म्हणतात...

तुझे रुपडे लोचनी म्या पहावे...
तुझे गुण गाता मनासी रहावे..
उठो आवडी भक्तीपंथेचि जाता..
रघुनायका मागणे हेचि आता...!

रामराया...सुंदर,मनोहर कुणाला आवडणार नाही?दृष्टीस पडावे ते फक्त लोभस,देखणे..!आणि या त्रिभुवनात शाश्वत रहाणार सुंदर अस तुझं दर्शन,तुझी प्रतिमा,तुझी प्रेमळ छबी आहे..आणि हेच माझ्या नजरेने पहायला मिळतंय हे भाग्य माझं आहे..आणि तेच मला कायम मिळाव अशी मनोकामना आहे..!

रामराया...तुझ्या या सावळ्या सर्वांगसुंदर दर्शनाने दिसत असलेल्या,आत पोहचत असलेल्या तुझ्या निर्मळ कथा,तुझ्या अगम्य लीला..ह्या सदैव माझ्या मनात ,विचारात असाव्यात..आणि त्या सगळ्या मला त्याच उत्कटतेने समोरच्याला समजावून देता याव्यात..!

रामराया...मला माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक  सत्पुरुष,संत मला तुझ्या दर्शनाची,तुझ्या एकरूपतेची वाट दाखवणारा आहे..अशा वेळी मला कोणताही संदेह न मनात आणता त्या निर्देशित भक्तीच्या वाटेवर जाण्याची सहजबुद्धी प्राप्त व्हावी...!

रामराया...तुझ्याकडे येऊन तुला मागण्याच्या या हट्टामध्ये मी अनेक मागण्या करतोय..पण मी तुझ्याकडेच मागणार ना..?ते मागतोय...!!


समर्थांची कलादृष्टी, सौन्दर्यदृष्टी ही त्यांच्या साधनाकाळात ही तेवढीच उत्कट होती..!पण ही दृष्टी कुठे लावायची,कशी लावायची..हे समजवतात..!समजून घेऊ या आपणही..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (४), कडवे पाहिले...

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे पाहिले...

समर्थ म्हणतात...

उदासीन हे वृत्ती जीवी धरावी...
अती आदरे सर्व सेवा करावी..
सदा प्रीति लागो तुझे गूण गाता..
रघुनायका मागणे हेचि आता...!


रामराया...मला माझी वृत्ती वैराग्यपूर्ण करावी अस वाटतय.उदासीनता अंगी यावी अस वाटतय..(उदासीनता म्हणजे एकप्रकारची अतृप्तताच असते..जगातले सामाजिक,मानसिक,शाररिक अनुभव घेतल्यानंतर ही एक उणेपणा जाणवतो ती म्हणजे उदासीनता)सुख,दुःखाकडे समदृष्टी म्हणजे उदासीनता..!ही वृत्ती ,सहजतेने माझ्याठायी येत चाललीय..!

रामराया...या उदासीनतेमुळे माझ्यात सुलभतेने सेवाभाव निर्माण होऊ लागला आहे..!देवांची,देवालयांची, संतांची,समाजाची अहर्निश सेवा करावी असा एकमेव ध्यास प्रकर्षाने मनात उमलू पहातोय.

रामराया...एकमेव ओढ,एकमेव गरज,एकमेव ध्यास आता तुझ्या गुणवर्णनाचा आहे.तुझ्या संकीर्तनाची एकप्रकारची सवय मला लागली आहे..आणि अशीच ती असली पाहिजे...!

रामराया...माझ्या बाकीच्या सगळ्या भौतिक मागण्या बाजुला ठेवून तुझ्या संकीर्तनाची मागणी मी तुझ्याकडेच करतोय..!

समर्थ ज्याची आशा आहे त्यालाच सारथी करतात..!रामापर्यंत पोहचण्यासाठी रामाकडेच मागण..!

इतकी सहज आहे ही भक्ती, सगळं समोर आहे..मिळवायचं ते ही समोर आणि मिळणार आहे ते समोर आहे..!
फक्त आपल्याला ती वाट ओळखून चालायचीय..!
चला तर मग..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे सहावे...

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे सहावे...

समर्थ म्हणतात..

दिनाचे उणे दिसता लाज कोणा..
जनी दास दीसे तुझा दैन्यवाणा..
सिरी स्वामी तू रामपूर्णप्रतापी..
तुझा दास पाहे सदा सीघ्रकोपी...!

रामराया..

माझी ही सगळी तुझ्या कृपेशिवाय झालेली  विकल,अस्वस्थता  समाजाला समजली तर तुझा सर्वसुखी दास अस बिरुद मी जे मिरवतो त्याची खंत तुला वाटणार नाही का..?

रामराया..असा तुझ्या सस्वरूपी दर्शनाशिवाय कायम अस्वस्थ असणारा मी,केवळ तृषार्त असा मी, समाजात अतिशय दैन्य,भणंग अवस्थेत फिरत असतो..आणि तो ही तुझा भक्त असून..हे तुला कमीपणा आणणार आहे ना रामराया...?

रामराया...तुझी कीर्ती,तुझं वलय,तुझी ओळख ही अखिल ब्रह्मांडात केवळ आणि केवळ सुखदायक,दुखनिवारक,पूर्णपराक्रमी अशी आहे..!

रामराया...या सगळ्या समाजातील माझ्या अवस्थेमुळे मी अस्वस्थ होऊन, माझी सहनशक्ती कमी होऊन उगीच छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करू लागलोय..!

समर्थ आता रामकृपेसाठी अतिशय काकुळतीला आलेल्या मानवी अवस्थेतली ही अवस्था वर्णन करताना रामाला त्याच्या कृपाकीर्तीची ही लाडिक आण घालू लागले आहेत.मातृत्वातल्या वात्सल्यापूर्ण गोंडस  गळेपडू प्रेम ही आता लटक्या विषादात व्यक्त करू लागले आहेत..!

वात्सल्यात्मक प्रेम हेच भक्तीच निरागस रूप..हो ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे पाचवे.

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे पाचवे.

समर्थ म्हणतात...

मज कोंवसा राम कैवल्यदाता..
तयाचेनि हे फिटली सर्व चिंता..
समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे...
सदा सर्वदा नाम वाचे वदावे...!

रामराया..माझ्या सर्वदूर विचारात,कल्पनेत मी माझ्या सुखाचा विचार करतो तेंव्हा मला फक्त तुझा आधार वाटतो..!तुझी  कैवल्यकृपा हीच माझ्या आयुष्याची एकमेव तारणहार आहे..!

रामराया...माझ्या समोर असलेली अनेक पारमार्थिक,सामाजिक कोडी केवळ तुझं अस्तित्व असेल तर निमिषात दूर होऊ शकतात.तू आयुष्यात असलास की कोणतीच चिंता रहात नाही हा माझा अनुभव आहे..!

रामराया..तू खरा तर खूप दयावान आहेस..!आर्त भक्तीला लगेच प्रतिसाद देतोस.प्रसन्न होतोस.कृपा करतोस..!पण एवढं असून ही मी तुझ्या या भक्त परीक्षेत का उत्तीर्ण होत नाही हे लक्षात येत नाहीये..!

रामराया...मला आता तुझ्या कृपेच एक इप्सित जाणत्या लोकांकडे बघून सापडलंय.आणि ते म्हणजे तुझं नाम..!या रामनामाच्या आधारेच तुझी कृपा मिळवू शकतो हे मला समजलय..!

समर्थानी आपल्याला त्यांच्या साधनेच्या अनुभवानुसार रामाची कृपा  मिळण्यासाठी फक्त रामनाम ह्या उपासनेची कास धरा इतकं प्रखरपणे सांगितलंय..!!
आपण तेवढंच ऐकूया ना? कारण ते समर्थ आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२