समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

🌺
*दीनानाथ विख्यात हे नाम साजे..|*
*प्रजापाळकू रामराजा विराजे..|*
*बहु सुकृतीचा बरा काळ आला.|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला.||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या रामराजाचे हृदय हे कोमल आणि दयावंत आहे.तो गरीब भक्तांसाठी  त्राता आणि कृपावंत आहे.याची कीर्तीच मुलतः दीनानाथ या नावाने सर्वदूर पसरली आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा रामप्रभू सर्व सृष्टीचा आत्मा ही आहे आणि तो या समग्र सृष्टीचा पालक ही आहे.समस्त सजीवासाठी हा रामराया सर्वहीतदक्ष आणि पालक असा आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामरायांचे असे सुलक्षण दर्शन होणे हा योगायोग निश्चित नाही.किंव्हा ठरवून झाले आहे अस ही नाही.हे सगळं माझं शुचित पूर्वकर्माच फळ म्हणून मला मिळालं आहे.आणि त्यामुळेच मला हे सुखाचे दिवस दिसत आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

असा सुरंजनी रामप्रभू मला माझ्या नजरेने अनुभवता येतोय.मला माझ्या ज्ञानेइंद्रियात साठवता येतोय ह्याने मन अतिशय आनंदित होतय.

समर्थ या पंचवटीच्या काळाराम मंदिरात येऊन दर्शनाने भारावून गेलेले आहेत.आणि तो त्यांचा आनंद त्यांनी या ओवीतून व्यक्त केलेला आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लीळाविग्रही देव ब्रह्मदिकांचा.|*
*सदा बोलणे चालणे सत्य वाचा..|*
*जया चिंतिता चंद्रमौळी निवाला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला..||*

समर्थ रामदास म्हणतात..

रामप्रभु ही देवता स्वतःच्या सत्वगुणी लीळेमुळे पूर्ण देवाधिकांचे आराध्य बनली आहे.रामरायांचे सत्वच इतके तेजल आहे की त्याची उपासना ब्रह्मदिक देवतांनी केली आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचे बोल मधुर तर  आहेच पण याशिवाय त्याचे  अस्तित्व सत्वगुणी असल्यामुळे,आणि त्याचे वचन ही अतिशय बहुश्रुत आणि समाजकल्याणीच असते.

समर्थ रामदास म्हणतात..

शिवशंकराने प्राशलेले हलाहल ज्याच्या केवळ नामोच्चरणाने शीतल झाले असा हा रामचंद्र शीतलतेचे प्रतीक आणि उगम ही आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा रामराय दर्शनाचे कृतार्थ असे फळ देतो ज्याने रामदास,भक्त संतुष्ट होतात..!आणि ते जन्माचे सार्थक करतात.

समर्थ रामदर्शनाचे फळ समजावून सांगतात.आणि त्या रामदर्शनाने त्यांना मिळालेल्या सकृत आणि अंतिम समाधानाचे ही वर्णन करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्रोत्र-७

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-७*

🌹🌺
*नटवर नटनाट्ये नाट्यनटवांगसंगी..|*
*गजवदन सुरंगी रंगसाहित्यरंगी.|*
*अभिनव नटलीळा रंगणी रंग माजे..|*
*चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा गणेश रंग भरू लागला की श्रीकृष्णासारखा सर्वव्यापी नटवर होतो.ह्याच्या प्रत्येक लीळातून एक कथा,एक सुरस नाट्य निर्माण होते.किंबहुना त्याच्या लयबद्ध पद्न्यासाने त्याचे दर्शन हे एका अविरत मयसभेसारखेच भासत.

समर्थ रामदास म्हणतात..

हा गणराज गजवदनी आहे.त्यामुळे त्याच विघ्ननाशक दर्शन हे एका गूढ अशा भाववृत्तीच तसेच अतिशय वैविध्यपूर्ण अशा गुणप्रभावाच द्योतक आहे अस जाणवत.

समर्थ रामदास म्हणतात..

या गणेशाच्या अनंत आणि नवनवीन लिलांनी एक अपूर्व,अकल्पित आणि अविरत अशी सुख, समाधानी अशा प्रसंगाची शृंखला आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर घडते किंव्हा तो ती घडवतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या गजाननाच्या लयबद्ध हालचाली इतक्या सुयोग्य आणि नेमक्या असतात की त्या सर्व नटराज स्वरूपातील सुखतांडवाने सुखाच्या कल्लोळाने विश्व आणि त्यामुळे आपले मन हे उल्हसित होऊन जाते.

समर्थ या ओवीमध्ये गणपतीच्या नटराज रुपात वर्णन करतात. त्याच हे सुख नर्तन भक्तांच्या आयुष्यात सुखाचा पदन्यास करत याच प्रकटीकरण समर्थ या ओवीत करून देतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्त्रोत्र-६

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-६*

🌹🌺
*गजवदन विराजे रंगसाहित्य माजे..|*
*रतिपतीगती लाजे लुब्ध कैळासराजे..|*
*फरश कमळ साजे तोडरी ब्रीद गाजे..|*
*सिद्धी बुद्धि अबळा जेपावती विश्वबीजे..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

गणराज हा प्रसन्नमुखी,गजवदनी इतका विशाल आणि प्रफुल्ल दिसतो की त्याच्या अस्तित्वाने सभोवतीच्या वातावरणात एकप्रकारचा सुखाचा उन्माद असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा उन्माद इतका लुब्ध आणि आनंददायक असतो की रति-कामदेवाचा शृंगारगंध ही इथे कमी वाटतो.आणि त्या आनंदसंगात कैलासाधीपती गुंग होऊन जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

या गजवदनी चेहऱ्याभोवती हाती धरलेले परशु,कमळ त्या मुखकमलाची शोभा वाढवतातच पण त्याबरोबर हातातले तोडर हे त्या दर्शनाचा आनंद द्विगुणित करतात.

समर्थ रामदास म्हणतात..

हा गजानन सिद्धी आणि बुद्धीच्या संगतीने एक पूर्ण असे विश्वोद्धार करणारा असा स्फुल्लिंग असा जाणवतो.ज्यापासून सकळ विश्वउत्पत्ती होते आणि जिथे विश्व लय ही पावते.

समर्थ गणपतीचे संकुटुंब वैश्विक रूप इथे प्रकट करतात.आणि त्याच दर्शन हे किती सुमोहक आहे याचं वर्णन ही या ओवीत करतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्रोत्र-५

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-५*

🌹🌺
*ध्यानी धरील नरकुंजर बुद्धिदाता..|*
*त्याची फिटे आवलीळा सकल चिंता..|*
*आधी गणेश सकळा पुजणेचि लागे..|*
*दासा मनी तजविजा आवजा न लागे..||*

समर्थ रामदास म्हणतात..

या गजाननाचे पद्मासन स्थितीतील ध्यान(नरकुंजरी अवस्था) खूपच मनभावन आहे..!तसच ध्यान जो धरेल त्याची साधना ही यथावकाश फलद्रुप होते.

समर्थ रामदास म्हणतात..

असे नरकुंजरी ध्यान मनात  धरल्याने आयुष्यात उठलेले समस्त विकल्प,सगळ्या चिंता,सगळी संकटे निवारण होऊन तो भक्त सुखी होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या गजाननाचे पूजन,ध्यान सर्व भक्त,तापसी,साधू,संत यांनी करणे हे इष्ठच असते.हे सर्वप्रथम करण्याने त्यांचं इच्छित कार्य अतिशय  सुलभतेने पूर्ण होते.

समर्थ रामदास म्हणतात..

हे गजाननाचे नरकुंजरी  चिंतन प्रत्येक भक्ताला चिंता आणि भय यापासून मुक्त करते.आणि ह्या साऱ्या भावनांपासून त्याचे अस्तित्व कायमच अबाधित रहाते..!

समर्थ रामदास गणपतीचे नरकुंजरी रूप इथे प्रकट करतात.हे गणेशाचे ध्यान दुर्लभ पण मुक्तीदाते  आहे.आणि त्याच्या उपासनेच फलित इथं सांगतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्त्रोत्र -४

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-४*

🌹🌺
*वीतंडसा बलदंड गिरीतुल्य धावे..!*
*भक्तांसि रक्षित रिपूवरी तो उठावे..|*
*अंदुस तोडरगुणे करितो चपेटा..|*
*गर्जीन्नल्या घणघणाट प्रचंड घंटा..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

अत्यंत विशाल रूप घेऊन  हा गजानन पूर्ण ताकदीने पर्वतप्राय असा विश्वरूप अवतार घेऊन प्रकट होतो,धावून येतो..!

समर्थ रामदास म्हणतात..

असा गजानन विराट रुपात भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी सचेत असतो.त्याच हे भीमरूप हे विघ्नावर  कर्दनकाळ बनून एक प्रहार होऊन त्यातून भक्त आणि सज्जनांच रक्षण करणार ठरत..!

समर्थ रामदास म्हणतात..

गजाननाचा हा आघात अतिशय न्यायप्रिय असतो.तो भक्ताला कळू न देता त्याच संरक्षण करतो.आणि त्याच्या विषम परिस्थितीवर नियंत्रण आणून भक्ताला सुखी करतो.

समर्थ रामदास म्हणतात...

या गजाननाच येणं हे इतकं प्रचंड अशा ध्वनांकीत अस्तित्वात येत की सहस्त्रावधी घंटानाद चालू आहे अस जाणवत.ह्या उदंड ध्वनीनेच विघ्न पळून जातात.

समर्थ गणपतीचे विराट,भव्य अस विश्वरूप इथं वर्णन करून सांगतात.भक्तांच्या विघ्नहरणासाठी त्याची भक्तवत्सल तत्परता किती भेदक आहे हे त्यांनी या ओवीत समजावून सांगितलं आहे.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्त्रोत्र-३

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-३*

🌹🌺
*फर्सा पुसुनि सरसावतसे अघाला..|*
*भक्तांसि विघ्न रचितां रिचवीत घाला..|*
*साठीसहस्त्र गण त्यांसरीसा निघाला..|*
*मूषकवाहन करी दुरितासि हाला..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

परशु हाती बाळगलेला गणराज जेंव्हा तो परजून एखाद्या विघ्नावर चाल करून जातो तो जाणारा गणराज रणवीर स्वरूपातला रुद्र भासतो.

समर्थ रामदास म्हणतात..

भक्तांच्या पुढ्यात जेंव्हा एखादे विघ्न निर्माण होत..रचल जात..!तेंव्हा त्या विघ्नाचा त्याचक्षणी नायनाट करण्याचं कसब या गणराजाकडे आहे.त्याचा आवेग हा त्या विघ्नाकर्त्याला कधीच सहन होत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

साठ हजार या गणराजाचे गण आहेत.हे गण म्हणजे त्याच सामर्थ्य आहेत..!या सगळ्या सामर्थ्यवान चालीसह हा गणराज अतिशय वैभवशाली स्वरूपात विघ्नकर्त्यावर चाल करून जातो.

समर्थ रामदास म्हणतात...

हा मूषकवाहन असलेला गणराज जेंव्हा एखाद्या विघ्नावर,दुराचाऱ्या वर चाल करून जातो तेंव्हा त्या विघ्नाला,दुरीताला त्राही माम करायची वेळ येते.

समर्थ या गणराजाचे सामर्थ्य या ओवीत समजावून सांगतात.त्याच रणसामर्थ्य,त्याच अस्त्र सामर्थ्य,त्याच वहन करण्याऱ्या मूषकाची वेगशक्ती..!या साऱ्याच मूर्त वर्णन समर्थ या ओवीमध्ये करतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२