समर्थांच करुणाष्टक (२), कडवे सहावे..

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे सहावे..

समर्थ म्हणतात...

कितेकी देह त्यागिले तूजलागी..
पुढे जाहले संगतिचे विभागी..
देहेदुःख होताच वेगे पळालो..
तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो...!

रामराया...
तुझ्या साठी तपसाधना करता करता कित्येकांनी स्वतःचे देह झिजवलेत..घोर तपस्या करता करता अनेकांनी मृत्यपर्यंत तुझी अपरंपार प्रार्थना केली आहे..अनेक कठीण अनुष्ठाने,उपवास करून स्वतःच्या देहभावना विसरण्याची पराकाष्ठा करत  ते तुझ्या धामी पोहचले आहेत..!

रामराया, हे सगळं करूनच  अनेक जण तुझ्या सस्वरूपाचे सांगाती झालेले आहे..रामरंगी रंगून जीवन सार्थकी लावून गेले आहेत..!

रामराया,या सगळ्याचा मी ही प्रयत्न करतोय..पण मनाचे विकार,देहबुद्धी लगेच डोकं वर काढतीये..!भूक,तहान, वेदना,सहनशक्ती ह्या साऱ्या गोष्टी मला माझी साधना गिळंकृत करायला येतात..!
माझी साधना ही दुय्यम ठरुन माझी देहबुद्धीच माझं शरीर अनुसरू लागत..!आणि मग ती देहबुद्धी मला तुझ्या साधनेपासून,भक्तीपासून दूर घेऊन जाऊ लागते..!

रामराया...याच देहबुद्धीचं ओझं माझ्या आयुष्यावर,जिवीत्वावर पडू लागलय...तुझी भक्ती,तुझी ओढ ही मागे पडत चाललीये..आणी या देहबुद्धी सहित माझं अस्तित्व उगीच जन्माला आल,अकारण जन्माला आल अस वाटू लागलं आहे..!

रामराया..या देहबुद्धीचं विस्मरण होऊन तुझ्या चिरंतन अस्तित्वाच चिरकालीन सुख माझ्या ठायी येऊ दे..!

श्रीराम..!!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच करुणाष्टक (२) कडवे पाचवे...

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे पाचवे...

समर्थ म्हणतात..

बहुसाल देवाळये हाटकाची..
रसाळा कळा लाघवें नाटकाची..
पूजा देखतां जाड जीवी गळालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया..तुझं मंदिर म्हणजे एक मुक्तीस्थळ असत.कितीही वेळा तिथे आलं तरी मन भरत नाही..तुझी षोडशोपचार पूजा ,तुझी अंगपूजा रोज  अव्याहत पहातोय..!ही पूजा एक चित्रकथी,एक सुंदर नाटक पहातोय इतका मी त्यात नेहमी गुंग होऊन जातो..!

रघुवीरा..तुझा तो रसाळ दृष्टीक्षेप,सुमधुर हास्य,लक्ष्मण सीतामाई  बरोबरची आश्वासक आमच्या आयुष्यातली साथ..हे सारं केवळ मुग्ध करणार आहे..!

रामा.. पण हे सगळं बघताना मला माझ्या असमर्थतेची ही आठवण होते..!प्रत्यक्ष तर नाहीच..मानसपूजेत ही तुझ्यासाठीचे हे सोळा संस्कार,उपचार मी एकाग्रतेने करू शकत नाही..!तेवढी तुझ्याशी माझ्या मनाची तन्मयता अजून ही जुळत नाहीये..!

रामा..किती रे प्रयत्न करू अजून मी..?मला अजूनही तुझ्या उपासनेत सर्वस्व ओतता येत नाहीये..आणि त्यामुळे माझ्या भक्तीहीन देहाचा भार अकारण भूमीवर पडून माझं आयुष्य व्यर्थ चाललय..!जन्म व्यर्थ होत चाललाय..!

वयाच्या बाराव्या वर्षी रामकृपा होऊन ही समर्थ इतक्या लिनतेने रामरायाला विनवत आहेत..!

ही आर्त विनयशीलता आपण ही अंगात बाणवूया  हो ना??

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच करुणाष्टक .२ कडवे चौथे...

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे चौथे...

समर्थ म्हणतात..

तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले..
असंभाव्य ते कीर्ती बोलोनि गेले..
बहु धारणा थोर थकीत झालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया...तुझ्या साठी आयुष्य टाकणारे,जीव प्राण  याची पर्वा न करणारे,तुझ्या केवळ एका कृपाकटाक्षासाठी पूर्ण तहानभूक विसरणारे,देहात असून ही विदेही व्रत घेतलेले असे सगळे तुझे भक्त असंख्यात होऊन  गेलेत..काही अजूनही माझ्या भोवती आहेतच..!

रामा..या सगळ्या भक्तांनी तुझ्याप्रति असलेल्या भक्तीचे अतिशय उंच आयाम त्यांनी निर्माण करत एकाहून एक कीर्तीयुक्त आदर्श निर्माण केले आहेत..!
हे आदर्श माझ्या सारख्या हीन भक्ताला केवळ अशक्यप्राय वाटतात..पण तरीही त्यांचं भक्तीयुक्त आचरण मला नेहमीच प्रेरणादायी ठरत..!

रामा ..त्या सगळ्या भक्तश्रेष्ठींची धारणा बघून माझं मन पुन्हा पुन्हा विस्मित होते आहे.मला माहिती आहे की रामराया..ही धारणा म्हणजे आतुरता,श्रद्धा आणि इच्छा यांचं सुंदर मिलाफ रूप आहे..!पण त्या धारणेचे सुंदर प्रकट असे हे भक्तराज पाहून मला त्यांच्या उंचीबद्दल खरोखर कौतुकमिश्रित आश्चर्य वाटतेय..!

रामराया...पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सगळं पाहून,अनुभवून माझ्या स्वतःच्या मानसिक आणि पारमार्थिक खुजेपणाची जाणीव होऊन मी भूमीला भार आहे अस वाटू लागले आहे..!

समर्थ त्यांच्या साधनकाळातली ही अनन्य शरणभक्ती विनयशील पद्धतीने आपल्यासाठी खुली करतायत..!

आपण आपल्या जन्माची व्यर्थता टाळायची असेल तर करुणाष्टकांची यथार्थता समजून घेतली पाहिजे ..हो ना?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२