Karunaashtake 11

 कडवे अकरावे..

समर्थ म्हणतात...

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे..
रघुपतीवीण आता चित्त कोठे न राहे..
जिवलग जीव घेती प्रेत सांडून जाती...
विषय सकळ नेती मागुता जन्म देती..!

एक विदारक सत्य..!
सगळ्या पाशात गुंतलेल्या एका जिवाच यथार्थ आणि अंतिम वर्णन..!

मी कमावलेल्या धनाचा,माणसांचा मला उपयोग आहे हा गैरसमज घेऊन मी माझं जीवन जगतोय..!माझ्या भोवतीच मला मिळणार ऐश्वर्य हेच माझं आयुष्यच इप्सित आहे अस मी समजतोय..!

पण रामराया या सगळ्यात, आहे त्यात सुख मानायचं असा कानमंत्र तूच आम्हाला संताकरवी दिलास ना..?

मग आता हे सुद्धा आम्हाला समजावत नाहीस की हे सुख तुमचं अंतिम ध्येय नाही..ही आसक्ती तुमचं कल्याण करणार नाही..!
हे चित्त,मन जे काही तुम्हाला दिलं ते तुला (रामाला) स्मरण करून मग हे सुख भोगण्यासाठी दिलेलं आहे..!

या शरीरातील जीव नावाच एक चैतन्य एकदा संपलं की हातावरचा ऐवज काढून घेऊन जवळच्या व्यक्ती त्याच प्रेत करून ते सोडून देणार आहेत..!
या शरीराने आत्तापर्यंत संभाळलेली नाती,ममत्व,कष्ट सगळं सोडून केवळ एक निष्प्राण देह म्हणून त्याचा त्याग करणार आहेत..!

आणि एवढं सगळं घेऊन सुद्धा त्या देहाला चिकटलेला दंभ,दर्प,आसक्ती जर तशाच राहिल्या तर जन्ममरणाचा फेरा पुन्हा आहेच..!पुन्हा तेच चक्र..!

रामा थांबव हे..!तू आसक्तीच ठेऊ नकोस या देहात..!या जन्मीच मला निरिच्छ करून टाक..!
पुन्हा तोच जन्म,तेच  जिवलग,तीच आसक्ती,तेच मरण..काही नको ..!

आता फक्त रामस्वरूप कायमच..!🙏

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtak 10

कडवे दहावे...

समर्थ म्हणतात...

तुजविण मज तैसे जाहले देवराया...
विलग विषमकाळी तुटली सर्व माया..
सकळजन सखा तू स्वामी आणिक नाही..
वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही...!

जन्म घेतल्यानंतर मनुष्याच्या एका अवस्थेच वर्णन समर्थानी यात केलंय..!

गर्भात असताना सोहमचा जप करणारा जीव जन्मानंतर लगेच कोहम जपू लागतो..!जी जिवंत नाळ परमात्म्याशी जोडलेली असते ती शाररिक आणि मानसिक रित्या छेदली जाते..!
त्या परमात्म्याशी अंतर वाढत जाते..आणि भौतिक जगामधील अंतर कमी होऊ लागते..!परमात्म्याला उद्देशून केलेली कृती तुजसाठी ऐवजी तुजविण होऊ लागते..!
आणि एक क्षण असा येतो की त्याक्षणी तो ईश्वर किती आपल्यापासून दूर गेलाय याची जाणीव होते..!
या क्षणाच वर्णन समर्थ या कडव्यात करतात..!

ते म्हणतात तुझ्यापासून दूर असताना आणि मी काही त्रासात,दुःखात थोडक्यात  आयुष्यातल्या काही विषम अवस्थेत मायेची सगळी माणस, आधार वाटणारे हात सगळे साथ सोडतात..!
माया ही उंबऱ्यापर्यंतच थांबते..!

पण अशा क्षणी सगळ्या विश्वाचा तारक, मित्र,सखा म्हणून भक्तांनी बिरुद लावलेला तू माझ्या या सगळ्या अस्वस्थतेत एकमेव त्राता म्हणून उदयाला येऊ पहातोस..!

पण अशा वेळी पुन्हा विषयसुखाचे पाश,आशा,ममता,व्यवधाने सगळं मला मागे ओढू पाहतात..!

पण मी मात्र आता तुझ्या निस्सीम ,अलख स्वरूपाकडे आकृष्ट होत चालल्यामुळे ते सगळे पाश शिसारी येऊन माझ्या मनातून,शरीरातून बाहेर फेकत चाललोय...त्यांचा त्याग करत चाललोय..!

समर्थ त्यांनी रामकृपा मिळवण्यासाठी त्यांनी आचरलेली तत्वे,त्यांनी स्वतःवर घालून घेतलेले नियम स्वतः आपल्या आचरणासाठी खुले करतायत..!

आपण फक्त त्यांचा कित्ता गिरवायचाय..
मग त्यांना मिळालेली  रामस्वरूपाची पासूनभिक्षा आपल्याला ही प्राप्त होईल  ना?
नक्कीच होईल..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Ramnavmi

रामआगमन

आजच्या दिवशी पुन्हा राम जन्म घेणार..!त्याच क्षणी कित्येक वर्षांनंतर समर्थजन्म..!

प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर अशी की गुरूशिष्याची जोडी..!एकाच दिवशी,घटिकेवर या विभूतींनी जन्म घ्यावा इतकं सुनियोजित सुकर्म नियती कशी करू शकते?

एक पुरुषोत्तम राम आणि दुसरा जनकल्याणी धाम..!

एक कारुण्य,बुद्धी आणी पराक्रमाचा आदर्श..तर एक कर्तृत्व, सिद्धी आणि  निग्रही वृत्तीचा निष्कर्ष..!

समर्थानी रामाला आदर्श धरलं कारण शुचित देवत्व हे नेहमीच सुशांत असत..!
पूर्ण रामाच्या चरित्रात एखादा युद्ध प्रसंग सोडता राम चिडलेला कधीच सापडत नाही..!

राम हा उत्तम राजकारणी म्हणून ओळखला जात नसला तरीसुद्धा उत्तम राजा म्हणून ओळखला जातो..!हेच खरं रामाचं गूढ आहे..!

सीतेचे कोणतेही विशेष मनोरथ पूर्ण करण्याचे प्रसंग नसून सुद्धा राम एकपत्नी आणि प्रेमाचा आदर्श समजला जातो..!

कोणताही वेगळा प्रयत्न नाही..!केवळ चांगलं,विनम्र,शुद्ध वागून सुद्धा राम मनुष्याच आयुष्य देवगुणी जगले हे महत्वाच आहे..!

आणि समर्थ...

ते तर निग्रही तपस्वी,आग्रही शुद्ध मनस्वी आणि बलदंड  भक्तीपूर्ण ओजस्वी होते..आहेत..!

संसार न करता उत्तम संसारी.. युद्ध न करता उत्तम योद्धा..बिरुद न लावता उत्तम कवी..प्रत्यक्ष राजकारण न करता उत्तम राजकारणी..कोणताही व्यवसाय न करता उत्तम व्यवहारी...कोणतीही अतिरेकी भक्ती न करता यशस्वी पारमार्थिक..!

हे सगळं तेजस्वी रामपण आणि समर्थपण एकाचदिवशी पृथ्वीतला वर याव हे पूर्ण चराचारा साठी भाग्याच लक्षण..!

आता प्रार्थना एकच..

ह्या गुरुशिष्याच्या आदर्श जोडीने हा हिंदुस्थान,हे विश्व रामराज्य करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा..!

इतकीच सहेतुक प्रार्थना..🙏🙏🙏

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtak - 9

समर्थांचे करुणाष्टक..

पायरी नववी...

कडवे नववे...

समर्थ म्हणतात....

जननी जनक माया लेकरू काय जाणे..
पय न लगत मुखी हाणता वत्स नेणे..
जळधरकण आशा लागली चातकासी..
हिमकर अवलोकी पक्षीया भूमीवासी...!

हे समर्थांच हुकुमी भाषासामर्थ्य..!उत्तम निरीक्षणशक्ती..आणि निश्चित अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणारी शब्दरचना..!

करुणाही बहुआयामी आहे त्यांची..!कोणतं उदाहरण कोणत्या प्रसंगासाठी द्यायचं हे त्यांच्या लेखनात प्रकर्षाने कळत..!
दृष्टांत दिला की विषय पटतात..!समर्थ भक्तीने ओतप्रोत होऊन स्वतःची भक्ती,तळमळ प्रत्यक्ष रामालाही समजवून सांगतायत..!

आईवडिलांच प्रेम हे अपत्यावर असणं सहाजिक आहे..!ते आहे हे दाखवण्यासाठी आईवडिलांना विशेष काही प्रयत्न करून दाखवावे लागत नाहीत..!वात्सल्य ही दाखवायची,प्रदर्शनाची गोष्ट नाही..!पण लेकरू मात्र आई,बाबा करत त्यांना जाणीव करून देत असत..!कारण लेकरू आजण असल्याने त्या वात्सल्यापासून अनभिज्ञ असत..!
समर्थ म्हणतात ..रामा तुझं माझ्याकडे लक्ष असणारच..कारण तूच माझा पालनकर्ता आहेस पण मी आपला अजाणपणे या करुणेद्वारे तुला सारखी हाक मारतोय..!
तुला माझी आठवण आहे की नाही याची सारखी खात्री करून घेतोय..!

वासरू गायीच्या अचळापाशी जात पण त्याच्या मुखात लगेच दूध येत नाही..!त्यासाठी गाय हलकेच पायाला थोडा हिसका देते.. गायीची कृती ही वासराला त्रास होण्यासाठी नसून त्याला दूध मिळण्यासाठी पान्हा फुटावा यासाठी असते..!
तसच तू माझ्या आयुष्यात मला दिलेले काही क्षण असतील की त्यात मला त्रास झाला असेल तर तो त्रास या प्रकारचाच आहे..!तू मला वाट पहायला लावणं हे तुझ्या लवकर दर्शनाच द्योतकच आहे..!पण मला मुढाला हे कळतय पण वळत नाही...!!

मी आपला आकाशातून पाण्याच्या कणांची केंव्हा बरसात होतीये याची वाट पहात बसलेल्या पक्षासारखा अधाशी तुझ्या स्वरूप दर्शनाची वाट पहात बसलोय..!
आणि तसच चातकाप्रमाणे ते तुझ्या कृपास्पर्शाचे चांदणकण मला कधी मिळतायत या आशेत जन्मोजन्मी वाट पहात बसलोय..!

सुंदर प्रतिभा..!समर्थ सउदाहरण रामाला,आणि त्याबरोबरच ही तळमळ कशी असावी ह्यासाठी हे सगळे दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगतायत..!

आपण सुद्धा आपली रामरायाला भेटण्याची ही  तळमळ अशाच प्रमाणे रामाला कळवायला नको का???

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtak - 8

समर्थांचे करुणाष्टक...

पायरी आठवी..

कडवे आठवे...

समर्थ म्हणतात...

सबळ जनक माझा राम राम लावण्यकोटी..
म्हणवून मज पोटी लागली आस मोठी..
दिवसगणित बोटी ठेवून  प्राण कंठी..
अवचट मज भेटी होत घालीन मीठी..!


समर्थांना जशी रामाची कारुण्यरूपाची प्रचिती आहे तशीच त्याच्या बळवंत अशा रूपाची ही माहिती त्यांना आहे..!

विराटसमाज पुरुषाच अस्तित्व असलेला,या समृद्ध भक्तांचा जनक असलेल्या या श्रीरामाच्या अनेक लाघवी प्रतिमांचा उल्लेख समर्थ आपल्या या आर्जवी प्रार्थनेत करतात..!

रेखीव पुरुषी लावण्याची व्याख्या ही समर्थ अजब पद्धतीने करतात..!

पुरुषी लावण्य तत्वनिष्ठ,सुचरित,सुसौष्ठवी असत..!काळजीवजा कर्तृत्व,कर्तव्यनिष्ठ प्रेम,वस्तुस्थितीमय वात्सल्य ही सगळी रूप पुरुषी लावण्याचीच आहेत.

दिवस दिवस वाचिक,मानसिक,शारीरिक तप करून घेणारा राम हा प्राणांतिक वाट पहायला लावतो खरा..पण जेव्हा तो रामस्वरूप करून घेतो तेंव्हा या सगळ्या भौतिक  जाणिव,अपेक्षांच्या पलीकडे त्याने खुबीने आपल्याला पोहचवलेलं असत..!
हीच खरी रामाची खुबी..!

आयुष्याच्या या पारमार्थिक वाटचालीत हे रामराय आपल्याला अशा मुग्ध वाटेवर घेऊन जातात..की जिथे एका वळणावर ते आपल्यासाठी हात पसरून उभे असतात..!
आणि अशावेळी आपल्याला समजते की ज्याच्या समचरणाच्या मिठीला आपण बिलगु पहातोय तो राम आपल्याला आपल्यातच राहून बोलावतोय..कृपा करतोय..!

ही अवचट,अचानक भेट आपल्याला जीवनाची सार्थक करून देते..!

ही सार्थकता समर्थ पुन्हा पुन्हा रामाकडे मागतयात..!

आपणपण ती मागायलाच पाहिजे हो ना..?

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtak - 7

समर्थांच करुणाष्टक..
सातवी पायरी..
सातव कडवं...!

समर्थ म्हणतात...

 तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी...
शिणत शिणत पोटी लागली आस तुझी...
झडकरी झड घाली धाव पंचानना रे..
तुजवीण मज नेते जंबुकीं वासना रे...

रामा,माझे बाह्य त्रास,माझी बाह्य सुख दुःख मला सांगता येतील रे...!
आणि माझ्या भोवतीचे माझे या जन्मीचे सगे सोयरे ते ऐकतील ही..!
पण त्याचा कायमचा इलाज ते करू शकणार नाहीत याची मला जाणीव आहे..!आणि तुझी मला आस असल्याने मला तशी अपेक्षाही नाही..!

पण खरं सांगू ?

बाह्य जगात कुणाला सांगू न  शकणारी,माझ्या मनात जन्मोजन्म साठत जाणारी अंतःव्यथा ही तुझ्या दिव्यदृष्टीलाच कळेल..!

रामा...ह्या तुझ्यापर्यंत न पोहचायच्या हतबल विचाराने मी पुरता गलितगात्र झालेलो आहेच पण तरीही तुझ्या कृपेची मला लागलेली आस शरीर थकत चालल तरी वाढत चाललेली आहे..!

रामा ..मला माहितीये पंचेंद्रियांना नियंत्रित करणार   आणि त्यातील विकारांच संहार करणार पंचानन हे रूप तुझंच आहे..!तूच ते करू शकतोस..!तुझ्या येण्याने माझ्या विकार वासनांचा नाश होईल..आणि ती पंचेंद्रिये तुझ्या स्वरूपात येण्यासाठी शुद्ध होतील..!

पण रामा इतकी विनवणी करून सुद्धा तू येत नाहीयेस..माझी भक्तीची कमतरता मला जाणवतीये..!तस जर नसत तर माझ्या विकार,वासनांचा हा उच्छाद जंबुकासारख्या मुख असलेल्या या जन्ममरणाच्या मुखात परत परत ओढला गेला नसता..!

या सगळ्याला रामा तू आणि तूच नियंत्रित करू शकतोस.तूच या सगळ्यातून सोडवून मला  तुझ्या सतस्वरूपात घेऊन जायचा मार्ग सुचवू शकतोस..!

रामराया खरंच अस करशील ना??

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtake - 6

समर्थाच करुणाष्टक...
सहावी पायरी...
सहाव कडवं....!

समर्थ म्हणतात....

जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी..
मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी..
तळमळ नीववी रे राम कारुण्यसिंधू..
षड्रिपुकुळ माझे तोड याचा समंधु..!

समर्थ कालातीत विचार करणारे संत..!
आपल्या तत्वज्ञानात सांगितलंय जन्म एक दुःखाच मूळ..!दुःखाच कारण..!

अनेक जन्माच दुःख साचलेलं असल्यामुळे या मनुष्यजन्माला आलो..!कोट्यावधी जन्म झाले..!
कोट्यवधी मरणे झाली..!
वेगवेगळ्या योनीतले तेवढेच सुख दुःखाचे अनुभव झाले..!प्रत्येक जन्मात त्या गजेन्द्रासारखा धावा करतोय की रामा मला या फेऱ्यातून सोडव..!

पण कदाचित माझं पुण्य कमी पडतंय..!
तुझ्या कृपेची,करुणेची दृष्टी माझ्याकडे वळत नाहीये..!
समर्थ म्हणतायत की मला माहितीये की तू एकदा ठरवलंस तर तुझ्या  कृपेचा एक कटाक्ष माझ्यासाठी,माझ्यातल्या आत्मारामासाठी आत्मसुखाचा पूर होऊन येईल..!

कारण तो नीलकंठ ही  तुझ्या नामाने शांत होतो..तर तो करुणेचा सागर होऊन तू माझ्यातला हा सुप्त वडवानल शांत करू शकणार नाहीस का?

माझे अस्तित्व माझ्या भोवतीच्या मायावी षड्रिपु चिखलात रुतले आहे..!तू जर तुझा करुणामयी हात दिलास तर माझे हे आयुष्य,हा जन्ममरणाचा फेरा माझ्यासाठी मोक्षदायी होईल..!
आणि ज्या या षड्रिपु कुळापायी हे जन्म मरणाच चक्र चालू आहे त्याच कारण,संबंधच तुटून जाईल..!

समर्थ रामाला हरप्रकारे विनवतायत..!जितक रामचरणापाशी शरण जाता येईल तितक जातायत..!

त्यांचा निग्रही रामदर्शनाचा हट्ट हा या करूणभावनेत मिसळून एक आदर्श रामदासी वृत्ती तयार होतीये..!

जी आपल्याला ही बाणवता आली पाहिजे..!

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtake 5

समर्थांच करुणाष्टक...
पाचवी पायरी..
पाचव कडवं...!

समर्थ म्हणतात...

चपळपण मनाचे मोडिता मोडवेना..
सकळ स्वजनमाया तोडीता तोडवेना....
घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा..
म्हणवून करुणा हे बोलतो दिन वाचा.......!

मन आणि त्याचा प्रवृत्तीचा निश्चित नेमका आचारबंध समर्थानी या कडव्यात मांडला आहे..!

मनाच्या अनेक गुणांपैकी चपळपण,अस्थैर्य,चंचलता  हा गुण(?) जास्त आपल्याला अनुभवायला येतो..!

राममूर्ती समोर बसल्यावर चित्तासमोर,डोळ्यासमोर रामप्रभा असते,नक्कीच असते..!पण त्यावेळी आपलं हे मन...नजर आणि दर्शन याच्या पोकळीतून दूर कुठे तरी फिरून येत..!

एकदा मन चालल की मागोमाग भक्ती,त्यामागे भावना,त्यामागे नजर अस सगळंच चंचल होत..!

हजारो विचार,हजारो स्वप्न,हजारो अपेक्षा या ध्यानसमयी आपल्या भोवती फेर धरू लागतात..!
स्वतःची,आयुष्याची,आपल्या प्रियजनाची काळजी,ओढ,आठवण ही रामराय आणि आपल्यात दुराव्याची भिंत उभी करते..!

समर्थ हे कितीही विदेही असले तरी मनाची ही अवस्था त्यांनी साधनाकाळात नक्की अनुभवली होती.आणि म्हणूनच ते बारकाव्यासह या करुणाष्टकात त्याची रामरायासमोर प्रांजळ कबुली ही देतात..!

शुकासारखं वैराग्य प्राप्त करताना,उत्तम राजकारण शिकवताना,परमार्थ साधताना अश्या अनेक कसोटीच्या वेळा त्यांनी रामसाधनेत कशा बदलल्या हे समर्थ सांगताना आपल्याला ही गहिवरून येत..!

एकीकडे ही सगळी भावनिक आंदोलन,दुसरीकडे रामरायाची अतीव ओढ..यासगळ्या मध्ये रामचरणी शरण जात समर्थ कमालीचे करुणकोमल होतात..!

आणि हे भक्तीत ओथंबलेले कारुण्य रामचरणी मुक्तपणे रित करून समर्थ श्रीरामाना सांगतात की मी अतिशय दिनपणे या भावनिक,प्रापंचिक आंदोलनापुढे  हतबल होऊन तुझ्याकडे राममयी  होण्याची आशा धरून आहे..!

समर्थाची ध्यानबैठक,निग्रही भक्ती,रामाप्रती कोमल भावना..या सगळ्याचा परिपाक अष्टकाच्या या कडव्यात आपल्याला पाहायला मिळतो..!

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी