.                                                                            ।।श्रीराम ।।                                                                                                                                                                                                                                                                        गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा  ||                                          
                                   नमूं  शारदा मूळ चत्वार वाचा |गमूं  पंथ आनंत या राघवचा ||
                                                                  
     
कोणत्याही कार्याच्या आरंभी , कार्याच्या मध्यभागी आणि कार्याच्या अंती मंगल करावे . असा न्याय शास्त्रात नियम आहे . मंगलाचारणाचे विषय दोन, तर प्रकार तीन आहेत . विषय गुरु किंवा सद्गुरू आणि देवदेवता हे आहेत . तर ब्रह्मनिर्देशात्मक ,नमस्कारात्मक आणि आशीर्वादात्मक असे मंगलाचारणाचे तीन प्रकार आहेत . या नियमांना अनुसरूनच श्री समर्थानी मनाच्या श्लोकांची रचना केली आहे.  मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक ब्रह्मनिर्देश मंगलाचारणाचे उदाहरण आहे.

समर्थांच्या लेखणीची शैली इतर संतांपेक्षा थोडी वेगळी आहे . आता याच श्लोकाचा विचार केला तर या मध्ये प्रथमदर्शनी गणपती, शारदादेवी व श्रीरामचंद्र या तीन देवतांना वंदन केले आहे, असे दिसते. पण आपण आता त्यामागे असलेल्या किंवा समर्थांना अभिप्रेत असलेल्या अर्थाचा विचार करण्याचा प्रयत्न करू.

गणाधीश या शब्दाचे  अनेक अर्थ आहेत.  गणाधीश म्हणजे चौदा विद्या आणि  चौसष्ठ कला यांचा  अधिपती गणपती, गणाधीश म्हणजे सर्व गणांचा स्वामी . गण म्हणजे इंद्रिय , गण म्हणजे पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश हे पाच भूतगण. शब्द , स्पर्श , रूप , रस , गंध हे विषयगण. पंचज्ञानेंद्रिये , पंचकर्मेंद्रिये आणि अंतःकरण , मन , बुद्धी , चित्त , अहंकार हे पाच अन्तःकरणपंचक या सर्व गणांचा स्वामी. गणाधीश म्हणजे शुद्ध ज्ञानस्वरूप असलेले परब्रम्ह तत्व. हा सत्व,रज,तम या त्रिगुणांचा हि मूळ आरंभ आहे. तसेच तो निर्गुण तत्वाचा आरंभ आहे. निर्गुणतत्व म्हणजे अद्वैत सिध्दांन्त, जिथे गुरु - शिष्य,साधक - साध्य, भगवंत - भक्त,(आराध्य दैवत )अशा सकळ द्वैताचा लय  होऊन दोन्हीचे एकाच स्वरूपात तादात्म्य होणे म्हणजे निर्गुण अवस्था होय. अशा या अवस्थेची सुरुवातीपासून अनंतापर्यंत जे एकच एक तत्व तूच आहेस.

तुझ्या अशा निर्गुण निराकार स्वरूपाला समजावून घेण्यासाठी लागणारी ज्ञानबुद्धीरूप,शब्दरूप वाणी, हि तुझीच प्रकृतीरुप शक्ती असलेल्या  शारदामातेला हि मी वंदन करतो. तुझीच शक्ती असलेली शारदामाता हि परा, पश्यन्ति,मध्यमा आणि वैखरी या चत्वार वाचेच्या मूळ स्थानी आहे तुझ्याच आशीर्वादाने मानव हा शब्दश्रीमंत,अर्थसंपन्न होऊन अवर्णनीय, अनाख्य,अनिर्वचनीय अशा परब्रम्ह स्वरूपाला समजावून घेण्यास पात्र होतो. गमणे या शब्दाचा दर्शवणे,समजावून देणे आणि रममाण होणे असा हि आहे.

अनंत रूपे,अनंत वेषे असूनही ज्याचे स्वरूप हे निर्गुण निराकार परब्रह्मतत्त्व आहे. अशा राघवाला, अशा आराध्य दैवताला समजावून घेऊन त्याच्या भक्तीमध्ये रममाण होणाऱ्या आणि अंती परमात्मास्वरूपच होणाऱ्या या पंथामध्ये या वाटेवर चालण्यासाठी इंद्रियांचा राजा असलेल्या मनाला समर्थांनी केलेला उपदेश आहे. पंथ म्हणजे विचारधारा. इथे त्या ईशतत्वापर्यंत पोहोचण्याचे पंथ किंवा वाटा हि अनंत,असंख्य आहेत. आणि ज्या तत्वापर्यंत पोहोचायचे ते ईशतत्वही अनंत म्हणजे अंत रहीत आहे.

थोडक्यात या मंगलाचारणात समर्थांनी,  आराध्य दैवत  प्रभू श्रीरामांच्या आदर्श पन्थाला अनुसरुन, आदी-अंत रहीत असलेल्या, निर्गुण निराकार स्वरूप असलेल्या परब्रम्हाला समजून घेण्यासाठी लागणाऱ्या शुद्धज्ञानस्वरूप,पुरुषरूप असलेल्या गणाधीशाला व प्रकृतीरूप असलेल्या, चारी वाणींची मूळदेवता  शारदामातेला , अनुक्रमे परब्रह्मरूप, पुरुषरूप,प्रकृतिरूप या मूळ तत्वांना वंदन केले आहे.

                                                           || जय जय रघुवीर समर्थ || 

श्री.  शरदबुवा  रामदासी , सज्जनगड 


No comments:

Post a Comment