*गुरूपौर्णिमा..!!*
गुरुतत्वाला समर्पित दिवस.हे तत्व जितक अभंग तितकंच अनन्य.आपण या शब्दाच्या जवळ जाऊन ही त्याचा खरा स्पर्श आपल्याला होत नाही.याला कारण गुरू हा फक्त "लाभ करून देणारा" इतकीच व्याख्या आपली आहे.आपल्याला आयुष्यात काहीतरी मिळवून देणारा,त्यापासून सामाजिक,मानसिक,शाररिक सुख मिळतात..अस काही देणारा म्हणजे तो गुरू.इतकंच आपल्याला माहिती आहे.
गुरू हे तत्व आहे,सत्व आहे.हे तत्व फायद्यासाठी नाही तर अलख होण्यासाठी आहे.
गुरुगीते पासून समर्थांच्या सद्गुरूस्तवना पर्यंत या गुरुपणाचा विचार केला तर सहज समजत की आपल्या या तत्वज्ञानात गुरूपद वेगळंच आहे.की जे व्याख्येत नाही पण निरामय आहे,निश्चल आहे.निरंतर आहे..!
दासबोधात समर्थानी हे गुरुपण, गुरुतत्व जास्त उलगडून सांगितलं आहे.त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे कोणतंही ऐहिक,प्रापंचिक सुखाला उपयोगी पडेल असा कोणताही गुरू हा गुरुपदावर असू शकत नाही.मागणी तसा पुरवठा इतक्या हलक्या पातळीवर हे गुरुपद आपण आणून ठेवलं आहे.गुरुकडे सुख मागायचं,सलामती मागायची एवढाच गुरू आपल्याला एवढीच माहिती.
जगाला वंद्य असणारी गीता कृष्णाने सांगितली,रामाचा ही अवतार आदर्शवत होता..!पण अशा कोणत्याही अवताराला गुरुपद द्यायच्या ऐवजी आपल्या परमार्थ क्षेत्रात ते महर्षी व्यास यांना देण्यात आलं.
व्यासांना माहीत नसलेल अस त्रिभुवनांत काहीही नाही.अस म्हणतात.याचा अर्थ असा की या सगळ्याच खर मूळ,स्त्रोत हे व्यासांनी ओळखलं आहे.हे मूळ स्रोत कुठलही ऐहिक,प्रापंचिक सुख देत नाही.ते सुख देत ते या सगळ्या सुखाना विसरवणार आत्मिक सुख.
सुख आणि दुःख यातला फरक नाहीस करायचं कार्य हे आत्मिक सुख करत..!
मागणी आणि पूर्तता ह्यामध्ये एक समंजस मन जाग करायचं काम हे आत्मिक सुख देत..!
हे आत्मिक सुखाच जागरण गुरूच्या सान्निध्यात होत तो खरा गुरू.
इतर पोटार्थी कला,अभ्यास शिकवणारा गुरू हा वाट दाखवणारा,माहितगार असू शकतो..पण तो गुरू नाही..!कारण तो गरज,स्पर्धा निर्माण करतो.सुख आणि समाधान नाही.कारण हव्यासात पूर्णता येऊ शकत नाही.आणि स्पर्धा,हव्यास जागवणारा गुरु होऊ शकत नाही.
गुरुपदाची व्याख्या करताना समर्थ सांगतात...अमर्यादतेचीही मर्यादा नसलेले हे सद्गुरुपद केवळ निखळ मुक्ती देते.ही मुक्ती तापत्रय,षड्रिपु आणि इंद्रियसुख यापासून असते.त्यामुळे त्यातून मिळणारा आनंद हा अक्षय असतो.सद्गुरू असा हवा.माझ्यातल्या मला शोधणारा आणि तो शोधून पुन्हा माझ्या हवाली करून मला मुक्तीपंथ देणारा माझा सद्गुरू..!
अशा गुरुसमोर उभं राहिलं की काहीच मागाव लागत नाही. मग तो गुरू इतकं देतो की त्याच्याकडे देण्यासारखं काहीच ठेवत नाही.त्याच हे देणं शिष्याच्या बाह्याकारावर दिसत नाही पण अंतःकरण पूर्ण तृप्त झालेलं असत.
असा अंतःकरणाचा स्वामी असलेल्या माझ्या सद्गुरूंना माझा प्रणाम..!!
🙏🙏
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment