समर्थांची करुणाष्टके (८) कडवे पाहिले..

समर्थांची करुणाष्टके (८)

कडवे पाहिले..

समर्थ म्हणतात..

तुझिया वियोगे जीवित्व आले..
शरीरपांगे बहु दुःख झाले..
अज्ञान दारिद्रय माझे सरेना..
तुजवीण रामा मज कंठवेना..!

रामराया..श्वासाशिवाय जगणं असत का रे..?भक्तीशिवाय परमार्थ ही नसतो..!पण माझ्या सध्याच्या या आयुष्यकाळात तुझ्याशिवाय जगणं आलंय. तूझ्या दुरत्वात सुद्धा मला जगण्याचा अट्टाहास करायला लागतोय..!

रामराया..तुझ्या या दुरत्वामुळे मला शरीराच्या,मनाच्या अस्तित्वात काही तरी कमी आहे,त्यात काहीतरी वैगुण्य आहे अस जाणवू लागल आहे.अर्थात त्यात राम नाही हे पटू लागलं आहे..!

रामराया..आर्थिक,शाररिक,ऐहिक दारिद्र्याची चिंता नाही..पण भक्ती वैगुण्यामुळे येणाऱ्या मानसिक दारिद्र्याची खंत मात्र माझ्या मनात अतिशय जागती आहे..आणि दिवसेंदिवस ती वाढती आहे..!

रामराया..ही सगळी माझी अवस्था तुला ज्ञात आहेच पण त्याप्रमाणेच मला तुझ्याशिवाय कुठेही करमत नाही,जीव लागत नाहीये हे सुद्धा माहीत आहे ना..?

समर्थ मनुष्याच्या आयुष्यात रामरूपी परमार्थ नसेल तर काय घडते याच वर्णन या कडव्यात करतायत.प्रत्येक कार्यात,आचरणात राम असावा आणि तो जागता ठेवावा अस समर्थ म्हणतात.आणि तो नसेल तर जगणं,व्यवहार,प्रपंच,परमार्थ हे सगळं व्यर्थ आहे,वैगुण्यपूर्ण आहे..रामरुपाशिवाय आपलं अस्तित्व अपंग आहे हे समर्थ सांगताना रामरायाला त्याच्या वियोगाची परिणीती ही रामसमोरच कथन करतायत..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment