समर्थरचित चौपदी (भाग ६)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग ६*

*प्रबंध सरळी दे रे राम..*
*शब्द मनोहर दे रे राम..*
*सावधपण मज दे रे राम*
*बहुत पाठांतर दे रे राम.*
*दास म्हणे रे सद्गुण धाम*
*उत्तम गुण मज दे रे राम.!*

समर्थ म्हणतात...
रामराया मला तुझं उत्तम संकीर्तन करायचं आहे.मला त्यासाठी तुझी,सर्व पौराणिक विषयांची,ऐतिहासिक घटनांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचे विवेचनात्मक सादरीकरण मला करता आलं पाहिजे.या सगळ्याची उत्तम ओळख तू मला करून दे रे रामा..!

रामराया...
तुझं अस्तित्व,तुझं दर्शन,तुझ्या लीला या सगळ्याच सर्वांगसुंदर आहेत.त्या सगळ्यांच वर्णन करण्यासाठी माझ्याकडे  तितकीच सुंदर,व्यक्त शब्दमाला असायला पाहिजे.ही शब्दसंपत्ती मला तुझ्याशिवाय कोण देणार?ती ही मला दे रे रामा..!

रामराया..
इतकं असून सुद्धा मी मूढमती आसल्यामुळे माझ्या हातून तुझ्या संकीर्तनात अनेक चुका होतात,त्रुटी रहातात..तू मला नेहमी सांभाळून घेतोसच..पण अशा माझ्या चुका मला सावधपणे सुधारून पुन्हा धीट पणे तुझं संकीर्तन चालू ठेवता आलं पाहिजे अस प्रसंगावधान मला शिकवशील ना रे रामा..?

रामराया...
तुझं चरित्र म्हणजे एक दीर्घ मनोहर अशा प्रसंगांची शृंखला आहे.त्यात प्रत्येक कृतीतून तू आम्हाला शिकता येतील अशी वचने आहेत.त्याबरोबरच वेदांत,पुराण,उपनिषदे यांतील श्लोक,ओव्या,स्तोत्रे अस अनेक वैभव आहे.हे सगळं माझ्या मतीमध्ये समावेल इतकं पाठांतर माझ्याकडून करवून घेशील ना रे रामा..?

रामराया..मी तुझा अंकित आहे,दास आहे,ऋणी आहे.पण तू मात्र सगळ्या सद्गुणांची,सदवर्तनाची,सदाचाराची खाण आहेस,मेरुमणी आहेस.तू सकल विश्वाचा आदर्श आहेत.विश्वाचा विश्राम आहेस..!हे तुझं वर्णन खूपच थोड आहे.इतका तू अगाध आहेस रे रामा..!

रामराया..
तुझं वर्णन हे गुणवर्धन आहे.पण मला त्यातल जेवढ काही उत्तम आहे ते मला दे ना रे..!मी मनापासून प्रयत्न करेन.मी आचरण करायचा प्रयास करेन.पण मला जे उत्तम,जे सत आहे असे सगळे गुण मिळावेत हे मागण तुझ्याकडे कायम राहील.या दासावर ही कृपा करशील ना रे रामा..?

समर्थ स्वतःला कायम घडवत आहेत.स्वतःच्या उत्तम अशा अस्तित्वाला हेतुपुरस्सर उत्तरं रित्या रचत आहेत.अशी बहुआयामी प्रतिभा समर्थांची आहे.रामाकडे निस्सीम भक्ती करून,मागणी करून त्यांनी ती घडवली आहे..!आपल्यासमोर ही तोच आदर्श आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment