समर्थरचित चौपदी (भाग ७)

*समर्थरचित चौपदी*
*भाग ७*

*पावनभिक्षा दे रे राम..*
*दिनदयाळा दे रे राम..*
*अभेदभक्ती दे रे राम..*
*आत्मनिवेदन दे रे राम.!*

समर्थ म्हणतात..

रामराया..तू माझ्या मनाच्या झोळीत घालशील ती केवळ अपूर्व भिक्षा असेल.तुझ्या पावन हातून,पावन मनातून,पावन आशिर्वादातून जे मिळेल ती पावनभिक्षा माझं पूर्ण कल्याण करेल रे रामा..!

रामराया...ही पावनभिक्षा तू देशील कारण तू तितकाच मनाचा कनवाळू, दयाळू आहेस.आणि या भिक्षेचा उपयोग मी तुझ्याच संकीर्तनासाठी करणार आहे.हे सगळं तुझंच  आहे,तुलाच देणार आहे रे रामा..!!

रामराया..या साठी पराकोटीची एकाग्रता जी  तुझं ध्यान,मनन मनात साठवू शकेल,जागवू शकेल..!ती भक्ती मला दे..!अशा भक्तीत कुठलाही भेद निर्माण होत नाही..!कोणीही कितीही आशंका निर्माण केल्या,तुझ्याबद्दल अविश्वास व्यक्त केला तरी माझी भक्ती अढळ राहील ह्याची ग्वाही मी तुला देतो..पण तू मला तशी भक्ती साकारून दे रे रामा..!!

रामराया..मी तुझ्याकडेच व्यक्त होऊ शकतो.माझ्या मनाचा कोपरा न कोपरा मी उलगडून दाखवून त्यातली ममता आदी भावनांची आहुती तुझ्या चरणावर ठेवली आहे.मी माझं अस अस्तित्वच ठेवलं नाहीये.स्वतःला तुझ्यापायी समरसून घेतोय..फक्त तू आता मला उराशी कवटाळून घेशील ना रे रामा..!!

समर्थानी एक सुंदर शब्द प्रचलित आणला पावनभिक्षा..!देणारा दातृत्वाने पावन..घेणारा भक्ती आचरून पावन..ही भिक्षा ही अनादीकाळा पासून सदापुनितच आहे.
ही भिक्षा हे घेणारे समर्थांसारखे युगपुरुष, देणारा युगनिर्माता..!आणि आपण त्या भिक्षेचा आस्वाद घेणारे पांथस्थ,भिक्षुक..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment