*दासनवमी*
गेले आठ दिवस चाललेला उत्सव आज समाप्तीला येतोय..!
समर्थसमाधी आणि रामाच्या भोवती तेरा प्रदक्षिणेची उपासना करून जेंव्हा सगळे रामासमोर उभे रहातात..तेंव्हा मन गलबलून येणं म्हणजे काय कळत..!जो क्षण मन नाकारत असते तो क्षण काळ साकारत असतो..!
*कल्याण मागणे रामा तुज*
ही प्रार्थना म्हणताना कदाचित शरयूतिरीचा तो रामराय थोडा अधीर झाला असेल ना..?
अनुदिन अनुताप झेललेला हा विराट पुरुष आता रामाश्रींकडे जाणार..!
काय करतील रामराय..?
कदाचित स्वतःच्या केशरी शेल्याने आपल्या समर्थाच्या कपाळाचे धर्मबिंदू पुसतील..?मायेने त्यांच्या धवल तेजल केसांवरून हात फिरवतील..?
काय केलं असेल त्या कैवल्यमूर्तीने..?
समर्थाचा आराध्य वायुसुत..त्याने वायूच्या मऊशार पायघड्या घातल्या असतील..?दाही दिशातल्या विस्तीर्ण कक्षा आकुंचल्या असतील..?
क्षितिज थोडं लांबल असेल..?हे जग नका सोडू..!रामराय तुमच्या जवळच आहेत,तुमच्यात आहेत..!त्यांना घेऊन तुम्ही आमच्यातच रहा ना..!नका जाऊ..!!
आयुष्यभर अमाप कार्य केल्यानंतर हा विरपुंगव आपलं तेज रामध्यानात परावर्तित करायला चाललाय..!
आम्हाला सोडून चाललाय..!भोवती रामदासी जमलेत..!स्वतःला,आम्हाला त्या ओजस्वी रामरंगी रंगवणाऱ्या या कृतार्थ रंगमनस्वी संताला आता त्या रामस्वरूपाची ओढ लागलीये..!
ब्रह्मपिसा मधला रुद्रही थोडा गहिवरला ..!समर्थस्थापित धाब्याचा मारुतीने विनवणी केली ..समर्था नकाहो जाऊ..!
सज्जनगडच्या उतरत्या पायरीवरचा दगड नी दगड ही मोकळा होऊन त्यांचा वाटेत आडवा पडला असेल ..नाही समर्था ..नाही जाऊ देणार..!!
पण राममय होण्याची जिद्द असलेला हा निग्रही संत आता थांबणारा नाही.!
दासबोधाची गंगा,मनोबोधाची यमुना,उपासनेची कृष्णा,प्रयत्नवादाची गोदावरी आणि भक्तीची नर्मदा..सगळ्यांनी एकदा ते चरण पाहून घेतले..!प्रोक्षण करून घेतले..!
सांप्रदायाची पताका तेवत ठेवून हा कर्मयोगी निशांत ध्यानमग्न होऊ पहातोय..!
आम्ही फक्त हतबल होऊन ते जाण पहायच की त्या विदेह स्वरूप सोहळ्याचे एक साक्षी म्हणून कृतार्थ व्हायचं..?
शरयू तिर कृतार्थ होईल..
आयुष्य भर बलदंड देहाच्या कुडीत तेवता राम आता त्या अगाध रामतत्वात विलीन होईल..!
आणि आम्ही सारे रामदास पुन्हा एकदा हेच म्हणत तल्लीन होऊ..
अर्थात तोच गुरुमंत्र देऊन समर्थ राममय झालेत..रामतत्त्वी लिन झाले...!!!
*कल्याण मागणे रामा तुज..*🙏
प्रवीण कुलकर्णी🙏
No comments:
Post a Comment