*दासनवमीची संध्याकाळ..*
*एक विरक्त अनुभव.!!*
सज्जनगडची ही संध्याकाळ माझ्यासारख्या प्रत्येक रामदासासाठी काहीशी अवघडच जाते..!
समर्थांची नुकतीच लागलेली अलख समाधी..हळूहळू शांत होणारा परिसर..!कालपर्यंत आकाशगंगे शी स्पर्धा करणाऱ्या रोषणाईच्या प्रत्येक दिव्याच्या मागची काळी अंधारातील वर्तुळ आता या संधीप्रकाशात जास्त जाणवू लागतात..!
मनोबोधाचे जयघोष,दासबोधाची पारायणे पूर्णविरामात विसावलेली..!
दिवसभर चाललेले मंत्रोच्चार पुन्हा त्या सजीव पोथ्यांमध्ये विसावल्या सारखी जाणवतात..!
एक विरक्त अनुभव..!
मी एकदाच अनुभवला..!पुन्हा ती विरक्तता मी नाही मनात आणू शकत अजूनही..!
शेकडो रामदासी मंडळींनी हातांनी वाढलेली अन्नपूर्णेची ही तृप्त उधळण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते..!
गडावरचा प्रत्येक रामदासी अंग मोडेपर्यंत हा प्रसाद प्रत्येक दासभक्तापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोच.. प्रत्येक शारीरिक मर्यादा आणि वेदना लपवत सुहास्य वदनाने आता पुन्हा केंव्हा येणार..?हे जेंव्हा विचारतो तेंव्हा आपण किती स्वार्थी आहोत,आपल्या संसारात,आयुष्यात लिप्त आहोत..कुपमंडुक आहोत याची जाणीव होते..!
दिवस,रात्र,पहाट याची तमा न बाळगता..रोजची दोन तीन तासाची कशीबशी झोप घेऊन हे मारुतीरायाचे अनुयायी अक्षरशः झटत असतात..!
शेकडो राममयी स्त्रिया नऊ दिवस रांगोळी चा ,स्वयंपाकाचा महायज्ञ करत असतात..!
आता आम्ही येतो हे म्हणताना त्या आया बहिणींच्या डोळ्यांच्या कडा लालसर ओल्या झालेल्या सहज कळतात..!
धन्य ..केवळ धन्य तो सेवाभाव..!
हे सगळं एक रामदास असूनही नाही सहन होत..!
ही संध्याकाळ निष्काम कर्मयोग शिकवते..!
दास डोंगरी रहातो..यात्रा देवाची पहातो..!
समर्थ ही दर वर्षी भरणारी यात्रा कुठल्याश्या असीम राममयी पर्वतावरून पहात असतीलच..!
ती विरक्तता समर्थ पेलू जाणोत आणि रामदासी मंडळी..!
कीर्तन,भजन,प्रवचन सगळं आता मनात ठेऊन निघायचं..!
मी त्या उत्सवाच्या परमोच्च क्षणीच गडउतार होतो..!
माझ्यासारख्याला हे या सगळ्याना नजरेसमोरुन निरोप देणं जमत नाही..!
समर्थानी सांगितलेली विरक्ती अजूनही तनात,मनात येत नाही..!
गडावरचा प्रत्येक रामदासी ही गोष्ट लीलया करतो..!
आजची संध्याकाळ हे सगळे रामदासी आपल्याला कुटीत आपल्या आपल्या शारीरिक,मानसिक मर्यादावर औषधी,मनाचे उपचार करत पहुडतील..!
आणि आपण पुन्हा त्याच संसारात,जगात स्वतःला ढकलून देऊन स्वतःची कोती मर्दुमकी जगात दाखवायला तयार होऊ..!
फक्त एकच इच्छा अशावेळी होते..आपण जेव्हा यातून निघून जाऊ त्यावेळी या असंख्य गर्दीतून एखादा थेंब निसटून निघून जावा,लुप्त व्हावा इतक्या सहजपणे हे जग सोडणे शक्य होवो..!
*राम आणि दास दोघे पहुडले रामी..*
*हे ही बोलावया नुरे च ते धामी..*
*वाचा पारुषली शब्द बोलवे पुढती..*..🙏
प्रवीण कुलकर्णी🙏
No comments:
Post a Comment