Chaitra Shuddha Pratipada (Gudi Padwa )

आजपासून नऊ दिवस रामरायाच नवरात्र पाळूया आपण...


समर्थाची रामाला उद्देशून लिहिलेली करुणाष्टके ..
रोज एका कडव्याच निरूपण...
थोडं लिहिणार आहे मी त्याबद्दल..तस प्रत्येक अष्टकाबद्दल,त्यातल्या प्रत्येक कडव्या बद्दल लिहायचं तर बुद्धी पुरणार नाही..
पण तरीही प्रयत्न करतोय...!

श्रीराम समर्थ

रामनवमी आणि त्या आधीचे आठ दिवस हे रामपर्व,रामनवरात्र म्हणून ओळखले जातात..!
रामकृपेचे दिवस..रामसहवासाचे दिवस..!

आजपासून नऊ दिवसांनी नवमीचा दिवशी राम जो मूर्तीत आहे तो मनात,आयुष्यात,घरात पुन्हा यायचा दिवस..!
सगुणातून सजीवतेत तो राघव येणार..!
समर्थानी केलेली करुणाष्टके ही राम अवताराच्या आधी आपली मानसिक पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आपण अनुभवू शकतो..!

राम येणार ना..?

तो येणारच पण आपली तयारी काय..?
करुणाष्ट्कात समर्थ रामाला साद घालताना स्वतः अनुदिन,अनुतापे तापलोय अस सांगतात..!अनुतापाने दग्ध झालेलं मन रामाची पायवाट आहे ना..?
हे अष्टक असच..!

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया..
परमदिन दयाळा निरसी मोहमाया..
अचपळ मन माझे ना आवरे आवरीता..
तुजवीण सीण होतो धाव रे धाव आता.!


हे पाहिलं अष्टक आणि त्यातील पाहिलं कडवं...!
कित्येकवेळा कित्येक माझ्यापेक्षा श्रेष्ठ विभूती कडून हे तुम्ही ऐकलं असेल..नव्हे नव्हे स्वतः वाचलं आणि म्हंटल ही असेल..!
शुद्ध मराठीत असलेलं ही रचना वेगळी काय सांगणार अस जर आपण म्हणत असाल तर एकच उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला या अष्टकाचा गर्भितार्थ कळेल..!

..आपण अनेक वेळा घरातून,स्वैपाकघरातून अहो ऐकलत का? हे ऐकलं असेल..
या तीन शब्दाचे किती अर्थ असू शकतात..?
काहीजण सहजपणे आलो म्हणतील..काहीजण आता काय नवीन अस म्हणून काळजीत पडतील..काहीजण हीच नेहमीचंच आहे असं म्हणून दुर्लक्ष करतील.. अस खूप काही..!

एवढ्या एका वाक्यात इतके गर्भितार्थ आणि निर्णयात्मक विचार असू शकतात..तर समर्था सारख्या चतुरंग पुरुषाने लिहिलेलं..आळवलेल किती गूढ असेल..?

या अष्टकात समर्थ
आपल्याला शबरी व्हायला शिकवतात.!
हो आपण शबरी झालो तरच राम येतील ना..?
समर्थ म्हणतात...
राम येण्यासाठी आपलं मन अनुतापी होऊ दे...आणि ते ही अनुदिनी..!

अनुताप म्हणजे दुःख नाही बर का..?तर अनुताप म्हणजे स्वतःच्या मनात सगळं असूनही दाटलेली हुरहूर..अस्वस्थता.. रामप्राप्ती ची ओढ..आणि भौतिक जगाबद्दलची उदासीनता..!

अनुदिनी सुख असून ही जी अपूर्णता असते तिला रोज वाट मोकळी करून देता येत नाही..!
हा अनुताप भौतिक नात्यात कुणाला सांगता येत नाही..या अनुतापाचा शेवट ही रामाची प्राप्ती किंव्हा प्रसन्न होणं..!

आपण देवळात येतो..कदाचित रोज येतो..पण मनाशी प्रामाणिक पणे आपण विचार करूया हे मंदिरात आपलं येणं हे आपसूक असत की ठरवून असत..?निर्हेतुक असत की सशर्त असत..!
आपण मोहमाये सकट रामाकडे येतो..!
बर इथं येतो आणि नमस्काराचा उपचार करून परत ही घेऊन जातो..!मग या मंदिरात येऊन आपण मिळवतो काय..?अनुताप हा कधीच असत नाही यामुळे..!
आजपासून अस करूया..रिक्त मनाने येऊ या मंदिरात..आणि जाताना राममय होऊन जाऊया..!मागायचं ही नाही आणि प्रदर्शन ही करायचं नाही..!

आणि मग आपल्या न कळत आपल्या भोवतीच्या मोहमाया असतील तर त्या नष्ट करायची बुद्धी आणि कृती राम च देईल...!

त्या जाळून टाकणारा राम नवमीला येतोय.!रामाला पुर्ण पुरुष म्हणतात..प्रत्येक नात्याला न्याय देणारा ..प्रत्येक नात जिवंत ठेवणारा राम..!

अवघड असत मोहमाया टाळून नात जगवण..खर तर अपेक्षा असते म्हणून नात जन्म घेत !या जन्माभोवती,नात्याभोवती,कर्तव्याभोवती घिरट्या घालणार आपल मन कधीतरी थकतच..!
तो रामराय येणारे ना..त्याच्या मांडीवर आपण हे मन,बुद्धी शरणगतेची उशी ठेवायची..!

आपल्याला माहीत आहे का राम हा एकमेव देव असा आहे ज्याला मनुष्यपणाची सगळी दुःख भोगायला लागली..!
आपण रामाला देवस्वरूप नको ठरवायला..आपण रामरायाला मैत्र करूया..आयावबहिणीनी माहेर ही करावं..तरुणी नी या रघुपतीला सखी करावं ना..तरुणांनी एक बलशाली आदर्श करावं..
वृद्धांनी आयुष्याचा घालवलेला काळ राम करावा...
असा जर राम करता आला ना..आपल्यात समावता आला न..तर राममय वृत्ती आणि त्याप्रमाणे त्या रघुराजाला आवडणार राममय आयुष्य आपल्याला ही जगता येईल..!

येता जाता राम नाम जपणाऱ्या आपल्यासारख्या जेष्ठ माणसांना हे सांगणे कदाचित अनुचित असेल पण भजनरहीत जन्म गेला अस म्हणताना आपण विचार करूया की मुखाने रामनाम घेत असताना किती काळ आपण तो राम आपल्या चपळ मनात   जागत ठेवला..!
मी आठवणीत नाही जागत ठेवला अस म्हणतोय..!
कारण अस आहे की या चपळ,सदा धावपळीच्या आयुष्यात जर आठवणी पेक्षाही राम मनात जागता असेल तर मन,शरीर कधीच दमू शकत नाही.आणि हे आपल्याला पटत जेंव्हा मन अनुतापी होते..आणि दुर्दैव अस की बहुतांशी तो आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध,वृद्धापकाळ असतो..!सर्व जन्म निघून गेलेला असतो..!
गात्र तशीही थकलेली असतात..अशावेळी हा अनुताप नाईलाजाने येतो..!
अस नको ना व्हायला..!
नाईलाजाचा अनुताप नाही तर श्रद्धेतून जन्माला येणारा अनुताप समर्थ रामासाठी तुमच्याकडे असावा असं सुचवतायत..!

तो रघुराज आपल्याला दिसण्यासाठी आपली पहिली पायरी आजच्या दिवशी ..अनुदिन अनुताप..!!🙏

©प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment