समर्थांची करुणाष्टके (६) कडवे चौथे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे चौथे.

समर्थ म्हणतात...

अवस्था मनी लागली काय सांगो..
गुणी गुंतला हेत कोणासि मागो..
बहुसाल भेटावया प्राण फुटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..आयुष्यातल्या एका अशा वळणावर मी येऊन थांबलोय जिथे मनाची अवस्था ही तुझ्या भक्तीत लिप्त आहे.पण मनाच्या आतला स्थायीभाव हा भौतिक गोष्टीत अडकलेला आहे.अशी द्वैतात असलेली माझी अवस्था तुला माहीत आहे तुला वेगळं काय सांगू..?

रामराया..तुझ्या स्वरूपात,तुझ्या निराकार विश्वरुपात माझं तन मन गुंतलय त्यामुळे तुझी समूळ प्राप्ती हा एकमेव हेतू उरलाय आता याबद्दल इतर कुणाला सांगून काय उपयोग..?तुझी प्राप्ती,तुझ्यात गुंतण हे तुलाच मागितलं पाहिजे..!!

रामराया...वर्षानुवर्षे मी तुझ्या दर्शनाची,अस्तित्वाची सवय लावून घेतली आहे.मी अतिशय शांतपणे तुझी भक्ती आचरण करतोय पण आता मात्र तुझ्या सस्वरूपासाठी मी व्याकुळ झालोय.इतका की तुझ्या दर्शनाशिवाय माझा प्राण जाईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.

रामराया..अशा निराश होऊन शरीर सोडण्याच्या विचारातून माझं मन उदासीन होऊ लागलं आहे.आणि त्यामुळे तुझ्याशिवाय कुठेच काळ मला घालवता येत नाहीये..!

भक्तीची परिसीमा म्हणजे व्याकुळता आणि व्याकुळतेचा अंत म्हणजे भगवंतप्राप्ती या सूत्रानुसार चालणारा परमार्थ समर्थ व्यक्त करतात..!
आपल्यालाही प्राप्त होण्यासाठी...!!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment