*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ५*
*भाग १*
*सगुणाकरिता निर्गुण पाविजे |*
*भक्तीविण दुजे सार नाही.||१||*
*साराचे ही सार ज्ञानाचा निर्धार..*
*पाविजे साचार भक्तियोगे..||२||*
समर्थ म्हणतात...
आपल्याला सगुणतत्वातली भगवंत मूर्ती समोर दिसते.ती आपण भजतो.पूजन करतो.पण त्यात जे देवत्व विराजत असत ते निर्गुण असत.खर म्हणजे हे पूजन असत ते निर्गुणाच असत पण ते सहज प्राप्त नसत म्हणून सगुणाचा आधार घ्यावा लागतो.
समर्थ म्हणतात..
या सगुणाची पूजा,आराधना करत जर निर्गुणाच दर्शन घ्यायचं असेल तर त्याला अनन्य भक्तीचा मार्गच योग्य आहे.ते निर्गुण अस ब्राम्हतत्व आपले इप्सित असलं पाहिजे.आणि ते ह्या सगुणाची भक्ती करतच प्राप्त होत.
समर्थ म्हणतात..
साऱ्या शास्त्रांच सार हे ब्रम्हतत्व,निर्गुण देवतत्वांपर्यंत पोहचण्यासाठी धरलेली ज्ञान संपादनाची कास हेच आहे.ही भक्ती साधक,मुमुक्षु वृत्तीच त्या निर्गुणापर्यंत घेऊन जाण्यासाठी उत्तम असे माध्यम आहे.
समर्थ म्हणतात..
या ज्ञानयज्ञाची पूर्णाहुती ही अनन्य भक्तीच्या श्रीफलाने असेल तर सगुणातून निर्गुण तत्वाच ज्ञान अतिशय सुनिश्चितते ने प्राप्त होत.आणि ही भक्ती आचार,विचार आणि साकारते ने अधिक प्रकर्षाने कृतार्थता आणते.
समर्थ या अभंगात निर्गुणाचा अप्राप्य मार्ग सगुणाच्या वाटेवरून कसा सोपा करता येईल याच मार्गदर्शन करतात.अर्थात या मार्गावर ज्ञानाची सोबत ही अखंड असावीच लागते.त्याशिवाय ते निर्गुण अस ब्रम्ह त्याची कवाड खुली करत नाही अस समर्थ सुचवतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment