आम्ही काय कुणाचे खातो..

*आम्ही काय कुणाचे खातो रे..?तो राम आम्हाला देतो रे....!!!*

समर्थांची ही रचना समर्थांच्या मुखातून ऐकली असती तर किती भाग्यवान झालो असतो आपण..?

सहा,साडेसहा फुटी बलदंड देह,उजव्या हातातील कुबडीचा त्या अंतहीन आकाशाकडे रोख...अंगावरच्या भगव्या वस्त्राची ज्योतिसारखी फडफड..गळ्यातली त्वेषात हलत असलेली रुद्राक्षमाळ..आणि चेहऱ्यावर वर असीम रामभक्तीच तेज,डोळ्यात कैवल्यपूर्ण विश्वास..!
असे समर्थ जेंव्हा प्रत्येक संकटाला,प्रत्येक हतबलतेला असा प्रश्न विचारताना कसे असतील..?

मलंग अवस्थेतील हा महात्मा या पूर्ण जगात फक्त राम आणि रामभक्तीवर अवलंबून होता.देहाची फिकीर नाही..मानवी ऐहिकतेची पर्वा नाही..!
फक्त राम..!घेणारा,देणारा,अनुभवणारा,सावरणारा राम...!
इतका पराकोटीचा  पारमार्थिक त्वेष हा त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीवर ओढलेला आसूड होता.

परकीय आक्रमणामुळे पराधीनता शिगेला पोहचली होती.जो तो दबकून आयुष्य जगत होता.अशा परिस्थितीला नजरेला नजर देऊन हा प्रश्न विचारणारा सैराट असा हा मनजेता..!

तटावर फुटलेल्या वटवृक्षासारखा आशेचे किरण फोडणारा हा संत.केवळ पाषाण असलेल्या उभ्या चिरेबंदीत जीवन शोधणारा हा आशावादी संत..!
तो राम तिथे जगवतो,ती रामवृत्ती आयुष्याच्या रूपाने तिथे जन्म घेते..!हे सिद्ध करून त्याचा उद्घोष करणारा हा नरसिंह..!

सजीवांची उत्पत्ती,निर्जीवांची व्युत्पत्ती हे सारं राम निर्माण करतो.तो रामच आम्हाला देतो.

कोणी कुणाचं दास नाही,कोणी कुणाचा त्राता नाही.सार काही फक्त राम आहे.

कष्टाच्या रूपाने राम शिणतो.मोलाच्या रुपात राम मिळतो.

इतकी काहींची बेछूट आरोळी देणारा हा समर्थ रामदास नावाचा अवलिया..!

हे समर्थ रामरायांच्या रुपात आपल्या मागे उभे असतील तर आपण ही तितक्याच मलंग,अलख अवस्थेत म्हणू शकतो...

*आम्ही काय कुणाचे खातो रे.. तो राम आम्हाला देतो रे..!🙏*

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment