*नाथषष्ठी*

*नाथषष्ठी*

कैवल्य आणि संसार या दोन्ही विषम अवस्थावर दृढ ठरलेलं व्यक्तिमत्त्व हे नाथमहाराज..!

भक्तक्षेत्रात त्यांना आनंदसगर म्हणतात..!

संत ही सामाजिक प्रवृत्तीच अशी आहे की जे विचार करतात,शब्दात बोलतात आणि तेच आचरणात आणतात..!

केवळ भक्तिमार्ग आणि त्यानुरूप मानसिक शक्ती याचे पुरेपूर उदाहरण असणारे नाथ पैठण क्षेत्रात होते पण सर्व चराचरात उदाहरण म्हणून राहिले.

आपण ना त्यांना फक्त एक कथेतून च ओळखतो..!थुंकणारा यवणाची कथा..!या पलीकडचे नाथ आपल्याला माहीतच नाहीत.

प्रचंड सामाजिक भान,परात्पर भूतदया याचा संयोग म्हणजे नाथमहाराज..!

आणि हे सगळं करताना त्यांची ईश्वरभक्ती तेवढीच प्रबळ आणि एकनिष्ठ..!

नाथवाड्यातल्या मूर्त देव्हारा आणि घरातला *श्रीखंडया* त्यांनी एक मानला..!

नाथमहाराज उत्तम साहित्यिक आहेत.सहित्यातला प्रत्येक प्रकार त्यांनी सामाजिक सुधारणा आणि ईश्वरभक्ती साठी वापरला आणि तो सर्वव्याप्त केला.

समाजसुधारक असून सुद्धा ईश्वराधीन असणं ही सत्शील आदर्श पुरोगामी वृत्ती बाळगलेले नाथमहाराज आजच्या दिवशी कैवल्याधीन झाले..!

कैवल्यउपनिषद प्रत्यक्ष जगणारे असे हे  नाथमहाराज ..!!


©प्रवीण कुलकर्णी🙏

Dasnavmichi Sandhyakaal

*दासनवमीची संध्याकाळ..*
*एक विरक्त अनुभव.!!*


सज्जनगडची ही संध्याकाळ माझ्यासारख्या प्रत्येक रामदासासाठी काहीशी अवघडच जाते..!

समर्थांची नुकतीच लागलेली अलख समाधी..हळूहळू शांत होणारा परिसर..!कालपर्यंत आकाशगंगे शी स्पर्धा करणाऱ्या रोषणाईच्या प्रत्येक दिव्याच्या मागची काळी अंधारातील वर्तुळ आता या संधीप्रकाशात जास्त जाणवू लागतात..!

मनोबोधाचे जयघोष,दासबोधाची पारायणे पूर्णविरामात विसावलेली..!
दिवसभर चाललेले मंत्रोच्चार पुन्हा त्या सजीव पोथ्यांमध्ये विसावल्या सारखी जाणवतात..!

एक विरक्त अनुभव..!

मी एकदाच अनुभवला..!पुन्हा ती विरक्तता मी नाही मनात आणू शकत अजूनही..!

शेकडो रामदासी मंडळींनी हातांनी वाढलेली अन्नपूर्णेची ही तृप्त उधळण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते..!
गडावरचा प्रत्येक रामदासी अंग मोडेपर्यंत हा प्रसाद प्रत्येक दासभक्तापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोच.. प्रत्येक शारीरिक मर्यादा आणि वेदना लपवत सुहास्य वदनाने आता पुन्हा केंव्हा येणार..?हे जेंव्हा विचारतो तेंव्हा आपण किती स्वार्थी आहोत,आपल्या संसारात,आयुष्यात लिप्त आहोत..कुपमंडुक आहोत याची जाणीव होते..!
दिवस,रात्र,पहाट याची तमा न बाळगता..रोजची दोन तीन तासाची कशीबशी झोप घेऊन हे मारुतीरायाचे अनुयायी अक्षरशः झटत असतात..!
शेकडो राममयी स्त्रिया नऊ दिवस रांगोळी चा ,स्वयंपाकाचा महायज्ञ करत असतात..!
आता आम्ही येतो हे म्हणताना त्या आया बहिणींच्या डोळ्यांच्या कडा लालसर ओल्या झालेल्या सहज कळतात..!

धन्य ..केवळ धन्य तो सेवाभाव..!

हे सगळं एक रामदास असूनही नाही सहन होत..!

ही संध्याकाळ निष्काम कर्मयोग शिकवते..!
दास डोंगरी रहातो..यात्रा देवाची पहातो..!
समर्थ ही दर वर्षी भरणारी यात्रा कुठल्याश्या असीम राममयी पर्वतावरून पहात असतीलच..!
ती विरक्तता समर्थ पेलू जाणोत आणि रामदासी मंडळी..!

कीर्तन,भजन,प्रवचन सगळं आता मनात ठेऊन निघायचं..!

मी त्या उत्सवाच्या परमोच्च क्षणीच गडउतार होतो..!
माझ्यासारख्याला हे या सगळ्याना  नजरेसमोरुन निरोप देणं जमत नाही..!
समर्थानी सांगितलेली विरक्ती अजूनही तनात,मनात येत नाही..!
गडावरचा प्रत्येक रामदासी ही गोष्ट लीलया करतो..!
आजची संध्याकाळ हे सगळे रामदासी आपल्याला कुटीत आपल्या आपल्या शारीरिक,मानसिक मर्यादावर औषधी,मनाचे उपचार करत पहुडतील..!
आणि आपण पुन्हा त्याच संसारात,जगात स्वतःला ढकलून देऊन स्वतःची कोती मर्दुमकी जगात  दाखवायला तयार होऊ..!

फक्त एकच इच्छा अशावेळी होते..आपण जेव्हा यातून निघून जाऊ त्यावेळी या असंख्य गर्दीतून एखादा थेंब निसटून निघून जावा,लुप्त व्हावा इतक्या सहजपणे हे जग सोडणे शक्य होवो..!

*राम आणि दास दोघे पहुडले रामी..*
*हे ही बोलावया नुरे च ते धामी..*


*वाचा पारुषली शब्द बोलवे पुढती..*..🙏

प्रवीण कुलकर्णी🙏

दासनवमी

*दासनवमी*

गेले आठ दिवस चाललेला उत्सव आज समाप्तीला येतोय..!
समर्थसमाधी आणि रामाच्या भोवती तेरा प्रदक्षिणेची उपासना करून जेंव्हा सगळे रामासमोर उभे रहातात..तेंव्हा मन गलबलून येणं म्हणजे काय कळत..!जो क्षण मन नाकारत असते  तो क्षण काळ साकारत असतो..!

*कल्याण मागणे रामा तुज* 

ही प्रार्थना म्हणताना कदाचित शरयूतिरीचा तो रामराय थोडा अधीर झाला असेल ना..?

अनुदिन अनुताप झेललेला हा विराट पुरुष आता रामाश्रींकडे जाणार..!

काय करतील रामराय..?

कदाचित स्वतःच्या केशरी शेल्याने आपल्या समर्थाच्या कपाळाचे धर्मबिंदू पुसतील..?मायेने त्यांच्या धवल तेजल केसांवरून हात फिरवतील..?
काय केलं असेल त्या कैवल्यमूर्तीने..?

समर्थाचा आराध्य वायुसुत..त्याने वायूच्या मऊशार पायघड्या घातल्या असतील..?दाही दिशातल्या विस्तीर्ण कक्षा आकुंचल्या असतील..?
क्षितिज थोडं लांबल असेल..?हे जग नका सोडू..!रामराय तुमच्या जवळच आहेत,तुमच्यात आहेत..!त्यांना घेऊन तुम्ही आमच्यातच रहा ना..!नका जाऊ..!!

आयुष्यभर अमाप कार्य केल्यानंतर हा विरपुंगव आपलं तेज रामध्यानात परावर्तित करायला चाललाय..!

आम्हाला सोडून चाललाय..!भोवती रामदासी जमलेत..!स्वतःला,आम्हाला त्या ओजस्वी रामरंगी रंगवणाऱ्या या कृतार्थ रंगमनस्वी संताला आता त्या रामस्वरूपाची ओढ लागलीये..!

ब्रह्मपिसा मधला रुद्रही थोडा गहिवरला ..!समर्थस्थापित धाब्याचा मारुतीने विनवणी केली ..समर्था नकाहो जाऊ..!
सज्जनगडच्या उतरत्या पायरीवरचा दगड नी दगड ही मोकळा होऊन त्यांचा वाटेत आडवा पडला असेल ..नाही समर्था ..नाही जाऊ देणार..!!
पण राममय होण्याची जिद्द असलेला हा निग्रही संत आता थांबणारा नाही.!

दासबोधाची गंगा,मनोबोधाची यमुना,उपासनेची कृष्णा,प्रयत्नवादाची गोदावरी आणि भक्तीची नर्मदा..सगळ्यांनी एकदा ते चरण पाहून घेतले..!प्रोक्षण करून घेतले..!

सांप्रदायाची पताका तेवत ठेवून हा कर्मयोगी  निशांत ध्यानमग्न होऊ पहातोय..!

आम्ही फक्त हतबल होऊन ते जाण पहायच की त्या विदेह स्वरूप सोहळ्याचे एक साक्षी म्हणून कृतार्थ व्हायचं..?

शरयू तिर कृतार्थ होईल..
आयुष्य भर बलदंड देहाच्या कुडीत तेवता राम आता त्या अगाध रामतत्वात विलीन होईल..!


आणि आम्ही सारे रामदास पुन्हा एकदा हेच म्हणत तल्लीन होऊ..
अर्थात तोच गुरुमंत्र देऊन समर्थ राममय झालेत..रामतत्त्वी लिन झाले...!!!

*कल्याण मागणे रामा तुज..*🙏

प्रवीण कुलकर्णी🙏

दासनवमी उत्सव

*दासनवमी उत्सव*

उद्यापासून तो सोहळा चालू होईल..!नऊ दिवसाचा तो आनंदोत्सव..!यावर्षी आठ दिवसच चालणार..!एका तिथीचा क्षय..!

रामाचा उत्सव..रामदासांचा उत्सव..!

गुरुप्रतिपदेचा हा आरंभ..!समर्थानी नवविधाभक्ती संगीतलीये..!रोज एक एक भक्तीचा अनुभव घेत नवमी ला राममय व्हायचं..!

उर्ध्वार्जन होऊन रामपंचायतन तेजाने  झळाळून उठलय.मुख्य मंदिरात किनाती चढल्यात.शिखरावरची रोषणाई वरच्या निरभ्र आकाशाला आकाशगंगेच स्वरूप देतीये..!जागोजागी सुरेखीत,सुनियोजित भगवे,पिवळे मंडप वसलेत..!श्रीधरकुटी ही गुरूच्या या उत्सवात तल्लीन होऊन एकाग्र होऊ पहातीये..!
पेठेतला मारुतीने काहीकाळ ध्यान सोडलंय..!अशोकवनातले दत्तमहाराजानी त्रिमुखाने गुरुतत्वाचा जयजयकार चालू केलाय..!

वृंदावनातल्या अक्काबाई,वेण्णाबाईनी भक्तीच्या फुलवाती फुलवायला घेतल्यात..!

मानकऱ्यांनी मशाली साफ केल्यात,चवऱ्या तयार आहेत..दिमडी, तुतारी श्वास रोखून व्यक्त व्हायला तयार आहेत..!

या सगळ्या लव कुशा नो या..!अकरा मारुतीच्या तत्वानो वायूवेगाने या..!
बलशाली हिंदू अधिष्ठित संयमीत शक्तींनो या शाक्तपूजकाच्या उत्सवाला या..!

सारे जण या..!कोणी कष्ट घेऊन या..!कोणी सूर घेऊन या..!कोणी भक्ती घेऊन या..!कोणी विरक्ती घेऊन या..!कोणी निशब्द होऊन या..!कोणी सशब्द होऊन या..!

सारे या..!आपण त्या बहुआयामी संताच्या पायी लिन होऊ या..!शरण जाऊ या..!

आणि मागूया ती पावनभिक्षा..!
जी आयुष्यातली यतार्थता,कृतार्थता देईल..!!

या वाट पाहतोय..!
तुमचा आमचा सज्जनगड..!!🙏🙏

प्रवीण कुलकर्णी🙏
.                                                                            ।।श्रीराम ।।                                                                                                                                                                                                                                                                        गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा  ||                                          
                                   नमूं  शारदा मूळ चत्वार वाचा |गमूं  पंथ आनंत या राघवचा ||
                                                                  
     
कोणत्याही कार्याच्या आरंभी , कार्याच्या मध्यभागी आणि कार्याच्या अंती मंगल करावे . असा न्याय शास्त्रात नियम आहे . मंगलाचारणाचे विषय दोन, तर प्रकार तीन आहेत . विषय गुरु किंवा सद्गुरू आणि देवदेवता हे आहेत . तर ब्रह्मनिर्देशात्मक ,नमस्कारात्मक आणि आशीर्वादात्मक असे मंगलाचारणाचे तीन प्रकार आहेत . या नियमांना अनुसरूनच श्री समर्थानी मनाच्या श्लोकांची रचना केली आहे.  मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक ब्रह्मनिर्देश मंगलाचारणाचे उदाहरण आहे.

समर्थांच्या लेखणीची शैली इतर संतांपेक्षा थोडी वेगळी आहे . आता याच श्लोकाचा विचार केला तर या मध्ये प्रथमदर्शनी गणपती, शारदादेवी व श्रीरामचंद्र या तीन देवतांना वंदन केले आहे, असे दिसते. पण आपण आता त्यामागे असलेल्या किंवा समर्थांना अभिप्रेत असलेल्या अर्थाचा विचार करण्याचा प्रयत्न करू.

गणाधीश या शब्दाचे  अनेक अर्थ आहेत.  गणाधीश म्हणजे चौदा विद्या आणि  चौसष्ठ कला यांचा  अधिपती गणपती, गणाधीश म्हणजे सर्व गणांचा स्वामी . गण म्हणजे इंद्रिय , गण म्हणजे पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश हे पाच भूतगण. शब्द , स्पर्श , रूप , रस , गंध हे विषयगण. पंचज्ञानेंद्रिये , पंचकर्मेंद्रिये आणि अंतःकरण , मन , बुद्धी , चित्त , अहंकार हे पाच अन्तःकरणपंचक या सर्व गणांचा स्वामी. गणाधीश म्हणजे शुद्ध ज्ञानस्वरूप असलेले परब्रम्ह तत्व. हा सत्व,रज,तम या त्रिगुणांचा हि मूळ आरंभ आहे. तसेच तो निर्गुण तत्वाचा आरंभ आहे. निर्गुणतत्व म्हणजे अद्वैत सिध्दांन्त, जिथे गुरु - शिष्य,साधक - साध्य, भगवंत - भक्त,(आराध्य दैवत )अशा सकळ द्वैताचा लय  होऊन दोन्हीचे एकाच स्वरूपात तादात्म्य होणे म्हणजे निर्गुण अवस्था होय. अशा या अवस्थेची सुरुवातीपासून अनंतापर्यंत जे एकच एक तत्व तूच आहेस.

तुझ्या अशा निर्गुण निराकार स्वरूपाला समजावून घेण्यासाठी लागणारी ज्ञानबुद्धीरूप,शब्दरूप वाणी, हि तुझीच प्रकृतीरुप शक्ती असलेल्या  शारदामातेला हि मी वंदन करतो. तुझीच शक्ती असलेली शारदामाता हि परा, पश्यन्ति,मध्यमा आणि वैखरी या चत्वार वाचेच्या मूळ स्थानी आहे तुझ्याच आशीर्वादाने मानव हा शब्दश्रीमंत,अर्थसंपन्न होऊन अवर्णनीय, अनाख्य,अनिर्वचनीय अशा परब्रम्ह स्वरूपाला समजावून घेण्यास पात्र होतो. गमणे या शब्दाचा दर्शवणे,समजावून देणे आणि रममाण होणे असा हि आहे.

अनंत रूपे,अनंत वेषे असूनही ज्याचे स्वरूप हे निर्गुण निराकार परब्रह्मतत्त्व आहे. अशा राघवाला, अशा आराध्य दैवताला समजावून घेऊन त्याच्या भक्तीमध्ये रममाण होणाऱ्या आणि अंती परमात्मास्वरूपच होणाऱ्या या पंथामध्ये या वाटेवर चालण्यासाठी इंद्रियांचा राजा असलेल्या मनाला समर्थांनी केलेला उपदेश आहे. पंथ म्हणजे विचारधारा. इथे त्या ईशतत्वापर्यंत पोहोचण्याचे पंथ किंवा वाटा हि अनंत,असंख्य आहेत. आणि ज्या तत्वापर्यंत पोहोचायचे ते ईशतत्वही अनंत म्हणजे अंत रहीत आहे.

थोडक्यात या मंगलाचारणात समर्थांनी,  आराध्य दैवत  प्रभू श्रीरामांच्या आदर्श पन्थाला अनुसरुन, आदी-अंत रहीत असलेल्या, निर्गुण निराकार स्वरूप असलेल्या परब्रम्हाला समजून घेण्यासाठी लागणाऱ्या शुद्धज्ञानस्वरूप,पुरुषरूप असलेल्या गणाधीशाला व प्रकृतीरूप असलेल्या, चारी वाणींची मूळदेवता  शारदामातेला , अनुक्रमे परब्रह्मरूप, पुरुषरूप,प्रकृतिरूप या मूळ तत्वांना वंदन केले आहे.

                                                           || जय जय रघुवीर समर्थ || 

श्री.  शरदबुवा  रामदासी , सज्जनगड