समर्थांची करुणाष्टके (४), कडवे दुसरे...

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे दुसरे...

समर्थ म्हणतात...

तुझे रुपडे लोचनी म्या पहावे...
तुझे गुण गाता मनासी रहावे..
उठो आवडी भक्तीपंथेचि जाता..
रघुनायका मागणे हेचि आता...!

रामराया...सुंदर,मनोहर कुणाला आवडणार नाही?दृष्टीस पडावे ते फक्त लोभस,देखणे..!आणि या त्रिभुवनात शाश्वत रहाणार सुंदर अस तुझं दर्शन,तुझी प्रतिमा,तुझी प्रेमळ छबी आहे..आणि हेच माझ्या नजरेने पहायला मिळतंय हे भाग्य माझं आहे..आणि तेच मला कायम मिळाव अशी मनोकामना आहे..!

रामराया...तुझ्या या सावळ्या सर्वांगसुंदर दर्शनाने दिसत असलेल्या,आत पोहचत असलेल्या तुझ्या निर्मळ कथा,तुझ्या अगम्य लीला..ह्या सदैव माझ्या मनात ,विचारात असाव्यात..आणि त्या सगळ्या मला त्याच उत्कटतेने समोरच्याला समजावून देता याव्यात..!

रामराया...मला माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक  सत्पुरुष,संत मला तुझ्या दर्शनाची,तुझ्या एकरूपतेची वाट दाखवणारा आहे..अशा वेळी मला कोणताही संदेह न मनात आणता त्या निर्देशित भक्तीच्या वाटेवर जाण्याची सहजबुद्धी प्राप्त व्हावी...!

रामराया...तुझ्याकडे येऊन तुला मागण्याच्या या हट्टामध्ये मी अनेक मागण्या करतोय..पण मी तुझ्याकडेच मागणार ना..?ते मागतोय...!!


समर्थांची कलादृष्टी, सौन्दर्यदृष्टी ही त्यांच्या साधनाकाळात ही तेवढीच उत्कट होती..!पण ही दृष्टी कुठे लावायची,कशी लावायची..हे समजवतात..!समजून घेऊ या आपणही..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (४), कडवे पाहिले...

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे पाहिले...

समर्थ म्हणतात...

उदासीन हे वृत्ती जीवी धरावी...
अती आदरे सर्व सेवा करावी..
सदा प्रीति लागो तुझे गूण गाता..
रघुनायका मागणे हेचि आता...!


रामराया...मला माझी वृत्ती वैराग्यपूर्ण करावी अस वाटतय.उदासीनता अंगी यावी अस वाटतय..(उदासीनता म्हणजे एकप्रकारची अतृप्तताच असते..जगातले सामाजिक,मानसिक,शाररिक अनुभव घेतल्यानंतर ही एक उणेपणा जाणवतो ती म्हणजे उदासीनता)सुख,दुःखाकडे समदृष्टी म्हणजे उदासीनता..!ही वृत्ती ,सहजतेने माझ्याठायी येत चाललीय..!

रामराया...या उदासीनतेमुळे माझ्यात सुलभतेने सेवाभाव निर्माण होऊ लागला आहे..!देवांची,देवालयांची, संतांची,समाजाची अहर्निश सेवा करावी असा एकमेव ध्यास प्रकर्षाने मनात उमलू पहातोय.

रामराया...एकमेव ओढ,एकमेव गरज,एकमेव ध्यास आता तुझ्या गुणवर्णनाचा आहे.तुझ्या संकीर्तनाची एकप्रकारची सवय मला लागली आहे..आणि अशीच ती असली पाहिजे...!

रामराया...माझ्या बाकीच्या सगळ्या भौतिक मागण्या बाजुला ठेवून तुझ्या संकीर्तनाची मागणी मी तुझ्याकडेच करतोय..!

समर्थ ज्याची आशा आहे त्यालाच सारथी करतात..!रामापर्यंत पोहचण्यासाठी रामाकडेच मागण..!

इतकी सहज आहे ही भक्ती, सगळं समोर आहे..मिळवायचं ते ही समोर आणि मिळणार आहे ते समोर आहे..!
फक्त आपल्याला ती वाट ओळखून चालायचीय..!
चला तर मग..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे सहावे...

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे सहावे...

समर्थ म्हणतात..

दिनाचे उणे दिसता लाज कोणा..
जनी दास दीसे तुझा दैन्यवाणा..
सिरी स्वामी तू रामपूर्णप्रतापी..
तुझा दास पाहे सदा सीघ्रकोपी...!

रामराया..

माझी ही सगळी तुझ्या कृपेशिवाय झालेली  विकल,अस्वस्थता  समाजाला समजली तर तुझा सर्वसुखी दास अस बिरुद मी जे मिरवतो त्याची खंत तुला वाटणार नाही का..?

रामराया..असा तुझ्या सस्वरूपी दर्शनाशिवाय कायम अस्वस्थ असणारा मी,केवळ तृषार्त असा मी, समाजात अतिशय दैन्य,भणंग अवस्थेत फिरत असतो..आणि तो ही तुझा भक्त असून..हे तुला कमीपणा आणणार आहे ना रामराया...?

रामराया...तुझी कीर्ती,तुझं वलय,तुझी ओळख ही अखिल ब्रह्मांडात केवळ आणि केवळ सुखदायक,दुखनिवारक,पूर्णपराक्रमी अशी आहे..!

रामराया...या सगळ्या समाजातील माझ्या अवस्थेमुळे मी अस्वस्थ होऊन, माझी सहनशक्ती कमी होऊन उगीच छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करू लागलोय..!

समर्थ आता रामकृपेसाठी अतिशय काकुळतीला आलेल्या मानवी अवस्थेतली ही अवस्था वर्णन करताना रामाला त्याच्या कृपाकीर्तीची ही लाडिक आण घालू लागले आहेत.मातृत्वातल्या वात्सल्यापूर्ण गोंडस  गळेपडू प्रेम ही आता लटक्या विषादात व्यक्त करू लागले आहेत..!

वात्सल्यात्मक प्रेम हेच भक्तीच निरागस रूप..हो ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे पाचवे.

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे पाचवे.

समर्थ म्हणतात...

मज कोंवसा राम कैवल्यदाता..
तयाचेनि हे फिटली सर्व चिंता..
समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे...
सदा सर्वदा नाम वाचे वदावे...!

रामराया..माझ्या सर्वदूर विचारात,कल्पनेत मी माझ्या सुखाचा विचार करतो तेंव्हा मला फक्त तुझा आधार वाटतो..!तुझी  कैवल्यकृपा हीच माझ्या आयुष्याची एकमेव तारणहार आहे..!

रामराया...माझ्या समोर असलेली अनेक पारमार्थिक,सामाजिक कोडी केवळ तुझं अस्तित्व असेल तर निमिषात दूर होऊ शकतात.तू आयुष्यात असलास की कोणतीच चिंता रहात नाही हा माझा अनुभव आहे..!

रामराया..तू खरा तर खूप दयावान आहेस..!आर्त भक्तीला लगेच प्रतिसाद देतोस.प्रसन्न होतोस.कृपा करतोस..!पण एवढं असून ही मी तुझ्या या भक्त परीक्षेत का उत्तीर्ण होत नाही हे लक्षात येत नाहीये..!

रामराया...मला आता तुझ्या कृपेच एक इप्सित जाणत्या लोकांकडे बघून सापडलंय.आणि ते म्हणजे तुझं नाम..!या रामनामाच्या आधारेच तुझी कृपा मिळवू शकतो हे मला समजलय..!

समर्थानी आपल्याला त्यांच्या साधनेच्या अनुभवानुसार रामाची कृपा  मिळण्यासाठी फक्त रामनाम ह्या उपासनेची कास धरा इतकं प्रखरपणे सांगितलंय..!!
आपण तेवढंच ऐकूया ना? कारण ते समर्थ आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे चौथे..

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे चौथे..

समर्थ म्हणतात...

किती भार घालू रघुनायकाला...
मज कारणे सीण होईल त्याला...
दीनानाथ हा संकटी धाव घाली...
तयाचेनि हे सर्व काया निवाली...!

रामराया...मला नेहमी अस वाटत की माझं सुख,माझी सुबत्ता,माझं वैभव हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे..तुझ्यावर भार आहे..!तूच त्यासाठी काळजी घेतोस..आणि तूच मला हे सारं पुरवतोस..! तुझ्यावर भार घालायच्या माझ्या प्रवृत्तीची माझी मलाच लाज वाटू लागली आहे..!

रामराया..मला माहिती आहे  कायम माझ्या सभोवती,माझ क्षेमकुशल,मंगल घडवण्यासाठी तू अपरंपार कष्ट घेतो आहेस..!मला खजील व्हायला होत की तू देवाधीदेव असून माझ्यासाठी इतका दमून जातोस...!!

रामराया,एवढंच नाही तर माझ्या सुखाच्या काळात ते देण्यासाठी तू माझ्याबरोबर असतोसच पण माझ्या दुःखाच्या,परीक्षेच्या काळात तू माझ्यासाठी धावून येतोस..!ते दुःख निवारण करून सुखाची बेगमी करतोस..!

रामराया..अस सगळं तुझं अस्तित्व सर्वकाळी माझ्याभोवती,माझ्या क्षुब्ध मनात एक शीतल छाया निर्माण करून जात..!आणि त्या तुझ्या कृपेच्या सावलीखाली माझं तनमन शांत निवांत होत जात...!!


समर्थ आपल्या भोवती रामराया ने ठेवलेल्या सुखप्राप्तीच्या मार्गाची जाणीव ठेवतात.तसच ते सुख निर्माण करण्यासाठी तो रामराया सदा सन्निध राहून एकप्रकारे कष्ट घेतोय अशी कबुली ही देतात..!

आपण ही आपल्या सुखाच्या वाटेवर घेऊन जाताना रामरायच त्या पायवाटेवर अनुभवतो ना?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे तिसरे...

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे तिसरे...

समर्थ म्हणतात..

रघुनायका दिन हाती धरावे...
अहंभाव छेदूनिया उद्धरावे..
अगुणी तयालागी गुणी करावे..
समर्थे भवसागरी उतरावे..!

रामराया..तुझ्यासारख्या सुखदाता,आनंददाता,कृपावंत,विर्यवान अशा दैवताने माझ्यासारख्या मुढ साधकाला हाती घेतल तर मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यातसाठी ची वाट सुकर होऊन जाईल..!

रामराया...माझ्यातले अहंकाराचे बीज,देहभावाची ओढ,सुखाच व्यसन हे सगळे अवगुण मुळापासून छेदून टाकलेस तर मी तुझा भक्त होण्यासाठी थोडा लायक होईन..!

रामराया...माझ्यातले गुण जे तुझ्या भक्तीसाठी आवश्यक आहेत ते माझ्या अहंकार,देहबुद्धी आणि स्वार्थ याने विस्मृतीत गेले आहेत,त्यावर या सगळ्या अवगुणांचं मळभ दाटल आहे..ते बाजूला करून माझे गुण तू दाखवून देशील..जेणेकरून मी तुझ्या भक्तीत परिपूर्ण होऊ शकेन !

रामराया.. हे सगळं झालं तर मग मी या जगाच्या रोजच्या कार्यात,संसारात,प्रपंचात असून सुद्धा तुझ्या भक्तीपासून वंचित न होता सुखनैव आयुष्य कारणी लावू शकेन..!


समर्थ स्वतःच्या देह आणि मन यावर वेगवेगळे यथोचित संस्कार करून  ईश्वरभक्तीच्या मार्गावर मला घेऊन जा अशी रामाजवळ विनवणी करतायत..!
आपण ही अशी विनंती करायला हवी होय ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे दुसरे...

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे दुसरे...

समर्थ म्हणतात...

रघुनायक जन्मजन्मांतरीचा..
अहंभाव छेदूनि टाकी दिनाचा...
जनी बोलती दास या राघवाचा...
परी अंतरी लेश नाही तयाचा...!

रामराया...मी किंव्हा आम्ही सगळेच जन्माला येतो तेंव्हा सोहम वृत्ती सोडून कोहम वृत्ती धारण करतो..!कोहम म्हणजे मी आणि माझा मी..!मनुष्यजन्माला आलो तेंव्हाच हा मनुष्यपणाचा अहंकार माझ्या मनाला चिकटला..!

रामराया..हा अहंभाव,ही मनुष्यपणाची बेदरकार वृत्ती हीच माझ्या भक्तीच्या मुळाशी आलेली आहे..!रामा तूच आता माझ्या मनातल्या अहंभाव समूळ नष्ट करून आत्मारामापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवशील का रे..?

रामा..मी जगताना तुझे नाम घेतो,तुझ्या ध्यानात असतो,तुझ्या सेवेत असतो..हे सगळं बघून माझ्या भोवतीचे माझे सगेसोयरे मला तुझा म्हणायला लागले आहेत..!मी तुझ्यात रमलोय अस म्हणायला लागले आहेत..माझी ओळख तुझे समचरण असे समजायला लागले आहेत..!

रामराया..हे सगळं असलं तरी तुझे मूळ स्वरूप आहे..सगुणाच्या पलीकडचं  जे निर्गुण निराकार रूप आहे त्याच अस्तित्व अजूनही मला कळत नाहीये..!

रामकृपा ही रामदासाच्या बाह्य वागणुकीवर नाही तर भक्ताच्या आत राम किती पोहोचलाय..त्याच्यातला आत्माराम किती प्रकट झालाय..?यावर अवलंबून असते.आणि ती अवस्था येण्यासाठीची समर्थांची तळमळ आपल्याला इथे दिसून येते..!
हा आत्मस्वरूप राम आपल्या सर्वांच्या ठायी प्रकट होवो ही समर्थचरणी प्रार्थना..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (3), कडवे पहिले...

समर्थांची करुणाष्टके (3)

कडवे पहिले...

समर्थ म्हणतात...

नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही..
नसे प्रेम हे रामविश्राम नाही..
असा दिन अज्ञान दास मी तुझा..
समर्था जनी घेतला भार माझा...!

रामराया...माझ्या अज्ञानतेने मला तुझ्या भक्तीचे मार्ग माहित असले तरी सुद्धा त्याच आचरण कस करायचं हे कमीच कळत.तुझ ध्यान,तुझं मनन करायचं असत,भक्त करतात हे मला ही माहिती आहे पण त्याच अनुकरण कस करायचं हे कळत नाही..!

रामराया..तुझ्याबद्दल ची माझी भक्ती,तुझ्याबद्दलची माझी ओढ मी तुला कळेल अशा प्रकारे मांडू शकत नाहीये.तुझ्या धामी पोहचल्यानंतर तिथे मला जे सुख मिळेल त्याची गरज मी तुझ्याजवळ व्यक्त करू शकत नाही..!

रामराया...इतका हतबल मनाचा अतिशय विकल अवस्थेत मी माझ्या अज्ञानाने पिडलेलं असलो तरी मी तुझा दास आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे..!

रामराया...इतक्या सगळ्या अवगुणातून माझं आयुष्य चाललेल आहे..मी जगतो आहे याला कारण म्हणजे माझ्या भोवतीच्या तुझ्या खऱ्या भक्तांनी,समाजाने माझा भार घेतलाय..!त्या पुण्याईने मी या भवसागरातून सहजपणे तरून जातोय..!

समर्थ आपल्या उपासनेच श्रेय ही स्वतः घ्यायला तयार नाहीत.करवून घेणारा राम, करणारा आत्माराम, सांभाळ करणारा समाजराम(समाजपुरुष).

मिळवलेल्या पुण्याईच एवढं अर्ग्य आपण इतक्या सहजतेने सोडू शकू का..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे करुणाष्टक (२), कडवे आठवे...

समर्थांचे करुणाष्टक (२)

कडवे आठवे...

सदा सर्वदा राम सांडून कामी...
समर्था तुझे दास आम्ही निकामी..
बहु स्वार्थबुद्धीन रे कष्टवीलो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो...!

रामराया...तुझ्या भक्तीने,तुझ्या उपासनेत असावं हे खरं प्रत्येक मानवाच ब्रीद..!हेच खरं त्याच कर्तव्य..!पण काम नावाचा एक दैत्य ही उपासनेत कायम बाधा आणायच प्रयत्न करतोय..!
प्रत्येकवेळी माझं ध्यान,माझं पूजन हे काम नामक दोरखंड मागे ओढू पाहतोय..!

रामराया..तुझे दास म्हणून आम्ही आम्हाला मिरवतो..!भक्त म्हणून स्वतःला बिरुद लावतो..!पण मला आतून कळतय,समजतंय की या  सगळ्याला मी लायक नाहीये..!त्यादृष्टीने माझे अस्तित्व निरूपयोगी ठरत चालले आहे..!

रामराया..माझ्याभोवती चाललेले मला भुलवू पाहणारे हे सगळे भौतिक स्वार्थचे खेळ मला माझं मन दोलायमान करून,त्यासाठी माझी शाररिक,मानसिक दमछाक करून मला म्हणजे माझ्या आतल्या भक्तीतत्वाला तुझ्यापासून दूर ठेवून वैषम्य देऊ पहात आहेत..!

रामराया...त्यामुळे या सगळ्या ओढताणीची परिणीती माझा हा झालेला जन्म केवळ व्यर्थ जाणार असे वाटू लागले आहे..!

रामराया..माझी ही व्यर्थता शाब्दिक उपासनेतून  तुझ्याकडे व्यक्त करतोय..!तूच आता माझ्या या व्यर्थतेतून मला सोडवून माझ्या आयुष्याची यथार्थता माझ्यावर कृपा करून माझं आयुष्य कृतार्थ करून देशील याची खात्री आहे..देशील ना..?

श्रीराम...!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे करुणाष्टक (२) , कडवे सातवे...

समर्थांचे करुणाष्टक (२)

कडवे सातवे...

समर्थ म्हणतात...

किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती..
किती धर्मसंस्थापना अन्नशांती..
परस्तावलो कावलो तप्त झालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया..तुझ्या भक्तीत तल्लीन झालेले..योगसमर्थ्याने स्वतःच्या शरीर आणि मानसिक आवश्यकतांना नियंत्रित केलेले असे कितीतरी योगी,हठयोगी,पुण्यमूर्ती,कैवल्यमूर्ती तुझ्या दर्शनासाठी तुझ्या कृपेसाठी तिष्ठत तुझी आराधना करतायत..!

रामराया..तुझ्यासाठी पुण्यकार्य करताना अनेकांनी अनेकमार्ग स्वीकारलेत..काहीजण अन्नछत्रे चालवतायत..कितीजण भजन,प्रवचन,कीर्तन यामार्गाने धर्मसंस्थापना करून पुण्यसंचय करतायत..!

रामराया...या सगळ्यांचे दर्शन घेतो.त्यांच्याबद्दल माहिती होते...तेंव्हा मला माझ्याबद्दल पश्चाताप होतोय..!मला माझाच प्रचंड राग येऊ लागलाय..मी का तस होऊ शकत नाही.?या जाणिवेने मी दग्ध होतोय..आणि ती धग माझ्या आयुष्याला दग्ध करू पहातेय..!

रामराया..म्हणून मला अस वाटू लागलंय की ह्या दग्ध देहाला तुझी कृपा मिळू शकत नाही..तर माझा हा जन्म व्यर्थ जाऊ लागला आहे..!

समर्थ परमेश्वर प्राप्तीचे मार्ग सांगून स्वतःला ते अवलंब करता येत नाहीयेत याची खंत व्यक्त करतायत..!
इतका हा उत्तुंग धर्मकार्य,समाजकार्य करणारा महासंत रामाजवळ ही खंत व्यक्त करतोय,म्हणजे रामकृपे साठी किती विनय अजून आपल्यात यावा लागेल याचा आपण सारे विचार करू शकतो..!!

श्रीराम..!


©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच करुणाष्टक (२), कडवे सहावे..

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे सहावे..

समर्थ म्हणतात...

कितेकी देह त्यागिले तूजलागी..
पुढे जाहले संगतिचे विभागी..
देहेदुःख होताच वेगे पळालो..
तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो...!

रामराया...
तुझ्या साठी तपसाधना करता करता कित्येकांनी स्वतःचे देह झिजवलेत..घोर तपस्या करता करता अनेकांनी मृत्यपर्यंत तुझी अपरंपार प्रार्थना केली आहे..अनेक कठीण अनुष्ठाने,उपवास करून स्वतःच्या देहभावना विसरण्याची पराकाष्ठा करत  ते तुझ्या धामी पोहचले आहेत..!

रामराया, हे सगळं करूनच  अनेक जण तुझ्या सस्वरूपाचे सांगाती झालेले आहे..रामरंगी रंगून जीवन सार्थकी लावून गेले आहेत..!

रामराया,या सगळ्याचा मी ही प्रयत्न करतोय..पण मनाचे विकार,देहबुद्धी लगेच डोकं वर काढतीये..!भूक,तहान, वेदना,सहनशक्ती ह्या साऱ्या गोष्टी मला माझी साधना गिळंकृत करायला येतात..!
माझी साधना ही दुय्यम ठरुन माझी देहबुद्धीच माझं शरीर अनुसरू लागत..!आणि मग ती देहबुद्धी मला तुझ्या साधनेपासून,भक्तीपासून दूर घेऊन जाऊ लागते..!

रामराया...याच देहबुद्धीचं ओझं माझ्या आयुष्यावर,जिवीत्वावर पडू लागलय...तुझी भक्ती,तुझी ओढ ही मागे पडत चाललीये..आणी या देहबुद्धी सहित माझं अस्तित्व उगीच जन्माला आल,अकारण जन्माला आल अस वाटू लागलं आहे..!

रामराया..या देहबुद्धीचं विस्मरण होऊन तुझ्या चिरंतन अस्तित्वाच चिरकालीन सुख माझ्या ठायी येऊ दे..!

श्रीराम..!!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच करुणाष्टक (२) कडवे पाचवे...

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे पाचवे...

समर्थ म्हणतात..

बहुसाल देवाळये हाटकाची..
रसाळा कळा लाघवें नाटकाची..
पूजा देखतां जाड जीवी गळालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया..तुझं मंदिर म्हणजे एक मुक्तीस्थळ असत.कितीही वेळा तिथे आलं तरी मन भरत नाही..तुझी षोडशोपचार पूजा ,तुझी अंगपूजा रोज  अव्याहत पहातोय..!ही पूजा एक चित्रकथी,एक सुंदर नाटक पहातोय इतका मी त्यात नेहमी गुंग होऊन जातो..!

रघुवीरा..तुझा तो रसाळ दृष्टीक्षेप,सुमधुर हास्य,लक्ष्मण सीतामाई  बरोबरची आश्वासक आमच्या आयुष्यातली साथ..हे सारं केवळ मुग्ध करणार आहे..!

रामा.. पण हे सगळं बघताना मला माझ्या असमर्थतेची ही आठवण होते..!प्रत्यक्ष तर नाहीच..मानसपूजेत ही तुझ्यासाठीचे हे सोळा संस्कार,उपचार मी एकाग्रतेने करू शकत नाही..!तेवढी तुझ्याशी माझ्या मनाची तन्मयता अजून ही जुळत नाहीये..!

रामा..किती रे प्रयत्न करू अजून मी..?मला अजूनही तुझ्या उपासनेत सर्वस्व ओतता येत नाहीये..आणि त्यामुळे माझ्या भक्तीहीन देहाचा भार अकारण भूमीवर पडून माझं आयुष्य व्यर्थ चाललय..!जन्म व्यर्थ होत चाललाय..!

वयाच्या बाराव्या वर्षी रामकृपा होऊन ही समर्थ इतक्या लिनतेने रामरायाला विनवत आहेत..!

ही आर्त विनयशीलता आपण ही अंगात बाणवूया  हो ना??

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच करुणाष्टक .२ कडवे चौथे...

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे चौथे...

समर्थ म्हणतात..

तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले..
असंभाव्य ते कीर्ती बोलोनि गेले..
बहु धारणा थोर थकीत झालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया...तुझ्या साठी आयुष्य टाकणारे,जीव प्राण  याची पर्वा न करणारे,तुझ्या केवळ एका कृपाकटाक्षासाठी पूर्ण तहानभूक विसरणारे,देहात असून ही विदेही व्रत घेतलेले असे सगळे तुझे भक्त असंख्यात होऊन  गेलेत..काही अजूनही माझ्या भोवती आहेतच..!

रामा..या सगळ्या भक्तांनी तुझ्याप्रति असलेल्या भक्तीचे अतिशय उंच आयाम त्यांनी निर्माण करत एकाहून एक कीर्तीयुक्त आदर्श निर्माण केले आहेत..!
हे आदर्श माझ्या सारख्या हीन भक्ताला केवळ अशक्यप्राय वाटतात..पण तरीही त्यांचं भक्तीयुक्त आचरण मला नेहमीच प्रेरणादायी ठरत..!

रामा ..त्या सगळ्या भक्तश्रेष्ठींची धारणा बघून माझं मन पुन्हा पुन्हा विस्मित होते आहे.मला माहिती आहे की रामराया..ही धारणा म्हणजे आतुरता,श्रद्धा आणि इच्छा यांचं सुंदर मिलाफ रूप आहे..!पण त्या धारणेचे सुंदर प्रकट असे हे भक्तराज पाहून मला त्यांच्या उंचीबद्दल खरोखर कौतुकमिश्रित आश्चर्य वाटतेय..!

रामराया...पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सगळं पाहून,अनुभवून माझ्या स्वतःच्या मानसिक आणि पारमार्थिक खुजेपणाची जाणीव होऊन मी भूमीला भार आहे अस वाटू लागले आहे..!

समर्थ त्यांच्या साधनकाळातली ही अनन्य शरणभक्ती विनयशील पद्धतीने आपल्यासाठी खुली करतायत..!

आपण आपल्या जन्माची व्यर्थता टाळायची असेल तर करुणाष्टकांची यथार्थता समजून घेतली पाहिजे ..हो ना?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२