समर्थांची साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लळे पाळीतो राम आम्हा दिनाचे..|*
*कृपासागरू भाव जाणे मनाचे..|*
*नुपेक्षी कदा संकटी घाव घाली..|*
*तया देखता मानसे ती निवाली..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज जेंव्हा येतो तेंव्हा वात्सल्याने मातापित्या सारखे माझे निरागस हट्ट पुरवतो.प्रेमाने निरसन करतो.मी कितीही त्याच्याकडे मागितल तरी तो माझी आवड पूर्ण करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज कृपावंत इतका आहे की तो माझ्या मनात उठणारे प्रत्येक तरंग  मनस्वी पणे जाणून घेतो आणि त्याची मला सुखकर अशी व्यवस्था करून देतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज कुठल्याही अपेक्षेविना माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निरसन करतो.त्याचे सुखात परिवर्तन होईल अशी माझी जीवनशैली करून देतो.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या रघुराजाचे दर्शन घेतले की मनातले विकल्प शांत होतात.ईच्छा तृप्त होतात.मन सफल सम्पूर्ण अवस्था प्राप्त करते. एक तृप्त शांतता मन भरून पावते.

समर्थ चाफळला येऊन वसणाऱ्या रामरायाच गुणगान करताना त्याच्या अस्तित्वाचा त्यांच्यावर किती हळुवार पण सुखकर परिणाम होतो हे सांगत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लवे नेत्रपाते स्फुरे आजि बाहे..|*
*दीनानाथ हा राम येणार आहे..|*
*जयाचेनि योगे सुखानंद लोटे..|*
*तया देखता अंतरी बाष्प दाटे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

डोळ्यांची पापणी लवते आहे.हा शुभसंकेत आहे.हे शुभवर्तमान येणारा काळ घेऊन येणार आहे.अचानक केवळ जाणिवेने बाहुत,गात्रात स्फुरण चढून ते हर्षोउन्मादीत होत चालले आहेत..!

समर्थ रामदास म्हणतात...

तो राम जो सर्वउद्गारक,सर्वतारक सर्वकृपाळू आहे,त्याच आगमन आता निश्चित आहे.हे या साऱ्या शुभशकुन आणि शुभचिंतनाने खर ठरत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

तो रामराय आला की सौख्याचे सोहळे सुरू होतात.सगुणरूपाचे संकीर्तन चालू होते.भक्तीसागरातून आनंदसागराचा प्रवास सुरु होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या रघुराजाचे केवळ मुख दर्शन घेतले की डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात.मन,हृदय भक्तीने उचळंबून येते.आणि अधीर होऊन स्निग्ध,मुलायम होऊन जाते.

चाफळला रामपंचायतानाची प्रतिष्ठापना होणार होती त्या आसपास समर्थानी लिहिलेलं काव्य.रामाच आगमन समर्थांना किती मुग्ध करत होत,याचा प्रत्यय आपल्याला या ओवीत दिसतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तुझे मारुतीसारिखे दास देवा..|*
*मज मानवा किंकरा कोण कोण केवा..|*
*दिनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे.|*
*तेणे मानसी थोर आनंद माजे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. वायुसुत हनुमंतासारखा अग्रगण्य असा सेवकराज तुझ्या दास्यत्वाचे गुण गातो..तुझे समूळ दास्यत्व स्वीकारून मनोभावे तुझ्या चरणाशी लिन होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. हनुमंतासारखा तुझा दास असताना माझ्या सारख्या मानवाची,दासाची तुलना मी त्या भक्तश्रेष्ठाशी करून काही चुकीचे करत नाहीये ना..?

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. हे धाडस मी करतोय कारण तू जसा अशा भक्तश्रेष्ठाचा आश्रयदाता आहेस तसाच माझ्या सारख्या शूद्र उपासकाचा ही तू प्रेमळ दृष्टीने उद्धार करतोस अशी तुझी कीर्ती आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..अशा भक्तीमुळ खात्रीने,केवळ तू माझा पाठीराखा आहेस,माझ्या साठी कनवाळू आहेस या कृतार्थ जाणिवेने माझं मन आनंदाने,साफल्याने भरून आलं आहे.

समर्थ हनुमंताच्या भक्तीचा  आणि श्रीरामांच्या सख्यत्वाचा दाखला देऊन स्वतःला त्याठिकाणी पाहतात.आणि रामाच  सर्वकारुण्य ब्रिद ओळखून स्वतः ही मनाशी संतुष्ट होतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुनायका नीकट दास तुझा..|*
*तुला विकिलासे स्वयें देह माझा..|*
*सदा सर्वभावें करी दास्य तुझे..|*
*देई आपुले वेसवेतेन माझे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मी तुझा अतिशय शीघ्र आणि जवळचा दास आहे.मला तुझी हरप्रकारे सेवा करायची असल्यामुळे तुझ्या प्रत्येक,नवविधाभक्तीमध्ये मला स्वतः सादर व्हायचं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..हा माझा देह तुझ्या भक्तीच्या,आशिर्वादाच्या बदल्यात पूर्णपणे तुझा झालाय.मी त्याचे कोणतेही ऐहिक मूल्य आता ठेवलेले नाही.राखलेले नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मी हरप्रकारे तुझी सेवा,उपासना करतोय. तू दाखवलेल्या मार्गावरून चालतोय.तुझा आदर्श घेऊन माझं आयुष्य व्यतीत करतोय.तन,मन,धनाने केवळ तुझं दास्यत्व मी स्वीकारलेलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..आता मला माझ्या या दास्यत्वाचा मोबदला दे.आणि तो मोबदला म्हणजे तुझ्याशी अक्षय एकरूपता..!तुझ्या अखंड उपासनेचे कर्तृत्व..!तुझे आजीवन दास्यत्व..!

समर्थ उपासनेच अंतिम फलित कायमच रामचरण अपेक्षित करतात.आणि त्यासाठी रामाकडे स्वतः  स्वीकारलेल्या सर्वस्व त्याग आणि सदेह दास्यत्वाची आठवण ही करून देतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तुझा भृत्य मी भार्गवादर्पजीता..|*
*जीवित्व असे अर्पिले तुज आता..|*
*भवा जिंकिता जीव देईन पाहे..|*
*तुज सन्मुख पाठिसी स्थिर राहे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..तुला शरण येऊन मी तुझा दास झालोय.तू परशुरामासारख्या महावीराला त्याच गर्वहरण करून त्याला भक्त केलेस.तसच माझेही स्वतःबद्दलचे अनेक गैरसमज तू मोडून काढून मी तुझ्या दास्यतेचा बहुमान मिळवला आहे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..अशी संपुर्ण शरणागती मी घेऊन तुझा कायमचा दास झालोय.माझं जीवपण तुझ्या चरणाशी अर्पण केल आहे.सर्वस्व अर्पण केल आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. माझं भवभय मी तुझ्या भक्तीने विसरून जातो.ते इतकं नगण्य वाटत की आयुष्यात तुझ्या  संकीर्तनच्या बदल्यात जीवित्व सोडून द्याव अस वाटत.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..जेंव्हा असा तुझ्या सन्मुख मी दास म्हणून उभा  रहातो तेंव्हा एक चमत्कार घडतो.माझ्या सन्मुख असताना माझ्या पाठीशी  एका विशाल आशीर्वादीत देवते सारखा उभा रहातोस.आणि मी निश्चिन्त होऊन जातो..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*अजयो न हो रे जयवंत हो रे.|*
*आपदा नको रे बहु भाग्य हो रे..|*
*श्रीमंतकारी जनहितकारी.|*
*परऊपकारी हरि दास तारी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मला षड्रिपुवर विजय मिळवायचा आहे पण तो मिळवल्याचा अभिमान मात्र नको आहे.मला त्या अभिमानावर ही जय मिळवायचा आहे.त्या सर्वप्रकारे मला जयवंत व्हायचं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..उपासनेत संकट नकोतच.किंव्हा अधीरतेने येणारी आशंका ही नको.पण मला त्यानंतर तुझ्या कृपेचे येणारे भाग्य मात्र अपेक्षित आहे रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..तुझी आम्हाला सर्वप्रकारे मानसिक,शारीरिक संपन्न करणारी वरदमूर्ती अतिशय आवडते.आणि त्यानेच सगळ्यांच खर हीत ही तू साधून देतोस.आयुष्य धन्य करून देतोस.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..असा तू जो प्रत्येकावर कृपेची छाया धरून प्रत्येकाचं आयुष्य कृतार्थ करणारा,तू माझ्या ही आयुष्याच कल्याण करून हा भवसागर तू तरुन न्हेशील याची खात्री आहे.

समर्थ आपल्या मनातली रामकृपेची आकांक्षा इथे व्यक्त करतात आणि ती व्यक्त करताना रामगुणगान करून ते रामदर्शन आपल्यासाठी खुल करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे)*

🌺
*कोडे नको रे कळहो नको रे..|*
*कापट्य कर्मी सहसा नको रे..|*
*निर्वाणचिंता निरसी अनंता..|*
*शरणागता दे बहु धातमाता..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..आयुष्य असे भक्तीचा सरळ प्रवाह असावे.त्यामध्ये कोणतंही संकट नको.विकल्प नको.त्यामध्ये कोणताही विरोध आणि विरोधाभास नको रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..जगताना व्यवहार करताना छोटामोठा कुटीलपणा,आपमतलबीपणा करावा लागतो तो ही शक्यतो मला करायला लागू नये इतकं निर्मळ आयुष्य मला दे रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मनुष्याला सगळ्यात मोठी चिंता,भय  असते ती मृत्यूची..!त्या मृत्यूच भय वाटावं इतकी मनाची साशंकता,तुझ्या भक्तीबद्दलची अनास्था होऊ देऊ नको रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मी तुला शरण आलो आहे.या शरणागत अवस्थेत तुझी भक्ती हीच मला तरणोपाय आहे.ही भक्ती,ही उपासना करण्यासाठी तुझ्या निर्गुण रूपातील काही कल्पित लीळा आणि तुझे घडलेले मूळ चरित्र याची ओळख मला करून दे रे..!

समर्थ रामरायाकडे आयुष्य सफल आणि भक्तीपूर्ण होण्यासाठी कृपा मागत आहेत.आणि त्यासाठी अखंड शरण्यभक्तीची ही अपेक्षा करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुनाथदासा कल्याण व्हावे..|*
*अती सौख्य व्हावे आनंदवावे..|*
*उद्वेग नासो वर शत्रू नासो..|*
*नानाविळासे मग तो विळासो..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..माझ्यासारख्या रामदासांचे कल्याण व्हावे.जे कल्याण तुझी भक्ती करत तुझ्यात लिन व्हावे,समर्पित व्हावे..एकरूप व्हावे यात आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ही रामकृपा आमच्यासारख्याच सर्वोच्च सुख आहे.इतर कोणत्याही ऐहिक सुखापेक्षा ही कृपा लाभण हे मला सुखासिन जीवनाची आनंदवल्ली वाटते आहे.ती मला मिळू दे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..तुझ्या या आनंदलहरींनी माझ्या मनातली दुश्चित्तता निरसून जावी.माझ्या मनातले शत्रूरूपी विकल्प आहेत ते नाश होऊ देत.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. एकदा तू माझ्या मनाला,तनाला माहिती झालास की मग माझ्या प्रत्येक सुखात,प्रत्येक आनंदात तू सुखवल्ली म्हणून विराजमान हो.म्हणजे हे सुख अक्षय होईल.

समर्थ रामाप्रति असलेल्या कृपेची अपेक्षा रामाला सांगतात. आणि त्या सुखाच्या योगाने प्रत्येक क्षणी,प्रत्येक आनंदात रामाला वसायची विनंती ही करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*देवे दयाळे करुणा करावी.|*
*भक्ताभिमाने भरणी भरावी..|*
*हे रामनामी तरणी तरावी..|*
*दासा समस्ता वरणी वरावी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

देवाधिदेवा..तू दयाळू आहेस.तू कनवाळू आहेस.तू तुझ्या या ब्रिदाला जागून माझ्यावर दया कर.तुझी करुणापूर्ण नजर माझ्याकडे वळवून मला कृपांकीत कर.

समर्थ रामदास म्हणतात..

देवराया..माझं मन हे भक्तीने भरून दे.त्याची क्षणाक्षणाने वृद्धी कर.इतकी की भक्तीशिवाय,तुझ्या उपासनेच्या वृत्ती शिवाय कशालाही या मनात जागा ठेवू नकोस.इतकं मन भारून जाऊ दे.

समर्थ रामदास म्हणतात..

देवराया,रामराया मला अशी बुद्धि दे की तुझं नाम हे अशी नाव होईल जी हा भवसागर सहज पार करून मला पैलतीरावर,तुझ्याकडे घेऊन येईल.इतकं नामाच अधिष्ठान दृढ होऊ दे.

समर्थ रामदास म्हणतात..

देवराया..माझी दास्यभक्ती अजून दृढ करून घे.माझ्या भक्तबुद्धीने तुझ्या पूजनाचा योग मला वारंवार प्राप्त होऊ दे.आणि सर्वांग,सगुण,निर्गुण पूजनाचा संकल्प माझ्याकडून सदा होऊ देत.

समर्थ देवाकडे,रामाकडे अपेक्षा करतात की तुझी भक्ती,तुझं पूजन ही मूलतः सवय होऊ दे.तीच माझी दिनचर्या होऊ दे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सीवर्णा मनाचा विपरीतवाणा..|*
*उदास वाटे बहुसाल प्राणा..|*
*मग राघवा रे तुज वाहिलो रे..|*
*कृपाळूवे सत्वर पाहिलो रे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..भवभयाने जेंव्हा मी गलितगात्र होतो,मनाची अवस्था ही अतिशय विकल होते.जगणं असार होऊ लागते.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..या विपरीत काळामुळे माझी भावनिक,मानसिक अवस्था अतिशय दोलनामय,करुण होऊन जाते.आणि कुशंकीत होऊन जाते.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..ही अवस्था आल्यावर मी तुझ्यासाठी,तुझ्या प्राप्तीसाठी माझ्या साऱ्या इच्छा,आकांक्षा याचा त्याग केला आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा,आता फक्त तुझ्या सत्वर समीप बोलावण्याची,तुझ्या कृपेची मी यथावकाश वाट पहातोय. ही कृपा माझ्यावर करशील याची खात्री आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*ऋषी तापसी योगरासी विळासी..|*
*मनी चिंतिती राम लावण्यरासी..|*
*असंभाव्य त्या कीर्तिच्या किर्तीढाला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट जाला..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

नामात,भक्तीत तल्लीन झालेले भक्त,तपश्चर्येत लिप्त झालेले तापसी,अनेक सत्पुरुष घडवणारे ऋषीजन,हटनिग्रही साधुजन.. आणि त्याबरोबरच संसारात राहिलेले सांसारिक...!

समर्थ रामदास म्हणतात..

हे सारे येनकेन प्रकारे भक्ती,उपासना करून पुण्यसंचय करत आहेत.रामरायांची सगुण आणि मानसपूजा करत आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

या साऱ्यातून अपरिमित अशी कीर्ती पावलेल्या किर्तीनरेशाला,रामरायाला  पाहून,त्याच मनभावन अस दर्शन घेतलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रामप्रभूंना पाहून मन,शरीर,आयुष्य सारे पुलकित झालं आहे.आणि या उत्तम योगाने मी आनंदाची परिसीमा अनुभवतो आहे.

समर्थ त्यांच्यासाहित सगळ्यांच्या चिंतनात,मननात,स्मरणात असलेल्या रामाच्या प्रत्यक्ष दर्शनाने अतिशय आनंद पावलेले आहेत.आणि वरील पाच ओव्यात ते ही भावना व्यक्त करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)*

🌺
*जेणे सोडिल्या देवकोटी अचाटा..|*
*सुखे चालती स्वर्गीच्या स्वर्गवाटा..|*
*प्रतापेचि त्रैलोक्य आनंदवीला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामप्रभु हा सर्वोच्च देव आहे ज्याने सगळ्या देवांना सत्वाचे आदर्श निर्माण करून दिले.आणि त्या सत्वाच्या महिरपीत देवत्व सिद्ध केलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामप्रभुने त्याचे आदर्श दाखवून,त्यावर सज्जन लोकांना स्वर्गलोकीच्या सुखकर वाटा त्यागाने आणि सत्वबुद्धीने सुकर केल्या आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामप्रभुने असुरांशी युद्ध करून,असत्य,असत्व यांचा पराक्रमाने पराभव करून या त्रैलोक्यात आनंदवनभुवन प्रस्थापित केले आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

असा रामरायाचे दर्शन आज  करून मनाचा गाभारा सुखाने भरून जातो.त्यामुळे मनाची,आयुष्याची तृप्तता पूर्ण होते आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

🌺
*दीनानाथ विख्यात हे नाम साजे..|*
*प्रजापाळकू रामराजा विराजे..|*
*बहु सुकृतीचा बरा काळ आला.|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला.||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या रामराजाचे हृदय हे कोमल आणि दयावंत आहे.तो गरीब भक्तांसाठी  त्राता आणि कृपावंत आहे.याची कीर्तीच मुलतः दीनानाथ या नावाने सर्वदूर पसरली आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा रामप्रभू सर्व सृष्टीचा आत्मा ही आहे आणि तो या समग्र सृष्टीचा पालक ही आहे.समस्त सजीवासाठी हा रामराया सर्वहीतदक्ष आणि पालक असा आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामरायांचे असे सुलक्षण दर्शन होणे हा योगायोग निश्चित नाही.किंव्हा ठरवून झाले आहे अस ही नाही.हे सगळं माझं शुचित पूर्वकर्माच फळ म्हणून मला मिळालं आहे.आणि त्यामुळेच मला हे सुखाचे दिवस दिसत आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

असा सुरंजनी रामप्रभू मला माझ्या नजरेने अनुभवता येतोय.मला माझ्या ज्ञानेइंद्रियात साठवता येतोय ह्याने मन अतिशय आनंदित होतय.

समर्थ या पंचवटीच्या काळाराम मंदिरात येऊन दर्शनाने भारावून गेलेले आहेत.आणि तो त्यांचा आनंद त्यांनी या ओवीतून व्यक्त केलेला आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२