समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्त्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तुजवीण सीण झाला धाव रे रामराया.|*
*कठीण दिवस जातो तापली सर्व काया.|*
*सकळ विकळ गात्रे अवस्था लागली रे..|*
*तुजवीण जगदीशा बुद्धि हे भंगली रे..||*

समर्थ म्हणतात..

रामराया..तू तर विश्रामधाम  आहेस..!तू तापत्रयाने पोळलेल्या प्रत्येकासाठी सावलीच प्रेमळ रूप आहेस.तू जोपर्यंत नाहीस तोपर्यंत मन,बुद्धि आणि त्यामुळे शरीर हे कष्टी होत आहे..!

समर्थ म्हणतात..

रामराया..व्यवहार म्हणून दिवसभर मला प्रपंचासाठी अतीव धावाधाव करावी लागते.आणि जोडीला परमार्थ नसल्यामुळे आणि तुझं दुरत्व आसल्यामुळे माझे अस्तित्व अतिशय तप्त,क्षुब्ध असे वाळवंट झाले आहे.

समर्थ म्हणतात..

रामराया..पंचेंद्रियांच्या सुखाचे डोहाळे हे माझा  पिच्छा सोडत नाहीयेत.त्यामुळे जी गात्र तुझ्या संकीर्तनाने,अस्तित्वाने  सुखकारक होणे हे छान असते.ती गात्रे या प्रपंच ओढाताणीमुळे गलीतगात्र होत चालली आहेत.

समर्थ म्हणतात..

रामराया..जगन्नायका तू असलास की बुद्धि,मन हे स्थिर असते.तुझ्या कृपेमुळे,उपासनेमुळे सुखकारक असे जीवन मार्गदर्शन होते.तू नसलास की मनाची अवस्था द्विधा होऊन विकल्प मनात उभे रहातात.तुझ्याविना जगणं हे सुसह्य होत नाही रे..!

समर्थ रामरायासाठी व्याकुळ असताना मन,शरीराची विकल्पि अवस्था वर्णन करतात.आणि तो विकल्प नष्ट होण्यासाठी जीवनात *राम* येणं महत्वाचं आहे हे ही समजावतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुनाथपदयुग्मि लिन भावे असावे..|*
*रविकुळटिळकाचे नाम वाचे वसावे.|*
*श्रवणमनन भावे आदरेसी करावे..|*
*परम सुख समाधी संतसंगे तरावे.||*

समर्थ म्हणतात..

श्रीरामाचे चरण हे निशांत मुक्तीस्थळ.दोन चरणांचा हा दृढ ठेवा.ह्याच्याशी सदा नम्रतेने पूजनांकित असावे.इथे सर्व आशा अर्पण करून केवळ रामकृपेचा ध्यास असावा.

समर्थ म्हणतात..

या सूर्यवंशी भूषण अशा रामरायाचे नामजप,नामसंकीर्तन हे प्रत्येकाने आपल्या वाचामुखी सर्वकाळ बोलावे.त्याचे वास्तव्य कायमच आपल्या पंचेंद्रियांत असावे.

समर्थ म्हणतात..

या रघुराजांचे चरित्र हे पर्वणी आहे.तो एक आनंदअनुभव आहे.तृप्त करणारी एक संजीवनी आहे.त्याचे श्रवण मनन हे एक आदरयुक्त असे यजन आहे.जे भावभक्ती ने प्रत्येकाने करावे.

समर्थ म्हणतात..

या साऱ्या संकीर्तन,मनन,जपध्यानाने  निःसंग समाधी आपोआपच प्राप्त होते.जी सुखांत निर्माण करणारी असते.याबरोबरच  संतसंगतीने त्या समाधीमध्ये अमूर्त पण पूर्ण चैतन्यमयी अशा व्यक्ततेची भर पडते.

समर्थांनी रामरायांची एक दृढ आणि स्वरूप,सुखदायी अशी प्रतिमा इथे वर्णन केली आहे.आणि त्या प्रतिमेच्या सगुण आणि निर्गुण दर्शनाने मिळणारी फलश्रुती सांगितलेली आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ अनाथबंधु.|*
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ करुणाएकसिंधू.|*
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ कोदंडधारी.|*
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ लीळावतारी..||*

समर्थ म्हणतात..

त्रैलोक्य हे सर्वभूतांचे वसतिस्थान.तिथे स्वामी असणारे रघुराज.हे रघुराज या सर्व लोकातल्या चराचराचे,नश्वरांचे,प्रत्येक ऋणानुबंधाचे, प्रत्येक एकल आयुष्याचे साक्षी आणि सहकारी आहेत.

समर्थ म्हणतात..

या त्रैलोक्यातील रघुराजांचे अस्तित्व हे सर्व  मानवजातीला,प्राणिमात्रांना,आशादायक असे वात्सल्यपूर्ण करुणेचा स्त्रोत्र आहेत.हे एक करुणेचा निरंतर अक्षय सागर आहेत.

समर्थ म्हणतात..

त्रैलोक्य व्यापून उरलेले हे रघुनाथाचे स्वरूप तापत्रयी,तसेच भवसागरातील संकटे,विघ्ने यांचे निर्दालन करण्यासाठी कोदंड स्वरूपाची शक्ती हाती बाळगून आहे.

समर्थ म्हणतात..

त्रैलोक्यनिवासी अशा विष्णूच्या सप्तम अवतारातील अवतारीत अशा या दैवताच्या अगम्य पण सूचित,सुलक्षणी लीळा या समस्त ब्रह्मांडासाठी एकमेव आणि अद्वितीय आशा आहेत.

समर्थ रामराजाचे अतिभव्य असे रूप इथे प्रकट करतात.राम हा केवळ वर्णनाने अनुभवण्यापेक्षा तो स्वतः जेंव्हा प्राचितीने अनुभव देतो तेंव्हा आपल्याला वर्णनात्मक हे कौतुक कमी पडते.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्तोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

*रघुपतीतनूरंगे रंगली नीळशोभा..|*
*रघुपतीरूपयोगे सर्वलावण्यगाभा.|*
*रघुपतीगुणगंधे धैर्य गांभीर्य लोकी..|*
*रघुपति मम चित्तीं बैसला येकनेकी..||*

समर्थ म्हणतात...

हे विश्व राममय आहे.रामरायांच्या निळ्या,सावळ्या कांतीने या गगनाला निळ्या रंगाचे अस्तित्व आले.हे निळे गगन गहन आणि सूनयन झाले केवळ रामरायांच्या अस्तित्वामुळे..!

समर्थ म्हणतात...

रामरायाची तेजल आभा,त्याच सहजसुंदर दर्शन,त्याच मनोहरी सौष्ठव या मुळे विश्वात पौरुष सौंदर्याचा आदर्श सृष्टीत निर्माण झाला.सुखकारी अस हे दर्शन अंतिम सुखाचा विसावा आहे.

समर्थ म्हणतात..

रामरायांचे अनुपम गुण एकबाणी, एकवचनी,एकव्रती,धैर्यव्रती असे अनेक.अशा साऱ्या गुणांमुळे समाजात  चांगुलपणा,सृजनता यांची जोमाने वाढ झाली.हे सारे गुण भूषणावह ठरले.ते एकमेव,अद्वितीय ठरू लागले..!ह्या साऱ्या चांगल्या गुणांचे मनुष्यप्राणी  अस्तित्व जपू लागले.

समर्थ म्हणतात...

असा एकमेव,एकद्वितीय रामराजा माझ्या मनात वास करून आहे.अनेक अशा उत्तम चारित्र्यवान देव,संतामधून त्याचे अस्तित्व वेगळे,मनोहारी असे मला जाणवते.आणि त्याचीच उपासना मी मनोभावे करतो.

श्रीरामांच वर्णन समर्थ करतात.सहजसुंदर अस्तित्व समजावून सांगतात..!जे त्यांना मनातून जाणवत.जे त्यांच्या उपासनेत त्यांना गवसत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्तोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व.*
*अपरिचित करुणास्रोत्रे.*

🌺
*दिनकरकुळवल्ली लोटली अंगभारे..|*
*रघुविरअवतारे दाटली थोरथोरे..|*
*सुखरूप सुखवासी राहिले योगरासीं.|*
*सफळ सितळ छाया फावली रामदासी..||*

समर्थ म्हणतात...

सूर्यवंश हा अपरिमित सुख देणारा वंश.सामाजिक,मानसिक,भावनिक,पारमार्थिक असा प्रत्येक पातळीवर सुख देणारा हा वंश.. जो पृथ्वी सुजलाम,सफलाम करतो..!
ब्रम्हांडापर्यंत हा वंशवेल विस्तारला आहे.(अर्थात सारे त्याचेच वंशज आहेत.)

समर्थ म्हणतात..

रघुराजासारखे नरपुंगवी अवतार..अनेक शक्तीयुक्त अवतार... म्हणजे चक्रवर्ती राजे..!अनेक भक्तीयुक्त अवतार..म्हणजे संत..!या सुर्यवंशाचे देणे आहेत.

समर्थ म्हणतात..

जे जे मनुष्य,प्राणी या वंशाच्या आसऱ्याला गेले. त्याच्या अस्तित्वामुळे वाढले.फुलले.सारे सुखवंत होऊन गेले.

समर्थ म्हणतात..

तेच सुख...!!!आम्ही मिळवलं आहे..!त्यासाठी आम्ही आमची उपासना करून सुर्यवंशातील अवतारीत नरोत्तमाना अर्पण केली आहे.अर्थात त्या छायेखाली आम्ही रामदास कृतार्थ झालो आहोत.

समर्थ सुर्यवंशाचे महिमामंडण करत आहेत.रघुराजाचा हा वंश किती विस्तारला आहे.युगानूयुगे हा सूर्यवंश सृष्टीचे कल्याणच करत आला आहे.आम्हीही रामदासी होऊन त्यांच वंशाच्या छत्रछायेखाली स्वतःचे आयुष्य कारणी लावले आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्तोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे.*

🌺
*पळपळ चळताहे बाळ तारुण्य देही.|*
*तळमळ विषयांची नेणवे हीत काही.|*
*लळलळ गरळा तो काळ लाळीत आहे..|*
*जळजळ शितळा हे भक्तीसेऊनी राहे..||*

समर्थ म्हणतात ..

क्षणाक्षणाने वाढणारे बालक जेंव्हा तरुण होते.देहात उर्मी,चेतना,बळ हे साठू लागते.त्याचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व त्याला आणि समाजाला प्रतीत होऊ लागते.प्रारब्ध आणि संचित याचा योग्य मेळ घालायची ही वेळ म्हणजे क्षणाक्षणाने तयार होणारे तरुणपण.

समर्थ म्हणतात...

या तारुण्यात सगळ्याबरोबर अजून एक भावना वाढते ती म्हणजे विषयवासना.ही विषयवासना तारुण्यसुलभ नक्कीच आहे.पण त्याने भविष्यकालीन आयुष्याचे हीत नक्कीच होत नाही.आणि हे हित होत नाहीये हे तारुण्याच्या उर्मीत जाणवत नाही.

समर्थ म्हणतात..

काळ नावाचा एक विषसर्प आयुष्यातले क्षण या विषयसुखाच्या साथीने मनुष्याचा सत्वधर्म,निश्चलता  कुश्चीळ करत असतो,विषारी करत असतो.

समर्थ म्हणतात...

ही काळाने विषयसुखाच्या साथीने निर्माण केलेली स्वार्थी गरळ, तिचा पुण्यक्षयी,आयुष्यघातकी प्रभाव कमी करायचा असेल,नष्ट करायचा असेल तर भक्ती नावाचे अमृत आपण ग्रहण आणि मनात साठवायला शिकल पाहिजे..!हीच भक्ती या कळीकाळ निर्मित हे हलाहल निववू शकते,शांत करू शकते.

समर्थ आयुष्याचा सुवर्णकाळ म्हणजे तारुण्य.या काळात निर्माण होणाऱ्या,मतीक्षय,पुण्यक्षय करणाऱ्या विषयसुखाच्या सुंदर पण प्रारब्धाच्या दृष्टीने काहीवेळा घातकी ठरणाऱ्या संकटाची जाणीव आपल्याला करून देत आहेत.आणि त्यावर उत्तम उपाय म्हणून भक्ती,उपासनेचा उपचार ही आपल्याला सांगत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्तोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तरुणपण देहाचे लोपता वेळ नाही.|*
*तनमनधन अंती वोसरे सर्व काही.|*
*सकळ जन बुडाले व्यर्थ मायाप्रवाही..|*
*झडकरी सुमना रे हित शोधूनी पाही.||*

समर्थ म्हणतात..

देहाला तारूण्य मिळणं हा  निसर्गक्रम आहे.ती दैव देणगी आहे.या काळात सौष्ठव मिळत.गात्र शाक्त होतात.विषयसुख ज्ञान होत.पण आयुष्याची कालगणना केली तर खुपच हे सारं थोड्या काळासाठी असत.

समर्थ म्हणतात...

शरीराचे सौष्ठव व आकृतिबंध,मनाचा विषयसुखाकडे ओघ,ऐश्वर्य  संघटित करायचं कसब आणि उचित काळ हे हळूहळू उभारीला येत जरूर पण संपत जात.उतरत जात.

समर्थ म्हणतात..

सामान्य जन जे या साऱ्या गोष्टींना चिटकून असतात,ते सदोदित या साऱ्या मागे धावत असतात.हे सारे टिकवायचा निरार्थक प्रयत्न करत असतात.आणि हे करता करता स्वतःला निरिच्छ करण्याच्या ऐवजी लिप्त होत आकंठ बुडून जातात..!

समर्थ म्हणतात..

अशा वेळी आपलं मन आहे जे मूलतः सद्गुणी आहे.ईश्वरसंगाच माध्यम आहे.त्याला स्मरून,त्याच मूळ हीत जाणून यथावकाश आपण त्याला कायमच सुखांकीत करण,करायला लावणं हे आपलं कर्तव्य आहे.

समर्थ मनुष्यजन्मातील सुखाच्या काळाच मूल्यमापन करून त्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देतात.आणि हितकारी अशा मनाचा मागोवा घेत सत्यसुख शोधायची अपेक्षा करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (करुणास्रोत्रे संकीर्ण)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*करुणास्रोत्रे संकीर्ण*

🌺
*चतुरपण जनी हे पाहता आढळेना.|*
*निकट रघुविराचे रूप कैसे कळेना.|*
*चपळमन वळेना गर्वताठा गळेना..|*
*तुजवीण जगदीशा कर्मरेखा टळेना..||*

समर्थ म्हणतात..

मनुष्याकडे जी उपजत भक्तबुद्धी यायला पाहिजे ती बुद्धि माझ्याकडे नाहीये.ते शहाणपण मला माझ्या आयुष्यात आत्मसात करता येत नाहीये.

समर्थ म्हणतात..

सदा सर्वदा कायम माझा सखा,सोबती,चालक,मालक असलेला रामराय इतका जवळ असून ही त्याचे पूर्ण,खरे निर्गुण रूप अजूनही आम्हाला कळत नाहीये..!

समर्थ म्हणतात...

हा रामराया मला पूर्ण कळावा अशी माझीही इच्छा आहे.पण मनाचा चंचलपणा आणि मनातला मी पणाचा गर्व हा कायम रामरायांच्या सख्यतेच्या आड येतोय.

समर्थ म्हणतात...

जोपर्यंत हा जगनियंता मला मिळत नाही..त्याचे सुस्वरूप कळत नाही.जोपर्यंत तो आणि मी वेगळे राहू,आम्ही एकसंग होत नाही तोपर्यंत माझे कर्मभोग माझी पाठ सोडणार नाहीत.मला त्याच चक्रात पुन्हा पुन्हा फिरावं लागेल.

समर्थ रघुवीराचे,परमेश्वराचे स्वतःच्या आणि समस्त मानवांच्या आयुष्यातील स्थानाचे महत्व विशद करून सांगतात.आणि जोपर्यंत त्याची कृपा,त्याची साथ मिळत नाही तोपर्यंत आपली विवशता ही ते सढळ मान्य करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (करुणास्त्रोत्रे संकीर्ण)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*करुणास्रोत्रे* *संकीर्ण*

*रघुविरभजनाची मानसी प्रीति लागो..|*
*रघुवीरस्मरणाची अंतरी वृत्ती जागो..|*
*रघुवीरचरणांची वासना वास मागो..|*
*रघुवीरगुण गाता वाणी ही नित्य रंगो..||१||*

समर्थ म्हणतात..

रघुराजाच संकीर्तन हे मनाची लागलेली गोडी आहे.त्याबद्दलच प्रेम,आसक्ती अशीच राहो त्यात निरंतर वृद्धी होवो.

समर्थ म्हणतात..

रघुराजाच स्मरण हे एक चैतन्य आणणारा स्रोत आहे.तो अंतरी बाळगायची इच्छा आहे.हीच वृत्ती जागती राहो.आणि वाढती ही राहो.

समर्थ म्हणतात..

रघुराजाचे चरण हा एक रम्य असा शुद्ध हव्यास आहे.आणि त्या चरणाशी एकनिष्ठ राहून आयुष्य व्यतीत करणे ही इच्छा..!त्या चरणाचा नित्य सहवास मागावा..!

समर्थ म्हणतात...

रघुराजाच सुनीत संकीर्तन  वर्णन करणं,गायन करणं हे नित्य वाणीची,मनाची शुद्धी आहे.आणि ह्यातच रंगून आयुष्य कृतार्थ करायची सवय ही मनाला लागावी.

समर्थ रघुवीर भजनाची निकड समाजवून सांगताना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी रघुवीरसंकीर्तन कसे असावे याची ही अपेक्षा समजावून सांगतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्त्यांचे साहित्यविश्व (अभंग ९)(भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ९*

*भाग २*

*मज सर्वस्वे पाळावे.|*
*प्रतीतीने सांभाळावे.||१||*
*माझी वाईट करणी.*
*रामदास लोटांगणी.||२||*

समर्थ म्हणतात..

रघुराजा...तू मन,शरीर सारे जन्माला घातलेस..!त्यांना निश्चित असे कार्य दिलेस.पंचेंद्रियांना जाणीव दिलीस.ज्ञानेंद्रियांना ज्ञान दिलेस.आता तू या सगळ्यांच ममतेने पालन  कर..!

समर्थ म्हणतात...

हे सगळं आता निश्चित तुझं आहे.तुझ्या संकीर्तनात,तुझ्या पूजनातच  नित्य आहे.आता तूच याचा निश्चित सांभाळ करशील अशी अपेक्षा आहे..!

समर्थ म्हणतात..

तू समवेत असून सुद्धा माझ्या स्वार्थ बुद्धीने मी अनेक वेळा परमार्थात त्रास होईल अशी कामें करतो.चुका करतो.अन्याय करतो.

समर्थ म्हणतात...

या सगळ्याच निराकरण तुझ्या चरणाशीच होईल.हे मी जाणून आहे.म्हणून साष्टांग प्रणिपात करतो. तुझे चरण हेच माझे मुक्तीस्थान आहे.

समर्थ स्वतःची मनमोकळी भूमिका रामरायांचे पुढे मांडतात.जशी भक्ती ही स्वीकार करा असा धावा करतात तसाच झालेल्या ज्ञात,अज्ञात चुकेसाठी क्षमायाचनाही करतात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच साहित्यविश्व (अभंग ९)(भाग१)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ९*

*भाग १*

*अपराधी अपराधी..|*
*आम्हा नाही दृढ बुद्धि.||१||*

*माझे अन्याय अगणित.|*
*कोण करेल गणित..?||२||*

समर्थ म्हणतात...

आम्ही अगणित अशा चुका करतो.मानसिक,सामाजिक,वागणुकीमध्ये.काही आम्हाला कळतात..काही कळत नाहीत.काहिकडे दुर्लक्ष ही होते.

समर्थ म्हणतात...

हे सारे आमच्या मूढपणा मुळे होत.कोणतंही भान आम्हाला राखता येत नाही कारण स्वमग्नते मध्ये मन कायम गुंतलेले असत.अशा ने बुद्धि दृढ रहात नाही.उलट कोती होते.

समर्थ म्हणतात..

या माझ्या मूढ बुद्धीमुळे चुका तर अमाप होतात.या चुका दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत चुकीचे ग्रह,एखाद्या प्रसंगाबाबतीत,घटनेबाबतीत त्यातल मर्म न लक्षात येणं यामुळे आमच्या चुका वाढतच चालल्यात.

समर्थ म्हणतात...

या माझ्या दुर्गुणाची परीक्षा करण्यासाठी एक सगुणी व्यक्ती पाहिजे.जी कठोरपणे माझं मूल्यमापन करेल.मला माझ्यातल्या  चुकांच अस्तित्व दाखवून देईल.

समर्थ एका अशा आदर्श व्यक्तीची जीवनात  आवश्यकता आपल्याला सांगतात जो आपली स्वभावशुद्धी,आचरणशुद्धी करून देईल.समर्थ आपल्याला अशी व्यक्ती म्हणून निस्पृह गुरुकडे अंगुलीनिर्देश करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ८) (भाग ३)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ८*

*भाग ३*

*तोवरी तोवरी धीरत्वाची मात..*
*प्रपंची आघात झाली नाही.||५||*

*रामदास म्हणे अवघेची गाबाळी.|*
*ऐसा विरळा बळी धैर्यवंत..||६||*

समर्थ म्हणतात..

मनुष्य तोपर्यंत धीर वगैरेंच्या गोष्टी करतो.सहनशीलता,शांतता,संसारखेळ यांची महती गातो.

जोपर्यंत त्याच्या स्वतःच्या आयुष्यात,प्रपंचात संकट येत नाही.अपेक्षेप्रमाणे नाही घडलं तर निराशा येत नाही.जोपर्यंत नाती गोती त्याच्या वैयक्तिक अपेक्षा पूर्ण करत नाहीत.

समर्थ म्हणतात...

इथं या संसारचिंतेत गुरफटलेले,गळफटलेले कधीकधी मनात नसून सुदधा अडकलेले.प्रपंच, जगरहाटी ने त्रस्त असे सगळेच गबाळपंथी आहेत.

असा एखादाच निरक्षीर बुद्धीचा,विवेकी,प्रपंच आणि परमार्थ यांची नेमकी सुवर्णरेश माहीत असलेला धर्मप्रवृत्त माणूस असतो जो या साऱ्यातून तरुन भगवंतप्राप्ती,मोक्षप्राप्ती करून घेऊ शकतो.

समर्थांनी संसारी मनुष्यांचे पूर्ण सत्य सांगताना त्यातले वर्म ही बोट दाखवून वर्णन केले आहे.एकप्रकारचा बेरकीपणा प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यात वापरतो.आणि जेंव्हा हा बेरकीपणा उघडकीला येऊन संसारातील वस्तुस्थिती प्रकट होते तेंव्हा तो परमार्थाची कास धरतो.तोपर्यंत नाही.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ८)(भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ८*

*भाग २*

*तोवरी तोवरी अत्यंत सद्भाव..|*
*विशेषे वैभव आले नाही..||३||*

*तोवरी तोवरी सांगे निराभिमान..|*
*देहाशी अभिमान आला नाही..||४||*

समर्थ म्हणतात...

मनुष्य सद्भावाचा पुतळा असतो,तो सगुणाचे गुण गात असतोतोपर्यंत तो मनुष्य केवळ आणि केवळ सरळ,साधा असतो.


जोपर्यंत त्याच्याकडे इतरांच्या पेक्षा जास्त, उल्लेखनीय धन,श्रीमंती,मानमरातब येत नाही.तो इतरांच्या पेक्षा जास्त काही कमवत नाही.मिळवत नाही तोपर्यंत.

समर्थ म्हणतात...

मनुष्य तोपर्यंत गर्वहरणाचे,निस्पृहते चे गोडवे इतरांसाठी गातो.त्याची महती त्याच्या तोंडात असते.

जोपर्यंत त्याच्या मनात स्वतःच्या शरीराबद्दल ममत्व निर्माण होत नाही.स्वतःच्या अस्तित्वाबद्दल त्याला अभिमान होत नाही.

समर्थांनी मनुष्याच्या स्वभावाचे चूक असणारे बारकावे हेरून त्यावर सुधारणा करण्यासाठी या अभंगात टीका केली आहे.त्यायोगे मनुष्य आपल्यात सुधारणा करू शकेल.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२