समर्थांची करुणाष्टके (८) कडवे पाहिले..

समर्थांची करुणाष्टके (८)

कडवे पाहिले..

समर्थ म्हणतात..

तुझिया वियोगे जीवित्व आले..
शरीरपांगे बहु दुःख झाले..
अज्ञान दारिद्रय माझे सरेना..
तुजवीण रामा मज कंठवेना..!

रामराया..श्वासाशिवाय जगणं असत का रे..?भक्तीशिवाय परमार्थ ही नसतो..!पण माझ्या सध्याच्या या आयुष्यकाळात तुझ्याशिवाय जगणं आलंय. तूझ्या दुरत्वात सुद्धा मला जगण्याचा अट्टाहास करायला लागतोय..!

रामराया..तुझ्या या दुरत्वामुळे मला शरीराच्या,मनाच्या अस्तित्वात काही तरी कमी आहे,त्यात काहीतरी वैगुण्य आहे अस जाणवू लागल आहे.अर्थात त्यात राम नाही हे पटू लागलं आहे..!

रामराया..आर्थिक,शाररिक,ऐहिक दारिद्र्याची चिंता नाही..पण भक्ती वैगुण्यामुळे येणाऱ्या मानसिक दारिद्र्याची खंत मात्र माझ्या मनात अतिशय जागती आहे..आणि दिवसेंदिवस ती वाढती आहे..!

रामराया..ही सगळी माझी अवस्था तुला ज्ञात आहेच पण त्याप्रमाणेच मला तुझ्याशिवाय कुठेही करमत नाही,जीव लागत नाहीये हे सुद्धा माहीत आहे ना..?

समर्थ मनुष्याच्या आयुष्यात रामरूपी परमार्थ नसेल तर काय घडते याच वर्णन या कडव्यात करतायत.प्रत्येक कार्यात,आचरणात राम असावा आणि तो जागता ठेवावा अस समर्थ म्हणतात.आणि तो नसेल तर जगणं,व्यवहार,प्रपंच,परमार्थ हे सगळं व्यर्थ आहे,वैगुण्यपूर्ण आहे..रामरुपाशिवाय आपलं अस्तित्व अपंग आहे हे समर्थ सांगताना रामरायाला त्याच्या वियोगाची परिणीती ही रामसमोरच कथन करतायत..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

जागतिक पर्यावरण दिन.. समर्थांची निसर्गपूजा

जागतिक पर्यावरण दिन..

समर्थांची निसर्गपूजा

समर्थ म्हणतात..

पसरले सरले गिरी साजरे।
सरवटे धुकटे भरितें भरें।
बहुत वात झडांत झडाडितो।
वर तरू वरता चि कडाडितो।।

शब्दांची सुंदर बरसात.समर्थ शब्द देतात तो फक्त यथार्थ देतात.निसर्गाची असीम व्याप्ती हा दऱ्याखोऱ्या अनुभवलेला संत मनस्वीपणे सांगतो.
उंच डोंगरमाथ्यावर उभारून क्षितिजाकडे बघताना समर्थांनी त्याच केलेलं वर्णन.. लांबपर्यंत पसरलेल्या डोंगररांगा या आपल्याला त्यांच्या पलीकडे क्षितिजापर्यंत कल्पनाशक्ती जाईल,पोहचेल इथपर्यंत घेऊन जातात.निसर्गात बाष्प आणि ऊन या दोन्हीमुळे येणारी धुसरता या डोंगरमाथ्याला सलगी धरून आहेत.अत्यंत सखोल लिहिणारे समर्थ माणसाची संकल्पशक्ती,आकलनशक्ती आणि त्यावर येणारे तात्कालिक मानसिक शैथिल्य या धुक्याच्या रूपाने वर्णन करतात.अशावेळी या निसर्गाच्या कुशीत चैतन्यरुपी वारा खेळू लागतो.निसर्गदेवतेच्या प्रतिकात प्राण खेळू लागतो.आकाशातून या निसर्गदेवतेवर विजेचा त्या वाऱ्याच्या आरोह अवरोहावर मंत्ररूपी घोष चालू होतो...!

झिरपती झरती झरती झरे।
न धरितां धरता निर वावरे।
बहुत पाभळ वोघ महीतळी।
नभकटे धुकटे कटपाभळी।।

आहाहा..ही एकदा निसर्गपूजा चालू की त्यावर अभिषेक चालू होतो.त्या निसर्गदेवतेच्या अंगोपांगावरून हे पाणी खळाळत या निसर्गपुरुषाच्या पायाशी खेळू लागत.मनरुपी निसर्गाच असच होत असेल ना??एकदा उपासनेचा अभिषेक चालू झाला की सार अंगोपांग,मन तीर्थ होऊन जातं.आणि या तीर्थाची जागा एकच आपल्या आयुष्याची कृतार्थता..तसेच निसर्गात या जलाभिषेकाची अंतिम जागा एकच तृषार्त भूमी..!

सरस रम्य रसाळ वनांतरा।
हरित रंग सुरंग दिसे बरा।
दिसतसे रमणीय वसुंधरा।
नुतन पल्लव हा तरु साजिरा।।

निसर्गपुरुषाच्या या पूजेच  पूर्वांग झालं की त्यावर वस्त्रपूजा चालू होते.हिरवीगार मखमली वस्त्रे त्यावर नुकत्याच वर्षलेले जलमोती.रसाळ,अतिशय कोमल दिसणारी ही वसुंधरा ही निसर्गपूजेच एक सुंदर,मनमोहक रूप दाखवून जाते.पत्रपूजा आरंभुन ही निसगदेवता स्वतःला अजूनच स्पृहल करून घेते..!

दृम लता समता तृण मातले।
सुख मनीं सुमनीं मन रातलें।
परम सुंदर ते खग बोलती।
गमतसें वसती कमळापती।।

या निसर्गपूजेचा पुढचा विधी हा आभूषणांचा..असंख्य वेली, विविध गवतपात्यांची आसने, रंगीत पुष्पांचे मनभावन दागिने भोवती मलंग पक्ष्यांची कोमल गान,आरतीसेवा..या सगळ्यामध्ये विराजमान झालेला तो निसर्गपुरुष..शेषशायी विष्णुसारखा..!!

विमळ सूसिळ तें स्थळ पाहतां।
सुख विशेष घडे पळ राहतां।
वरदराज विराजतसें वनीं।
विनटला नटला रत सज्जनी।।

असा हा सोहळा.पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.क्षणभर ती निसर्गदेवता ज्यात माझा देव मी पाहतो त्याच्या छायेत,पायाशी मी बसलो तरी मन आनंदित कृतार्थ होऊन जाते. सर्व जगनियंता असा हा निसर्गदेव असा जेंव्हा या ऋतूत सिहासनाधिष होतो.तेंव्हा त्याच्या पूजेचा,मानसपूजा करायचा मोह माझ्या शुद्ध भावनेला नेहमीच होतो..!

समर्थ लिहितात तेंव्हा वर्णन जगतात.त्यांची भाषा ही नेहमीच गूढ असते.या निसर्गपूजेचा,वर्णनाचा आधार घेऊन समर्थ आपल्याकडून अलगद पणे निसर्गदेवतेची मानसपूजा करून घेतात.
हीच समर्थांची शब्दपूजा..समर्थपुजा..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (७) कडवे पाचवे..

समर्थांची करुणाष्टके (७)

कडवे पाचवे..

समर्थ म्हणतात..

म्हणे दास उदास झालो दयाळा..
जनी वेर्थ संसार हा वायचाळा..
तुझा मी तुला पूसतो सर्वभावें..
रघुनायका काय कैसे करावे..!

रामराया..तुझी कृपा आहे म्हणून माझे श्वास,आयुष्य,व्यवहार,प्रपंच चालू आहे.पण मला तुझ्या कृपेच पूर्णत्व पाहिजे.संपूर्ण लीनता पाहिजे.अशा अर्धकृपेमुळे मी उदास होतोय..निराश होतोय..!

रामराया..माझी प्रत्येक कृती,प्रत्येक हालचाल,प्रत्येक कल्पना ही तुझ्या सकृत दर्शनाशिवाय  वायफळ वाटतीये.अर्थहीन वाटतेय..!

रामराया..तुझा आहे ना मी??तू माझा त्राता आहेस ना??तुझ्याशिवाय मी कुणाला विचारणार..?तुझ्याशिवाय मी कुणाजवळ व्यक्त होणार..?

रामराया..याच हक्काने विचारतोय.. सांग ना..मी काय केले म्हणजे माझी भक्ती,उपासना फलद्रुप होईल.तुझं सुमंगल साकार  दर्शन होईल..?

समर्थ विविध भक्तीच्या प्रकारातील सख्य भक्तीचा इथे उल्लेख करून रामरायाकडे आतिशय हृद्य असे आवाहन करतायत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (७) कडवे चौथे..

समर्थांची करुणाष्टके (७)

कडवे चौथे..

समर्थ म्हणतात..

विचारे तरी अंतरी कोंड होतो..
शरीरास तो हेत सांडून जातो..
उपाधीस देखोनि वाटे सरावें..
रघुनायका काय कैसे करावे..!

रामराया.. खूप विचार करतोय.सगळ्या पद्धतीने माझी उपासना परिपूर्ण होण्यासाठी मी माझ्याभोवती असणाऱ्या अनेक ऐहिक भावनांना बाजूला करतोय.त्यासाठी लागणारा अट्टाहास, विचार करतोय.अशा सगळ्या विचारांचा एकप्रकारचा कोलाहल मनात चालू आहे.

रामराया..या सगळ्या मानसिक गोंधळामध्ये मी माझ्या जगण्याचा हेतू हा तुझी प्राप्ती आहे,हे विसरून जाईन की काय या साशंक मनाने वावरतोय..!

रामराया..या माझ्या जगण्यात तुझ्या दर्शन,प्राप्तीच्या मध्ये कोणतीही भावनिक,सामाजिक उपाधी जडू नये यासाठी आतिशय सावध माझी वाटचाल करतोय..!

रामराया..सांग ना?मी करतोय, आचरण करतोय हे सगळं बरोबर करतोय ना..?का हे तुझी प्राप्ती होण्यासाठी तू मला आणि काही सुचवू पहातोयस..?

समर्थ उपासना आणि  त्यासाठी स्वगुण परीक्षा याची उत्तम सांगड घालून परमेश्वर यथोचित दर्शनाची वाट सुकर करू पहात आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (७) कडवे तिसरे..

समर्थांची करुणाष्टके (७)

कडवे तिसरे..

समर्थ म्हणतात..

अवस्था परी होय नाना परीची..
किती काय सांगो गती अंतरीची..
विवेकेचि या मानसा आवरावे..
रघुनायका काय कैसे करावे..!

रामराया..खर सांगू..?मनाच्या अवस्था इतक्या वेगवेगळ्या होत चालल्यात कधी आनंद,कधी दुःख,कधी पश्चात्ताप,कधी अभिमान अश्या सगळ्या अवस्थातून मनाचा फेरा हा स्वतःचे हीत शोधू पहातोय..!

रामराया..या सगळ्यात मनाची अंतरिम स्थिती वेगळीच जाणवतीये..!ती कुणाला सांगू ही शकत नाहीये.वर तुझ्यापाशी व्यक्त केलेल्या प्रत्येक भावविश्वातून रंगून सुद्धा एकप्रकारचा एकटेपणा जाणवतोय.

रामराया..तूच आता तुला प्राप्त असलेली सारासार विवेकबुद्धी माझ्या मनातही  जागी करून मला या भावकल्लोळातून तुझ्या मार्गावर आणशील ना..?

रामराया..हे सगळं साधण्यासाठी,यातलं गौप्यगुह्य अस भक्तीशास्त्र कळण्यासाठी मी काय करावे हे तू सांग ना..?

समर्थांच्या वाणीला एकप्रकारची चौकस पण अतिविश्वासु अशी बैठक आहे.श्रद्धा आहे..!त्या श्रद्धेतून समर्थ रामाकडे मार्गदर्शन मागतयात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (७) कडवे दुसरे...

समर्थांची करुणाष्टके (७)

कडवे दुसरे...

समर्थ म्हणतात..

जनी बोलता चालता वीट वाटे..
नसे अंतरी स्वस्थ कोठे न कंठे..
घडीने घडी चित्त किती धरावे..
रघुनायका काय कैसे करावे..?

रामराया..माणूस म्हणून जन्माला घातलंस खर तू..पण त्या माणसांपासून,समूहापासून एक प्रकारची निरिच्छता येऊ लागली आहे.त्यांच्याशी वार्तालाप करण्यापेक्षा मला स्वतः स्वस्थ,एकट राहावं वाटू लागलं आहे..!

रामराया..पण ही स्वस्थता या भौतिक जगात राहून  मला अनुभवताना माझ्या तुझ्याबद्दल असलेल्या ओढीमुळे एकप्रकारची उदासीनता आली आहे.त्यामुळे कुठेच चैन पडेनास झालं आहे.आयुष्य बेचव होऊ लागलं आहे..!

रामराया..प्रत्येकवेळी माझं मन मी ओढून तुझ्या उपासनेत,तुझ्या चरणाशी आणून ठेवायचा प्रयत्न करतोय.माझं चित्त हे तुझ्या सुमुख दर्शनात,उपासनेत गुंतून ठेवायचा प्रयत्न मी किती वेळा करू..?

रामराया..सांग ना..?इतक्या द्विधा मनअवस्थेतून तुझ्याशी एकसंध भक्तीचा संग मी कसा करू..?

समर्थ दिवसेंदिवस विजनवासाच्या अवस्थेत येणाऱ्या मानसिक आरोह,अवरोहाच्या निरनिराळ्या अवस्था समजवून सांगताना त्यातून तरुन जाण्यासाठी  रामरायाला मित्रसाक्षी ठेवत  आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (७) कडवे पाहिले.

समर्थांची करुणाष्टके (७)

कडवे पाहिले.

समर्थ म्हणतात...

उदासीन हा काळ जातो गमेना..
सदा सर्वदा थोर चिंता शमेना..
उठे मानसी सर्व सांडूनि जावे...
रघुनायका काय कैसे करावे..?

रामराया..आयुष्य खर म्हणजे तुला वाहिलेल.पण तुझ्याच भक्तीत,उपासनेत राहूनही मी तुझ्या समीप,एकरूप होऊ शकत नाहीये त्यामुळे आयुष्य निरस वाटू लागलंय आणि जगणं ही..!

रामराया..माझी उपासना ही व्यवस्थित मार्गावर आहे की नाही.तुझी कृपा होईल इतपत फलद्रुप होईल की नाही..?माझ्या हातून पारमार्थिक प्रमाद घडत नाही ना?अशा अनेक चिंता मनात उत्पन्न होतायत..आणि त्याचा परिहार होत नाहीये..!

रामराया..अशा वेळी उद्वेगाने,अनेकवेळा वाटत की हे सगळे प्रयत्न सोडून द्यावे..विदेही व्हावं,अज्ञात स्थळी गमन करावं.जिथे कोणताही संपर्क नको.विजनवास स्वीकारावा..!

रामराया..सांग बर..तुझ्याशिवाय मी कुणाकडे सल्ला मागणार नाही..तूच माझ्या आयुष्याचा कर्ताकरविता आहेस.मग तूच मला समजाव..!

समर्थ उपासना मार्गातला,  मानवी जीवनाचा अजून एक भाव उलगडून सांगतात.उद्वेग.जगणं नकोस होणं.ही अवस्था अर्थात रामरायाप्रति असलेल्या ओढीची अंतिम परिणीती आहे हे नक्की.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (७) कडवे पाहिले.

समर्थांची करुणाष्टके (७)

कडवे पाहिले.

समर्थ म्हणतात...

उदासीन हा काळ जातो गमेना..
सदा सर्वदा थोर चिंता शमेना..
उठे मानसी सर्व सांडूनि जावे...
रघुनायका काय कैसे करावे..?

रामराया..आयुष्य खर म्हणजे तुला वाहिलेल.पण तुझ्याच भक्तीत,उपासनेत राहूनही मी तुझ्या समीप,एकरूप होऊ शकत नाहीये त्यामुळे आयुष्य निरस वाटू लागलंय आणि जगणं ही..!

रामराया..माझी उपासना ही व्यवस्थित मार्गावर आहे की नाही.तुझी कृपा होईल इतपत फलद्रुप होईल की नाही..?माझ्या हातून पारमार्थिक प्रमाद घडत नाही ना?अशा अनेक चिंता मनात उत्पन्न होतायत..आणि त्याचा परिहार होत नाहीये..!

रामराया..अशा वेळी उद्वेगाने,अनेकवेळा वाटत की हे सगळे प्रयत्न सोडून द्यावे..विदेही व्हावं,अज्ञात स्थळी गमन करावं.जिथे कोणताही संपर्क नको.विजनवास स्वीकारावा..!

रामराया..सांग बर..तुझ्याशिवाय मी कुणाकडे सल्ला मागणार नाही..तूच माझ्या आयुष्याचा कर्ताकरविता आहेस.मग तूच मला समजाव..!

समर्थ उपासना मार्गातला,  मानवी जीवनाचा अजून एक भाव उलगडून सांगतात.उद्वेग.जगणं नकोस होणं.ही अवस्था अर्थात रामरायाप्रति असलेल्या ओढीची अंतिम परिणीती आहे हे नक्की.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे दहावे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे दहावे.

समर्थ म्हणतात..

म्हणे दास मी वास पाहे दयाळा..
रघुनायका भक्तपाळा भुपाळा
पहावे तुला हे जीवी आर्त मोठे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया...मी तुझा दास आहे याची खात्री तुला आहे ना..?तो मी असल्याने तुझ्या वाटेकडे आस लावून बसलोय..!तुझ्या प्रकटते ची प्रतीक्षा आणि तुझ्या विरहाचा हा काळ खूपच असह्य होऊ लागला आहे.

रामराया..तुझी किती प्रकारे आळवणी करू..?तू रघुनायक वृत्तीचा अंतिम सद्गुरू आहेस..भक्तांचा पालनहारी आहेस..त्राता आहेस..नव्हे नव्हे तू साऱ्या पृथ्वीचा,भूमीचा एकमेव सृजनकर्ता आहेस...!

रामराया...सगुण रूपातील तू,मूर्तीरूपातला तू,मनोबुद्धि तला तू,विचारातला तू,समाजमनातला तू..नेहमीच तू माझ्या समोर असतोस..मला अनुभव देतोस..पण रामराया..आता मला तू त्या विश्वरूपाच,प्रत्यक्ष दर्शन दे जे मारुतीरायांना दिलंस..आता ही एकमेव इच्छा मनात उरली आहे..!

रामराया..अशा अंतिम इच्छेच्या मी इतका अधीन झालो आहे की ती पूर्ण होत नसल्याने माझ्या आयुष्याचा क्षण न क्षण आता केवळ एकप्रकारच्या उदासीनतेत घालवत चाललो आहे.

समर्थ विनवतायत,आळवतायत रामराया पुढे हट्ट धरतायत,मन उलगडून रामासमोर नतमस्तक होतायत..!भक्तीच्या आधीन जाऊन सार रामचरणाशी सादर करतायत..ही पारमार्थिक उंची केवळ आदर्शच नाही तर अवर्णनीय आहे हो ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे नववे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे नववे.

समर्थ म्हणतात..

भजो काय सर्वापरी हीण देवा..
करू काय रे सर्व माझाची ठेवा..
म्हणो काय मी कर्मरेखा न लोटे..
उदासीन हा काळ कोठे ना कंठे..!

रामराया..मी तुझं पूजन,अर्चन करतो..तुझ्यासमोर उपासना करतो,संकीर्तन ऐकतो पण हे सगळं करून सुद्धा मी तुझ्या इतर भक्तांची तुलना करतो तेंव्हा माझ्या या सगळ्या उपासनारुपी पूजनाची मर्यादा माझ्या लक्षात येऊ लागते.माझी बौद्धिक हिनता जाणवू लागते..!

रामराया.. मला माहित आहे माझ्यातल्या गुण-दोषानुसार मला प्राप्त होत आहे.माझ्या कर्तृत्वानेच मी माझं उणेपण ओढवून घेतलं आहे.माझ पूर्वसंचित कमी पडतंय म्हणून तुझं सस्वरूप दर्शन अजून होत नाहीये..!

रामराया...माझं हे कर्मानुसार मिळणार फळ मी भोगतो आहे.मी कितीही प्रयत्न केला तरी ही माझी कर्मरेखा उलटत नाहीये.किंव्हा तुझं दर्शन मिळण्याइतपत सुकर होत नाहीये.

रामराया..या सगळ्या मानसिक जडणघडणी मध्ये माझं मन तुझ्या प्राप्तीशिवाय अतिशय उदासीन रहाते आहे.आणि तसच निरस माझं आयुष्य जगायला लागत आहे.

समर्थ आपण करत असलेल्या उपासनेची काही वेळा वाटणारी मर्यादा इथे सांगतात.ही मर्यादा पूर्वकर्म आणि दुष्कृतामुळे अशी रहाती आहे की काय अशी शंका ते  रामाला विचारून त्यातून तरून जाऊन रामस्वरूप भेटावे अशी प्रार्थना रामाकडेच करतात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे आठवे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे आठवे.

समर्थ म्हणतात..

अखंडीत हे सांग सेवा घडावी..
न होता तुझी भेटि काया पडावी..
दिसेंदीस आयुष्य हे वेर्थ आटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..जन्माला येऊन तुझ्या संतत नामावलीच्या जपात,उपासनेत सदा लिन असावे.सदा तुझा विचार,तुझ्या कृपादृष्टीचा मागोवा घेत आयुष्य भक्तिमय व्हावे..!

रामराया...तुझ्या भेटीशिवाय जर या शरीरातले श्वास थांबले किंव्हा तुझ्या भेटीची अलोट इच्छाशक्ती असून शरीराने साथ दिली नाही..माझ्या शरीराने नश्वर अवस्था प्राप्त केली तर माझ्या या जीवनाची सार्थकता कशी होईल..?


रामराया..जशी जशी गात्र शिथिल होऊ लागली आहेत..तसे तसे आयुष्य पुढं सरकू लागले आहे.आणि तुझ्या सगुण दर्शनाचा योग अजून जवळ आला अस जाणवत नाहीये त्यामुळे हे जगणं केवळ असार आणि व्यर्थ आहे असे वाटू लागल आहे..!

रामराया..या सगळ्याची परिणीती माझं आयुष्य  खूपच निरस होऊ लागलं आहे.आणि त्यामुळे मन हे उन्मनीत पण उदास होऊ लागलं आहे..!

समर्थ अहर्निश रामाच्या सेवेत,विचारात,उपासनेत आहेत पण साधनाकाळात येणाऱ्या मनुष्यसुलभ निकाराच्या दुश्चित्तपणाचा ही अनुभव त्यांना आहे त्याच वर्णन समर्थ आपल्यासाठी करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे सातवे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे सातवे.

समर्थ म्हणतात..

समर्था मनी सांडि माझी नसावी..
सदा सर्वदा भक्तचिंता असावी..
घडेना तुझा योग हा प्राप्त कोठे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया...तू एकमेव,अद्वितीय आहेस.तू कृतसमर्थ आहेस.या साऱ्या चरचराचा तू स्वामी आहेस.रामराया..मी या तुझ्या भवसागराचाच एक भाग आहे ना..?मग माझ्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस..!

रामराया..तुझ्या मनात तुझ्याच किर्तीप्रमाणे भक्तचिंता असते..!भक्तांच्या दुःखांचा,चिंतेचा तू हारक आहेस.तीच तुझी भक्तपालक म्हणून चिंता माझ्यासाठी दाखवशील ना..?

रामराया..मला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ असते.एक निश्चित कृपेचा मुहूर्त असतो.तो निश्चित तपाने,उपासनेने थोडा  समीप येतो..!मला अजून कळत नाहीये की माझी उपासना फलद्रुप होण्याचा क्षण,मुहूर्त,योग नक्की केंव्हा आहे..?

रामराया..तो योग,ती वेळ येईपर्यंत जो उदासीन किंव्हा प्रतिक्षेचा काळ आहे तो काळ सहजतेने संपावा..आणि तोपर्यंत उपासनेशी दृढ रहायची बुद्धि तूच मला दे..!!

समर्थ निकराने रामदर्शनाचा हट्ट रामरायाकडेच करतायत.रामरायांच लक्ष माझ्याकडे आहेच..पण तो रामराय मला त्याच्या स्वरूपात घेत नाहीये.त्यासाठी ठराविक वेळ लावतोय याचीही जाणीव त्यांना आहे.आणि तशी ती वेळ असते याची जाणीव ते आपल्याला ही करून देतायत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (६) कडवे सहावे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे सहावे.

समर्थ म्हणतात..

आहा रे विधी त्वा असे काय केले..
पराधीनता पाप माझे उदेले...
'बहुतामध्ये' चुकता तूक तुटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..माझे अदृष्ट लिहिणारा,त्याप्रमाणे प्रतिपाळ करणारा,माझं सौख्य बघणारा तूच आहेस..मग मला कळत नाहीये अस काय माझ्या भाळी लिहिलं आहेस की तु मला अजून भेटत नाहीयेस..!?

रामराया..माझं हे पराधीन अस जगणं हे कदाचित माझं पूर्वपाप याच फळ असेल का?की ज्यामुळे मला तुझ्याशी एकरूपतेचा सात्विक आनंद मिळत नाहीये..!

रामराया..या सगळ्याची परीक्षा मी तटस्थ पणे करतो तेंव्हा मला कळत की या तुझ्या कृपेच्या थोड्याश्या दिरंगाईमुळे समाजात ज्या अजाणते पणे चुका होतात त्याला ही समाजाकडून माफी मिळत नाही..!त्याकडूनही माझी उपेक्षा  होते आहे.!

रामराया..या सगळ्याची परिणीती म्हणजे माझ मन जास्तीत जास्त मलूल,उदास होण्याकडे होत आहे..!आणि त्यामुळे मला माझी वाटचाल ही तशीच जाणवू लागली आहे..!

समर्थ आपली ही सारी भक्तीपंथातली, उपासनापंथातली वाटचाल सगळ्याबाजूने तपासून बघत आहेत.या मार्गात त्रुटी कोणतीही राहू नये आणि रामकृपा यथावकाश व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२